छापून आलेलं माझं पहिलं मुखपृष्ठ कोल्हापुरातील प. स. देसाई यांनी प्रकाशित केलेल्या बाळासाहेब शिंदे यांच्या ‘सौ. रेखा’ या कादंबरीसाठीचं. अगदी डिट्टो चित्रकार दलाल यांनी काढलेलं वाटेल अशा त्या माझ्या चित्राचं कोल्हापुरात खूप कौतुक झालं होतं. मात्र, त्यावेळी कोल्हापुरात वास्तव्य असलेल्या नी. गो. पंडितराव यांनी शाबासकी देताना सल्ला दिला होता- ‘नुसतं सुंदर दिसणारं, मोहक वाटणारं म्हणजे उत्कृष्ट मुखपृष्ठ नव्हे; ते अन्वर्थक पाहिजे. लेखकानं जे शब्दांतून सांगितलं आहे ते चित्ररूपानं मुखपृष्ठावर आलं असलं पाहिजे.’
ही गोष्ट १९४८ मधली.
त्यानंतर मी आजवर जवळजवळ १५० पुस्तकांसाठी मुखपृष्ठं रंगवली. त्यामध्ये मराठीतील प्रख्यात, प्रतिष्ठित प्रकाशकांनी प्रकाशित केलेली ज्येष्ठ, श्रेष्ठ तसंच नवोदित लेखकांची गंभीर, तत्त्वविवेचक, विनोदी, इ. इ. विविध प्रकारची पुस्तके आहेत. काही पुस्तकांसाठी मी आतील चित्रंदेखील केली आहेत. हे करताना लेखकांच्या शब्दांतला आशय चित्ररूपात मांडताना त्यामधील दृश्यात्मकता सांभाळण्याचा प्रयत्न मी केला आहे. काही वेळा लेखकाच्या आशयाशी विसंगत वाटणार नाही हे सांभाळून त्याच्या तपशिलात चित्ररूपानं काही भर घालण्याचं स्वातंत्र्यही मी कुठं कुठं घेतलं आहे. आणि हे सर्व करताना नी. गो. पंडितरावांनी माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच दिलेला सल्ला मूलमंत्र म्हणून माझ्या मनात सतत जागृत राहिला आहे.
मुद्रित प्रकाशनांमध्ये- मग ते नियतकालिक असो वा पुस्तक- मुखपृष्ठ हा प्रथम दृष्टीस पडणारा घटक असतो. त्यामुळं त्याची म्हणून एक खास जबाबदारी असते. पाहताक्षणीच लक्ष वेधून घेणं, ही. पण नियतकालिक आणि पुस्तक यांच्या मुखपृष्ठाच्या स्वरूपांत एक मूलभूत फरक असतो. नियतकालिक ही रेल्वेस्टेशने, हमरस्ते यावरील स्टॉल्सवर विक्रीसाठी ठेवलेली असतात. आणि त्यातील अपेक्षित वाचनीयता मर्यादित काळापुरती असते. तर पुस्तकं विक्रीसाठी ग्रंथभांडारांतून ठेवली जातात आणि त्यांची वाचनीयता कालनिरपेक्ष असते. मुखपृष्ठचित्रांच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा भेद आहे. नियतकालिकांवरील मुखपृष्ठचित्राचा आशय पाहताक्षणी लक्षात येईल असा साधा, स्पष्ट असला पाहिजे. तर पुस्तकावरील मुखपृष्ठ सावकाशीनं, त्यामधील लहानसहान तपशील निरखत रसास्वाद घेण्यासारखे असू शकते. नव्हे, पुन्हा पुन्हा पाहण्यास रसिकास उद्युक्त करण्यासाठी ते आवश्यक ठरू शकते.
मुखपृष्ठचित्र नियतकालिकावरील असो अथवा पुस्तकावरील- आपला आशय पोहोचवण्यासाठी ते प्रामुख्यानं शब्दांपेक्षा दृश्यात्मकतेवर अवलंबून असते. दृश्यात्मकतेची स्वत:ची म्हणून एक भाषा असते. रेषा, रंग, कम्पोझिशन हे या भाषेचे घटक. ‘चित्र’ या भाषेमध्ये संवाद करते. आणि चित्राचा आस्वाद घेण्यासाठी या भाषेचा परिचय असावा लागतो. सर्वसाधारणपणे शाब्दिक भाषेइतकी ही सर्वसामान्यांच्या परिचयाची असत नाही. आणि दृश्य भाषेमधून पोहोचलेला आशय व्यक्तिगणिक भिन्न भिन्नही, पण तेवढाच समर्थनीयही असू शकतो. त्यामुळं चित्रांबद्दल शाब्दिक भाषेत बोलताना ही एक अडचण असते.
‘चित्र’ या दृश्यमाध्यमाची ही वैशिष्टय़ं मनाशी ठेवूनच मी आजवर केलेली व प्रसिद्ध झालेली निवडक मुखपृष्ठचित्रं सादर करीत आहे. त्यावरील माझ्या अल्प शाब्दिक प्रस्तावनेसह..
