अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत उभ्या असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऑगस्टमधील एका प्रचारसभेमध्ये एक महत्त्वाची व्यक्ती उपस्थित होती. ज्या इंग्लंडच्या वर्चस्वाविरोधात बंड करून अमेरिकेने आपले स्वतंत्र प्रजासत्ताक स्थापन केले, त्याच इंग्लंडमधील एक राजकीय नेता अमेरिकेस राजकारणाचे धडे देण्यासाठी आला होता. निमित्त होते अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील प्रचारसभेचे. या सभेत ‘युकीप’ या इंग्लंडमधील राजकीय पक्षाचे नेतृत्व करणारे नायजेल फराज हे उपस्थित होते. उंची सुटबुट आणि बोटात पकडलेली सिगार हा नायजेल फराज यांचा अवतार पाहून बर्टॉल्ट ब्रेख्त यांच्या ‘द रेझिस्टिबल राइझ ऑफ ऑर्तुरो उई’ या नाटकाची आठवण होते. १९४१ साली लिहिलेल्या या उपहासात्मक नाटकात ब्रेख्तने १९३० च्या जागतिक अर्थमंदीनंतर अमेरिकेत उदयास आलेल्या एका भाजीवाल्या गँगस्टरची कहाणी सांगितली आहे. लोकांच्या भावनांशी खेळून या गुंडाने शिकागो आणि इतर शहरांतील मंडींवर कसा कब्जा मिळवला, याचे वर्णन हिटलरच्या उदयाकडे निर्देश करणारे होते. जूनमध्ये ब्रिटिश जनतेला ‘ब्रेक्झिट’चा मार्ग निवडण्यास कारणीभूत ठरलेल्या नायजेल फराज यांनी अमेरिका आणि युरोपमधील इतर देशांनाही उपदेशाचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. जरी इतिहासात नायजेल फराज यांना हिटलरएवढे महत्त्व नसले तरीही गेल्या काही वर्षांत जगभरात- प्रामुख्याने युरोप आणि अमेरिकेत बळावलेल्या उजव्या राजकीय विचारसरणीच्या चळवळीत नायजेल फराज यांनी  महत्त्वाची भूमिका बजावली आहे यात शंका नाही.

१९९३ मध्ये ‘यूके इंडिपेन्डन्स पार्टी’ (युकीप) स्थापन झाली तेव्हा ब्रिटनने युरोपियन युनियनमध्ये सामील होऊन दोन दशके उलटली होती. युरोपियन युनियन आणि त्यातून ब्रिटनमध्ये येणाऱ्या लोकांना विरोध करणारी म्हणूनच ‘युकीप’ पार्टीचा उदय झाला. तत्कालीन कन्झव्‍‌र्हेटिव्ह पार्टीतून कट्टर उजव्या विचारसरणीचे लोक बाहेर पडले आणि अ‍ॅलन स्केड यांच्या नेतृत्वाखाली ‘युकीप’ची स्थापना झाली. मात्र, ब्रिटिश नॅशनल पार्टी या जहालमतवादी संस्थेपासून ‘युकीप’ दूर राहिली. किंबहुना, म्हणूनच पार्टीच्या नावात ‘ब्रिटिश’ असे न म्हणता ‘यूके’ (इंग्लंड, वेल्स, स्कॉटलंड आणि नॉर्दन आर्यलड यांना एकत्रितपणे ‘यूके’ असे संबोधित केले जाते.) असा सर्वव्यापी उल्लेख करण्यात आला. या पक्षाचा आर्थिक उदारतेला पाठिंबा असला तरीही युरोपियन युनियनचे नियम आणि ब्रिटनमध्ये युरोपीय संघातून येणाऱ्या लोकांच्या वाढत्या लोंढय़ाला ‘युकीप’चा विरोध होता. तरीही सुरुवातीच्या काळात राजकीय पटलावर ब्रिटिश नॅशनल पार्टी हा पक्षच वरचढ होता. ‘युकीप’ला निवडणुकांत फारशी यशप्राप्ती झाली नव्हती.

