19 October 2019

News Flash

मला उमगलेले लोहिया..

राम मनोहर लोहियांना जाऊन आज पन्नास वर्षे झाली.

राम मनोहर लोहियांना जाऊन आज पन्नास वर्षे झाली. लोहिया म्हणाले होते, की लोक माझे ऐकतील, पण मी निवर्तल्यानंतर.. लोहिया गेल्यानंतर देशातील लोकांनी त्यांच्या काही गोष्टी जरूर ऐकल्या, पण अर्धवटच. त्यांचे कुणी ऐकले नाही किंवा ऐकले तर अर्धवट ऐकले, पण यात लोहियांमध्ये तर कुठलीच कमतरता नव्हती, त्यांच्या संदेशवाहकांमध्येही ती नव्हती. आजची युवा पिढी लोहियांना ओळखते असे मला वाटत नाही किंवा त्यांना त्यांच्याबाबत जी माहिती आहे ती अर्धसत्यावर आधारित आहे.

मला वाटते, की आता लोकांनी खरोखरच लोहियांचे ऐकण्याची वेळ आली आहे; पण त्यांचे विचार केवळ तुकडय़ातुक डय़ाने समजून घेऊन चालणार नाही. सलगपणे त्यांचे विचार अभ्यासले पाहिजेत. लोहिया विसाव्या शतकात जन्माला आले व निवर्तले, पण त्यांचे विचार एकविसाव्या शतकातही सुसंगतच आहेत. लोहियांचा खरा वारसा काय होता हे आकलन करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना ज्या चौकटीत आपण जखडले आहे त्यातून बाहेर काढले पाहिजे. आज लोहियांच्या नावावर मुलायमसिंह यादव व अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष कब्जा करून आहे. कधी कधी रामविलास पासवान व नितीशकुमार तसेच शरद यादव यांच्यासारखे नेतेही लोहियांचे नाव घेतात. खरे तर या समाजवाद्यांचे लोहियांशी असलेले नाते हे जसे काँग्रेसचे महात्मा गांधींशी आहे तसेच तकलादू असल्याचे दिसते. आज लोहिया जिवंत असते, तर समाजवादाच्या नावाखाली चाललेल्या भोंदूगिरीला त्यांनी विरोधच केला असता, त्यांना त्यांच्याच चेल्यांविरोधात धरणे आंदोलन करावे लागले असते.

लोहियांना नीट समजून घ्यायचे असेल, तर त्यांच्याबाबत जे तीन गैरसमज किंवा अर्धसत्ये आहेत ती दूर करावी लागतील. पहिला गैरसमज असा, की लोहिया हे गैरकाँग्रेसीवादाचे प्रवर्तक होते. एक खरे की साठच्या दशकात अजेय असलेल्या काँग्रेसला पायउतार करण्यासाठी लोहियांनी विरोधकांच्या एकजुटीची मुहूर्तमेढ रोवली होती; पण ती प्रासंगिक रणनीती होती, विचारसरणी मुळीच नव्हती. आजच्या काळात भाजपच्या कच्छपि लागलेले समाजवादी लोहियांच्या गैरकाँग्रेसवादाचा आधार घेण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते लोहियांच्या विचारांचा उपमर्द करतात यात शंका नाही, असे मला वाटते.

लोहियांना मंडलवादाचे जनक म्हणून ओळखणे हा दुसरा गैरसमज किंवा अर्धसत्य आहे. लोहिया हे स्वतंत्र भारतातील असे पहिले विचारवंत होते, ज्यांनी समाजातील जातीय विषमतेवर बोट ठेवले. लोहियांनी सार्वजनिक जीवनात प्रत्येक पक्षामध्ये पुढारलेल्या जातींच्या वर्चस्वाला विरोध केला होता व ‘पिछडा पावे सो में साठ’ ही गाजलेली घोषणा दिली; पण लोहियांच्या मतानुसार शूद्रांमध्ये दलित, आदिवासी, मागास जाती, अल्पसंख्याक व प्रत्येक जातीतील महिला यांचा समावेश होता. मागासांच्या आरक्षणाच्या नावाखाली काही जातींनी त्यावर केलेला कब्जा लोहियांना आवडणारा नव्हता. आरक्षणाने मागास जमातींना लाभ मिळाला पाहिजे व प्रत्येक जातीच्या स्त्रियांनाही आरक्षणाचा फायदा मिळावा, असे त्यांचे मत होते.