२००६ साली नायजेल फराज यांनी ‘युकीप’चे नेतृत्व स्वीकारले. तोपर्यंत युरोपीय पार्लमेंटमध्ये आपल्या प्रखर युरोपियन संघविरोधी वक्तव्यांमुळे नायजेल फराज यांनी बरीच प्रसिद्धी मिळवली होती. उच्चशिक्षित नायजेल फराज यांच्या लंडनच्या कमॉडिटी मार्केटमधील यशस्वी कारकीर्दीबरोबरच राजकीय पटलावरही स्वतंत्र ठसा निर्माण होत होता. जेक्सन बॅरोट, जेकस् शिराक, होजे मॅनुएल बरोसो या युरोपियन नेत्यांची वादग्रस्त आर्थिक गुंतवणूक आणि त्यांचे राजकीय धागेदोरे फराज यांनी लोकांसमोर आणले. युरोपियन युनियन ही एक गुंतागुंतीची आणि अनावश्यक शासनसंस्था आहे, असे मत ते आपल्या भाषणांतून सतत मांडत असतात.

अशा कट्टरतावादी उजव्या विचारसरणीचा उगम कसा आणि कुठे होतो आणि तिचा लोकाभिमुख प्रसार कसा होतो, याबद्दल विविध मतप्रवाह आहेत. लोकांमध्ये ‘आपण’ आणि ‘ते’ ही भावना निर्माण करणे आणि तिला व्यवस्थित खतपाणी घालून या भावनेचे पर्यवसान लोकव्यापी द्वेषात करणे, हे कोणत्याही देशास घातक ठरू शकते. या प्रक्रियेत स्वत:ची राजकीय कारकीर्दही संपुष्टात येऊ शकते. युरोपियन युनियनमध्ये सामील झाल्यापासूनच त्याविरोधात ब्रिटनमध्ये चळवळ सुरू झाली होती. यार्ड (Yard), फूट (foot), माइल्स (miles) ही ब्रिटिश मापे जाऊन त्यांची जागा इंच आणि किलोमीटर यांनी घेतली. शेती आणि मासेमारी या पूर्वापार चालत आलेल्या ब्रिटिश व्यवहारात युरोपियन युनियनची नियमावली घुसू लागली. गाजर-बटाटय़ाचे आकार कसे असावेत, तसेच मासेमारीवरही युरोपियन युनियनचे र्निबध यांसारख्या बाबींवरून ब्रिटिश नागरिकांची नाराजी वाढत गेली. युरोपियन युनियनच्या आपल्या सदस्य राष्ट्रांसमवेतच्या व्यवहारांत पुरेसे तारतम्य नव्हते. पोलंड, रोमेनिया या कम्युनिस्ट राजवटीतून बाहेर पडलेल्या नव्या देशांना युरोपियन युनियनमध्ये सामावून घेण्याचा आणि तेथील लोकांना अर्निबधपणे प्रवास आणि काम करण्याची मुभा देणारा युरोपियन युनियनचा कायदा ब्रिटनप्रमाणेच इतरही सदस्य युरोपियन देशांना आवडला नव्हता.

कोणतीही राजकीय चळवळ पुढे जाण्यासाठी गरज असते ती सर्वसामान्य लोकांच्या सहभागाची.  लंडन, मॅन्चेस्टर, बर्मिगहॅमसारख्या इंग्लंडमधील महत्त्वाच्या शहरांत युरोपियन युनियनच्या कायद्यांविरोधात चाललेला वैचारिक लढा लोकव्यापी होण्यासाठी गरज होती ती सर्वसामान्यांना समजेल, किंबहुना त्रासदायक ठरेल अशा घटनांची. २००९ साली अमेरिकेत निर्माण झालेल्या आर्थिक संकटाने इंग्लंडसह समस्त युरोपला आणि जगालाही हवालदिल करून सोडले. त्यात असंख्य लोकांच्या नोकऱ्या गेल्या. घरे गेली. बँकांतील ठेवींचे अवमूल्यन झाले. लोक शहरे सोडून खर्च कमी करण्यासाठी गावांत राहायला गेले. केवळ वर्षभरात ब्रिटनमधील बेरोजगारीचा दर पाच टक्क्यावरून आठ टक्क्यावर गेला. आर्थिक मंदीने लोक संत्रस्त झाले. अशातच नोकरीच्या निमित्ताने युरोपमधील इतर देशांतील लोक इंग्लंडमध्ये अधिकाधिक संख्येने येऊ लागले. युरोपियन युनियनच्या नियमानुसार, या ब्रिटिश नसलेल्या नागरिकांना बेरोजगारभत्ता मिळत होता. तसेच मोफत वैद्यकीय सेवांचा लाभही या ब्रिटिशेतर लोकांना मिळत होता. त्यामुळे हे बाहेरील लोक इंग्लंडमधील लोकांना खुपू लागले. आपल्या देशातल्या आर्थिक मंदीला हे पोलंड, रुमानियासारख्या देशांतले लोक कारण आहेत अशी भावना जोर धरू लागली. या आगीत इंग्लंडमधील प्रसार माध्यमांनीही तेल ओतले. ‘डेली मेल’ या कट्टरवादी व प्रक्षोभक विचारसरणीला खतपाणी घालणाऱ्या वृत्तपत्राने  मुखपृष्ठावर ब्रिटिशेतर लोक येथील सुविधांचा कसा गैरवापर करत आहेत याबद्दलचा प्रचार सुरू केला.

नायजेल फराज यांच्यासारख्या उजव्या व प्रक्षोभी विचारसरणीच्या व्यक्तीने या आर्थिक अस्थिरतेचा पुरेपूर फायदा उठवला. २००९ च्या युरोपियन पार्लमेंटच्या निवडणुकांमध्ये ‘युकीप’चे १३ उमेदवार निवडून आले. साहजिकच ‘युकीप’ची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक ताकद हळूहळू वाढू लागली. २०१० मध्ये इंग्लंडच्या संसदीय निवडणुकांत ‘युकीप’ला ३.१% मते मिळाली होती. जसजसा आर्थिक मंदीचा फास लोकांभोवती आवळत गेला तसतसा ‘युकीप’चा प्रभावही वाढत गेला. अर्थातच केवळ आर्थिक मंदी हे त्याचे एकच कारण नव्हते. युरोपियन युनियनचे वाढते र्निबधही लोकांना जाचक वाटू लागले होते. उदाहरणार्थ, आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रीस सरकारला पैशाची मदत करताना युरोपियन युनियनने अनेक अटी घातल्या. त्यानुसार लोकांचा बेरोजगार भत्ता, वैद्यकीय सोयीसुविधा यांवर कमालीचे नियंत्रण आणण्यात आले. ग्रीसवासीयांनी याविरुद्ध अनेक आंदोलने केली. युरोपियन युनियनच्या इतरही अटींनी त्रासलेल्या युरोपीय लोकांचा लोंढा तेव्हा लंडनकडे वळला. कारण ब्रिटिश सरकारने लोकांच्या सामाजिक सुविधांवर गदा आणली नव्हती. परंतु या वाढत्या लोंढय़ाने मात्र इंग्लंडमधील सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेवर ताण पडू लागला. नायजेल फराज यांनी याचे पुरेपूर भांडवल केले. एव्हाना त्यांच्यामागे काही उद्योजक आणि प्रसार माध्यमे यांचे पाठबळही उभे राहिले होते. तत्कालीन कन्झव्‍‌र्हेटिव्ह व लिबरल डेमोक्रॅट्स आघाडी सरकारला कंटाळून काही सत्ताधारी संसद सदस्यांनी ‘युकीप’मध्ये प्रवेश केला.

एकीकडे यामुळे ‘युकीप’चे मतदारही हळूहळू वाढत होते. शहरी भागांत ‘युकीप’ला पाठिंबा नगण्यच होता. आणि आजही तसाच आहे. शहरांपासून दूर राहणारे कामकरी ब्रिटिश- प्रामुख्याने पन्नाशी उलटलेले- हा ‘युकीप’ला समर्थन देणारा वर्ग. प्लंबर्स, भाजीविक्रेते, मासेमारी करणारे, शेती करणारे आणि ट्रेडर्स हे युरोपियन युनियनमधून येणाऱ्या स्थलांतरितांच्या लोंढय़ाविरोधातील ‘युकीप’च्या प्रक्षोभक विधानांशी सहमत होऊ लागले.