तिसरे अर्धसत्य हे की, ‘इंग्रजी हटाव’ अशी घोषणा लोहियांनी दिली होती. इंग्रजी ही परदेशी भाषा आहे म्हणून लोहियांनी तिचा विरोध केला नाही, या भाषेमुळे काही समाज एकमेकांची बरोबरी करू शकत नाहीत, काही वर्गाची मक्तेदारी वाढते, किंबहुना त्या भाषेचा त्यासाठी हत्यार म्हणून वापर केला जातो, असे लोहियांचे मत होते. हिंदी व इतर भारतीय भाषांचे लोहियांनी समर्थनच केले होते, त्यामुळे त्यांच्या विचारांनी रघुवीर सहाय, सर्वेश्वर दयाल शर्मा, विजय नारायण साही, विद्यानिवास मिश्र यांसारख्या हिंदी लेखकांना प्रेरणा मिळाली, तर यू. आर. अनंतमूर्ती, तेजस्वी व लंकेश यांच्यासारखे लेखक रस्त्यावर उतरले.

असत्य व अर्धसत्याचे हे पापुद्रे उलगडल्यानंतर राम मनोहर लोहिया यांना आपण खऱ्या अर्थाने समजून घेऊ शकू. लोहियांचा राजकीय विचारधारांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ते अद्वैतवादी होते. विसाव्या शतकातील प्रत्येक द्वंद्वात लोहियांनी एक तिसरी दिशा समाजाला दाखवली. लोहिया यांनी कुठल्या तरी आयत्या विचारसरणीचा किंवा कथित वादाचा (इझम) पुरस्कार केला नाही, कुणा महापुरुषाची पूजा केली नाही, कुठल्या पुस्तकाला अंतिम प्रमाण मानले नाही. मार्क्‍स असो की गांधी, पाश्चिमात्य ज्ञान असो की परंपरागत ज्ञान, कल्पित गोष्टी असो की अस्सल विज्ञान, लोहियांनी प्रत्येकातून काही तरी घेतले व प्रत्येकावर टीकाही केली.

लोहियांच्या विचारांचा अभ्यास म्हणजे विसाव्या शतकातील दोन विचारसरणींतील सत्त्वग्रहण करण्यासारखे आहे. विसाव्या शतकातील पहिली विचारसरणी समतामूलक चिंतन ही होती. त्यातून साम्यवादी, समाजवादी, स्त्रीवादी व आंबेडकरवादी विचारसरणींना नवा आयाम दिला. दुसरी विचारधारा ही स्वदेशी विचाराची होती, ती गांधीवाद व सवरेदयी विचारातून अभिव्यक्त झाली. विसाव्या शतकात या दोन्ही विचारसरणी कमी-अधिक समांतर चालल्या. लोहियांच्या विचारात या दोन्ही विचारसरणींचा संगम होताना दिसतो. असमानतेविरोधात संघर्षांची त्यांची जिद्द व समाजातील समरसतेचा शोध, राष्ट्रवादाचे प्रबळ आव्हान व त्याच्या जोडीला सखोल आंतरराष्ट्रीयता, अहिंसेचा संकल्प, एकमेकांशी नाते असे अनेक पैलू त्यात आहेत.