ब्रिटिश पद्धतीने ट्विड जॅकेट घालून एखाद्या स्थानिक पबमध्ये जाऊन तेथील लोकांबरोबर बीअरचा ग्लास हाती घेऊन, सिगारेटचे झुरके मारत गप्पा मारायच्या, ही नायजेल फराज यांच्या प्रचाराची पद्धत. त्यामुळे तिथे जमलेल्या लोकांना हा आपलाच माणूस आहे असे वाटणे स्वाभाविक होते. आपण इंग्लंडमध्ये तयार केलेल्या वस्तूच वापरतो असा सतत डंका पिटणे, युरोपयीन लोकांच्या वर्तणुकीवर, त्यांच्या खानपान संस्कृतीवर ताशेरे ओढणे, अशा गोष्टी ते करत. नायजेल फराज यांचे पूर्वज मात्र हेगनॉट आणि जर्मन भागांशी संबंधित होते. खुद्द नायजेल फराज यांनीही एका जर्मन स्त्रीशी संसार थाटलेला आहे. असे असूनही इंग्लंडला युरोपियन युनियनची अजिबात गरज नाही, आणि त्यातून बाहेर पडल्याशिवाय इंग्लंडचा विकास कसा होणार नाही, याबद्दलचा प्रचार ‘युकीप’ने सुरू केला.

२०१४ च्या युरोपियन पार्लमेंटच्या निवडणुकीत ‘युकीप’ला पूर्वीपेक्षा दहा जागा जास्त मिळाल्या. जागतिकीकरणाचा आपल्याला काही फायदा झाला नाही, हा समज इंग्लंडमधील गावांतून ‘युकीप’च्या प्रचाराने आणखीनच दृढ झाला. त्याच वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांत ‘युकीप’ला १६७ जागा मिळाल्या; जेणेकरून ‘युकीप’ला देशभरात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. डग्लस कार्सवेल हा कन्झव्‍‌र्हेटिव्ह पार्टीचा सदस्य पक्षातून बाहेर पडून ‘युकीप’मध्ये सामील झाला. वर्षअखेरीस मार्क रेकलेस हा दुसरा संसद सदस्य या पक्षात दाखल झाला आणि ‘युकीप’ला ब्रिटिश संसदेत स्थान प्राप्त झाले. स्कॉटलंड, वेल्स या इंग्लंडच्या भागांतही ‘युकीप’चा प्रभाव हळूहळू वाढू लागला. रूपर्ड मरडॉक यांच्या ताब्यात केवळ अमेरिकेतलीच नव्हे, तर जगभरातील महत्त्वाच्या देशांमधील प्रसारमाध्यमेही आहेत. नायजेल फराज यांचा वाढता प्रभाव त्यांच्या नजरेत भरला नसता, हे अशक्यच. त्यांनी नायजेल यांना कंपनीच्या न्यूयॉर्कमधील ऑफिसमध्ये बोलावले. ‘युकीप’च्या पुढील वाटचालीची ही नांदी होती.

संपूर्णत: पुरुषांचीच, समलिंगी संबंधांना विरोध करणारी, इतर धर्माविषयी विरोधी टीकाटिप्पणी करणारी अशा प्रकारची एक मागासलेली पार्टी म्हणूनच ‘युकीप’ची ओळख होती. काही मिश्रवर्णीय लोकांना पक्षात सहभागी करून ‘युकीप’ने आपली प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न केला.