आज देशात राष्ट्रवाद, सांस्कृतिक वारसा, धर्मनिरपेक्षता यावर चर्चा सुरू आहे, त्याला नवी दिशा देण्याचे सामर्थ्य लोहियांच्या विचारात मला दिसते. आज देशात राष्ट्रवादाच्या नावाखाली उन्मादाचे वातावरण आहे. त्याचा विरोध करणारे देश निरपेक्ष असल्याचे दिसून येते. लोहिया यापेक्षा वेगळे होते, ते एकाच वेळी भारतमाता व धरतीमातेला नमन करतात. एकीकडे चीनच्या कुटिल हेतूंबाबत लोहियांनी नेहरूंना सावध केले, तर दुसरीकडे भारत-पाक महासंघाचे समर्थन केले होते. विश्व संसदेचे स्वप्न ते पाहत होते. अमेरिकेतील इतर वर्णीयांच्या मागे ते ठामपणे उभे राहतात. लोहियांच्या राष्ट्रीयतेला लाभलेले आंतरराष्ट्रीयतेचे कोंदण पाहिले, की गेली दोन वर्षे देशात चाललेली राष्ट्रवादाची चर्चा निर्थक वाटू लागते व त्यातून आपल्याला एक स्वच्छ रस्ता दिसू लागतो.

धर्मनिरपेक्षता समर्थक व विरोधक यांच्यातही अशीच चर्चा हल्ली होते. राजनीती हा अल्पकालीन धर्म आहे व धर्म हा दीर्घकालीन राजनीती आहे. लोहियांचे हे सांगणे धर्म व राजनीती यांचा अन्योन्यसंबंध तर दाखवतेच, पण त्यांना गांधीपर्यंत घेऊन जाते. लोहियांचे हे चिंतन आपल्याच पारंपरिक प्रतीकांनी परिपूर्ण आहे. लोहिया हे स्त्रीवादाचे प्रतीक म्हणून द्रौपदीला उभे करतात. राम, कृष्ण व शिव यांना मर्यादित, उन्मुक्त व असीमित व्यक्तित्वाच्या रूपात मानून त्यांचा प्रतीकात्मक समावेश असलेल्या अशा नव्या राजकारणाची अपेक्षा करतात, ज्यात या तिन्हींचा समावेश असेल, रामायणाला ते उत्तर-दक्षिण एकतेचे प्रतीक मानतात. सर्व प्रकारच्या रामायणांचे एकत्रित वाचन होईल अशा सर्वव्यापी रामायण मेळ्याची त्यांची संकल्पना होती. हेच लोहिया गांधींच्या खांद्याला खांदा लावून हिंदू-मुस्लीम एकतेसाठी प्राणांची बाजी लावण्यास तयार होते असे दिसते.

कपोलकल्पित गोष्टी व महाकाव्ये यांच्या सागरात डुबकी मारतानाही लोहिया आपल्या वारशातील काही वैचारिक कचरापट्टीचा त्याग करायला सांगत होते. लोहियांच्या मते अनेकांना वेळोवेळी माना वेळावत मागे पाहण्याची सवयच लागली आहे, त्यांना प्रत्येक शोध हा प्राचीन भारतातच लागला होता असेच वाटते. ते आपल्या परंपरेला सतत ललामभूत मानत असतात; पण त्यांना ना भारत समजतो ना परंपरा. जगातील प्रत्येक प्रकारचे ज्ञान मिळवण्याची ओढ, नव्या विचारांचा आग्रह व मुल्लावादाला आव्हान देण्याची तयारी या सगळ्या गोष्टी या लोहिया आधुनिकतावादी होते याची साक्ष देतात. भारतात इंग्रजी बोलणारा जो प्रशासक व शासक वर्ग आहे, तो नकली आहे, आधुनिक नाही. लोहियांनी एका प्रसिद्ध भाषणात देशी आधुनिकतावादावर विचार मांडले होते. ती आधुनिकता अशी होती, जी युरोपलाही साध्य करता आली नाही. योगायोग म्हणजे अलीकडे मुलींच्या छेडछाडीवरून राजकीय रणकंदन झालेल्या बनारस हिंदू विद्यापीठात त्यांचे हे वेगळे विचारप्रवर्तक भाषण पूर्वी झाले होते.

योगेंद्र यादव

yywrites5@gmail.com

First Published on October 12, 2017 3:31 am

Web Title: articles in marathi on ram manohar lohia