२०१५ च्या इंग्लंडमधील संसदीय निवडणुकांमध्ये ‘युकीप’ने स्थानिक लोकांच्या हितासाठीचे अनेक प्रस्ताव पक्षाच्या प्रचार मोहिमेत मांडले. नोकरी आणि व्यवसायांमध्ये ब्रिटिश लोकांना प्राधान्य देणे, किमान वेतन वाढवणे, श्रीमंतांचे कर्जदर वाढवणे, सामाजिक आणि वैद्यकीय सुविधा केवळ ब्रिटिश लोकांनाच उपलब्ध करून देणे, या ‘युकीप’च्या काही महत्त्वाच्या कलमांमुळे अनेकजण या पक्षाकडे आकर्षित झाले. या पक्षाची ब्रिटिशेतरांविषयीची द्वेषमूलक भूमिका अनेकांनी देशीय अस्मिता समजून आपलीशी केली.  नायजेल फराज हे देशातील संसदेचे सदस्य नसले तरी त्यांच्या लार्जर दॅन लाईफ व्यक्तिमत्त्वाचे लोकांनी जसे स्वागत केले, तसाच अनेकांनी त्यांना विरोधही केला. भाषेवर उत्तम प्रभुत्व आणि जनमानसाची नाडी अचूक ओळखणे, हे कोणत्याही यशस्वी राजकीय नेत्याचे गुण असतात. त्या बळावर तो देशाला वाटेल त्या दिशेला किंवा दशेला नेऊ शकतो. परंतु इंग्लंडसारख्या देशात राजकीय नकाशावर शहरी भाग वगळता अन्यत्र फारसे राजकीय प्रतिनिधित्व नसलेल्या या पक्षाची अचानक चढती कमान सुरू झाली. बर्मिगहॅम, लीड्स, मॅन्चेस्टर, लिव्हरपूल ही पूर्वाश्रमीची इंग्लंडची उद्योग क्षेत्रे आणि सत्ताकेंद्रे. नवे तंत्रज्ञान आणि आर्थिक युगात कारखाने बंद पडले. वाढत्या जागतिकीकरणात लंडनचे महत्त्व वाढले आणि इतर भागांचा विकास थांबला. आणि त्यातून लोकांचा तत्कालीन राजकारण्यांविषयीचा रोष वाढू लागला. त्यातच आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे तेथील लोकांचा लोंढा युरोपमार्गे इंग्लंडमध्ये घुसू लागला. स्थलांतरितांचा मुद्दा अधिकच चिघळू लागला. आर्थिक मंदीतून अजूनही न सावरलेले ब्रिटिश लोक या लोंढय़ांकडे अधिकच साशंकतेने पाहू लागले. तशात युरोपियन युनियनने इंग्लंडला या स्थलांतरितांना आसरा देण्याचे आवाहन केले.

ब्रिटन आणि फ्रेंच सीमेलगत कॅले या ठिकाणी हजारो निर्वासित इंग्लंडमध्ये येण्यासाठी उत्सुक होते. काहीजण ट्रकच्या खाली लपून बेकायदा इंग्लंडमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. युरोपमधील अन्य देशांनी- जर्मनी, फ्रान्स, इटली, ग्रीस यांनी- निर्वासितांना आश्रय दिला खरा; परंतु हे बहुसंख्य निर्वासित मुस्लीम असल्याने युरोपमधील ख्रिस्ती समाज अस्वस्थ झाला होता. फ्रान्समध्ये चार्ली हेब्दोवरील खुनीहल्ल्यातील मारेकरी हे निर्वासित मुस्लीम होते. इस्लामिक स्टेटच्या वाढत्या कारवायांचा ताप युरोपला प्रत्यक्षातही होत होताच. नोव्हेंबर २०१५ साली झालेले फ्रान्समधील हत्याकांड, त्यानंतर जर्मनी आणि बेल्जियममध्ये झालेले दहशतवादी हल्ले यांचे सूत्रधार इस्लामिक स्टेटचे अतिरेकीच होते. इंग्लंडमधील जनता या दहशतवादी हल्ल्यांकडे दहशतीच्या भावनेतून पाहत होती. आणि आपली पाळी केव्हा येणार, या भीतीने चिंतातुर होत होती. जर्मनीच्या चान्सलर एन्जेला मर्केल यांनी मात्र सर्व निर्वासितांचे पुनर्वसन करायचेच असा जणू पणच केला होता. ब्रिटनचे युरोपियन युनियनमधील अस्तित्व शाबूत ठेवायचे असेल तर या निर्वासितांना इंग्लंडमध्ये आसरा देणे बंधनकारक होते. इंग्लंडमधील सगळ्या लोकांना ते मंजूर नव्हते. शहरापासून दूर असणाऱ्या आणि प्रामुख्याने गौरवर्णी मध्यमवर्गीय ब्रिटिश जनतेला या निर्वासितांमुळे उद्भवणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि सुरक्षिततेसंबंधीच्या संकटाची भीती ग्रासू लागली. लोकांच्या या भीतीला ‘युकीप’ने चांगलेच खतपाणी घातले.

बीबीसी, स्काय या दूरचित्रवाणी वाहिन्या आणि टाइम्स, गार्डियन, टेलिग्राफ ही वृत्तपत्रे सुरुवातीला केवळ शहरी भागांतीलच वृत्तनियोजन करीत होती. ‘युकीप’ मात्र आपले पंख इंग्लंडमधील दूरवरच्या शहरांतून पसरवीत होता. २०१५ च्या मे महिन्यात पार पडलेल्या संसदीय निवडणुकीत कन्झव्‍‌र्हेटिव्ह पक्ष अनेकांचे भाकीत खोटे पाडून बहुसंख्येने निवडून आला. ‘युकीप’ हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आला. हे मात्र सर्वाकरताच आश्चर्याचे होते. यावेळीच काहींना पुढे येणाऱ्या राजकीय भूकंपाची जाणीव झाली.

तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमरॉन यांनी निवडणुकांआधी जाहीर केल्यानुसार ब्रिटनच्या युरोपियन युनियनमधील सहभागासंबंधात सार्वमत घेण्याची घोषणा केली. २३ जून २०१६ रोजी युनायटेड किंगडममध्ये जनता युरोपियन युनियनमध्ये राहायचे (Bremain) की बाहेर पडायचे (Brexit), यावर आपले मत मांडणार होती. दोन्ही पक्षाच्या नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली. प्रस्थापित कन्झव्‍‌र्हेटिव्ह आणि लेबर पार्टीचा इ१ीें्रल्ल ला पाठिंबा होता, तर या पक्षांतून बाहेर पडलेले काही संसद सदस्य बोरिस जॉन्सन, लियम फॉक्स आदींनी इ१ी७्र३ शी नाते जोडले. मात्र, या प्रस्थापित इ१ी७्र३ समर्थकांनी प्रत्यक्षपणे ‘युकीप’शी संपर्क ठेवला नाही. नायजेल फराज यांनी या सार्वमताचा पुरेपूर लाभ उठवला. त्यांनी सबंध इंग्लंड पिंजून काढले. स्थलांतरितांमुळे इंग्लंडच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेचा कसा बोजवारा उडाला आहे, हे ते जाहीर सभांमधून, प्रसार माध्यमांतून लोकांपुढे मांडू लागले. त्यांच्या अनेक वक्तव्यांना वैचारिक पातळी नव्हती. केवळ सामान्य लोकांना चेतवून ब्रिटिशेतर- प्रामुख्याने  युरोपियन युनियनमधून येणाऱ्या लोकांविषयी त्यांचे मत कलुषित करणे, हाच ‘युकीप’च्या प्रचाराचा महत्त्वाचा भाग होता.

२३ जूनच्या ब्रेक्झिटच्या कौलानंतर इंग्लंडने नव्या पर्वात पदार्पण केले. नायजेल फराज यांचा आनंद त्यामुळे बीयरच्या फेसाप्रमाणेच उतू जात होता. २३ जून हा ब्रिटनचा स्वातंत्र्यदिन म्हणून घोषित करावा, अशी मागणीही केली. जनमताच्या या कौलानंतर झालेल्या युरोपियन पार्लमेंटच्या अधिवेशनात त्यांनी तिथल्या सदस्यांना कानपिचक्या दिल्या- ‘‘मी जेव्हा युरोपियन युनियनमधून ब्रिटन  बाहेर पडेल असे काही वर्षांपूर्वी म्हणालो होतो तेव्हा तुम्ही माझे हसे केले होते. आता कोणाचे हसे झाले?’’ असा सवाल करून ‘फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी हे देशही काही वर्षांतच युरोपियन युनियनमधून बाहेर पडतील,’ असे भाकीतही त्यांनी केले.

इंग्लंडला युरोपियन युनियनमधून बाहेर काढणे हे एकमेव ध्येय असल्याने त्यात यशस्वी झाल्यावर नायजेल फराज यांनी ‘युकीप’च्या नेतृत्वाचा राजीनामा दिला. सत्तेत नसूनही नायजेल फराज यांनी एक महत्त्वाचे सत्तांतर घडवून आणले. झपाटल्यासारखा एकाच ध्येयाचा ध्यास त्यांनी घेतला आणि तो तडीस नेला. पन्नाशी उलटलेले फराज राजकारणापासून फार काळ दूर राहणे अर्थात शक्यच नाही. ब्रेक्झिट जनमताचे प्रतीक आहे आणि त्याची अंमलबजावणी होण्यासाठी ‘युकीप’ सतर्क राहील, अशी ग्वाही फराज यांनी दिली आहे.

या सगळ्यामुळे प्रस्थापित कन्झव्‍‌र्हेटिव्ह आणि लेबर पक्षालाही ‘युकीप’ची जरब बसली आहे. म्हणूनच तेरेसा मे या ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांनी ‘ब्रेक्झिट म्हणजे ब्रेक्झिट’ असे ठामपणे बजावले आहे. त्याबरोबरच ग्रामर स्कूलची पुनस्र्थापना करण्यावर भर दिला आहे; जेणेकरून देशातील अभिजन आणि सामान्यजन यांच्यातील दरी कमी होईल. नायजेल फराज यांच्या ‘युकीप’चा प्रचाराचा एक मुद्दा होता, की ग्रामर स्कूलची संख्या वाढवून देशातील शैक्षणिक दरी कमी करावी. संदरलंड या उत्तर ब्रिटनमधील भागाने ब्रेक्झिटला पाठिंबा देऊन संपूर्ण जनमताचा कौल बदलला होता. आतापर्यंतच्या सरकारांनी इंग्लंडच्या उत्तरेकडील भागाकडे जवळपास दुर्लक्षच केले होते; ज्याचा ‘युकीप’ला फायदा झाला. तेरेसा मे यांच्या सरकारने या दुर्लक्षित राहिलेल्या भागांना ‘आपलेसे’ करायचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रसार माध्यमांतूनही सध्या लंडनखेरीज इतर भागांतीलही बातम्या प्राधान्याने दिल्या जात आहेत. ‘युकीप’ने राजकीय पक्ष, सत्ताधारी, प्रसार माध्यमे आणि विचारवंत यांना देशातील जनतेचा आणि तत्कालीन सामाजिक बदलांचा सखोल अभ्यास करण्यास प्रवृत्त केले आहे. उजवी विचारसरणी केव्हा मुख्य विचारसरणी होऊ शकेल याचा नेम नाही. एखाद्या विचारप्रणालीला जवळपास पन्नास टक्के लोकांचा पाठिंबा असेल तर ती खरेच क्रांतिकारी ठरते? राजकारणाचा अभ्यास सांगतो की, समाजात देशामध्ये जवळपास तीस टक्के लोक क्रांतिकारी आणि पुराणमतवादी (कन्झव्‍‌र्हेटिव्ह) वृत्तीचे असतात. पण बदलत्या जगात- जिथे आर्थिक असमानता वाढत आहे, तिथे रूढार्थाने चालत आलेले विचार आणि प्रणाली थिटी पडते. जसजशी ब्रेक्झिटची प्रक्रिया सुरू होईल, तसतसे सत्ताधारी पक्षातील मतभेद वाढत जातील. Bremain आणि Brexit ला पाठिंबा देणाऱ्यांच्या संख्येत फारशी तफावत नसल्याने तेरेसा मे यांचे सरकार कधीही पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या संसदेत असलेला विरोधी पक्षसुद्धा नेतृत्व आणि पक्षसंघटना टिकवण्यासाठी धडपडतो आहे. अशा परिस्थितीत ‘युकीप’ नव्या संधीची वाट पाहत आहे. ब्रेक्झिटच्या अंमलबजावणीवर ‘युकीप’ बारकाईने लक्ष ठेवून राहील आणि निवडणुकीच्या रिंगणात पुढील संघर्षांची तयारी करत राहील.

नायजेल फराज यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून लोकांना विचारप्रवृत्त केले आहे. जागतिकीकरणामुळे देशाला खरोखरीच फायदा झाला आहे का? जर नॉर्वे-स्वीडनसारखे छोटे देश स्वावलंबी राहतात, तर इंग्लंडला बाहेरच्यांची गरज काय? प्रगती आणि अधोगतीमध्ये फारतर एकाच पावलाचा फरक असतो. अमेरिका, जर्मनी आणि फ्रान्स या महत्त्वाच्या देशांतील आगामी निवडणुकांवरही नायजेल फराज यांच्यामुळे घडून आलेल्या Brexit ची पडछाया असेल यात शंकाच नाही!
प्रशांत सावंत