‘सावित्री/ अवलोकिता’ – पु. शि. रेगे
गंभीर आशयाच्या पुस्तकांसाठी मी आजवर जी मोजकी मुखपृष्ठं केली त्यामध्ये सिंधू पब्लिकेशनच्या पु. शि. रेगे यांच्या ‘सावित्री’ आणि ‘अवलोकिता’ या दोन कादंबरीकांच्या इंग्रजी अनुवादाच्या एकत्रित आवृत्तीचं माझं मुखपृष्ठ आजही लक्षणीय आणि महत्त्वाचं म्हणून आठवतं.
चित्राच्या पांढऱ्या-कोऱ्या पाश्र्वभूमीवर चित्राच्या उजव्या कोपऱ्यात उंचीवर चित्राचा जेमतेम एक-दशांश भाग व्यापलेले उंचीवर जमा झालेले, केव्हाही बरसतील अशा पावसानं तुडुंब भरलेले ढग आणि चित्राच्या खालील फक्त पाव भागात टोकदार टोकानं अलंकारिक शैलीत कमीत कमी तपशील रेखाटलेले. आणि पावसाच्या आगमनाआधी सुटलेल्या वाऱ्यामुळं झुकलेलं झाड व त्याखाली पावसाच्या अपेक्षेनं आतुरतेनं वाट पाहत थांबलेला मोर. या मोराचा मोरपिशी रंग वजा करता सर्व चित्र पांढऱ्या-कोऱ्या कागदावर. या दृश्य तपशिलांतून कादंबरीतील काव्यमयता आणि रेगे यांचं खास वैशिष्टय़ समजली जाणारी अल्पाक्षरी निवेदनशैली दृश्यस्वरूपात व्यक्त करण्याचा मी येथे प्रयत्न केलेला आहे.
‘शांतता! कोर्ट चालू आहे’ – विजय तेंडुलकर
पु. शि. रेगे यांच्या वरील कादंबऱ्यांमधील काव्यमय, आल्हादकारी आशयाच्या नेमका विरुद्ध असा माणसांमधील क्रौर्य, हिंसा, निर्दयता वगैरेचे दर्शन घडविणाऱ्या तेंडुलकरांच्या या नाटकाच्या मौज प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या पुस्तकासाठी मी केलेले हे मुखपृष्ठ. आदिमकाळापासून जगण्यासाठीच्या झगडय़ात टिकून राहण्यासाठी निर्दयता, क्रौर्य रक्तात बाणवून घेऊन हिंसेचा आश्रय घेणं माणसाला भाग पडत आलं आहे. युगायुगांनंतरही आजच्या जगात परिस्थिती तशीच आहे. आणि वरवर सुसंस्कृत दिसणाऱ्या माणसात हे ‘गुण’ सुप्तावस्थेत टिकून राहिलेले आहेत. आणि प्रसंग पडताच न्याय देण्याचे निमित्त काढून ते कसे उफाळून वर येतात, याचं हे नाटक चित्रण करतं.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर राखी रंगाच्या पाश्र्वभूमीवर गडद काळ्या रंगामध्ये कमीत कमी तपशिलात आसुरी आनंद झालेला न्यायाधीशाचा मुखवटा चित्रित केला आहे. तो नाटकाच्या मूडशी सुसंगतच आहे. रेगे यांच्या कादंबऱ्यांसाठी पांढऱ्या पाश्र्वभूमीवरील लयबद्ध रेषांमध्ये केलेल्या रेखाटनाच्या तुलनेत या नाटकाच्या मुखपृष्ठातील राखी आणि गडद काळ्या रंगाचा वापर दोन्ही कलाकृतींमधील परस्परविरुद्ध मूड अधोरेखित करतो.
‘निंबोणीच्या झाडामागे’ – मंगेश पाडगांवकर
दैनंदिन जीवनात भेटणाऱ्या व्यक्ती, समोर घडणारे प्रसंग, कानावर पडणारी शेरेबाजी या गोष्टी नेहमीच्या म्हणून सवयीच्या झालेल्या असतात. पण काही वेळा त्या गमती गंभीर विचारतरंग आपल्या मनात उठवतात. पाडगांवकरांनी नोंदवलेल्या अशा काही आठवणी अनुभव प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या संग्रहात आहेत. त्यासाठी मी केलेलं मुखपृष्ठावरील चित्र त्यामधील ‘निंबोणीच्या झाडामागं’ या लेखावर आधारलेले आहे.

‘चांदोबा चांदोबा भागलास का। निंबोणीच्या झाडामागे लपलास का’ हे गाणं अगदी लिहायला, वाचायला येण्यापूर्वीपासून आपल्या माहितीचे झालेलं असतं आणि त्याच्याशी गट्टी जमलेली असते. हा सर्वाचा अनुभव आहे. मुखपृष्ठावरील चित्रात घराच्या गच्चीवर चांदण्यात म्हणून जमलेली लहान भावंडं पौर्णिमेचा चंद्र पाहून प्रचंड खूश होऊन त्याला चांदोबावरचं हे गाणं ऐकवत आहेत. त्याचवेळी खाली खोलीत बसलेले त्यांचे वडील खिडकीतून दिसणारा तोच चंद्र पाहून चांदण्याचा आनंद घ्यायच्या ऐवजी खगोलशास्त्राच्या कोणत्या नियमानुसार चंद्राचे किरण आपल्यापर्यंत पोहोचताहेत, याचं गणित सोडवण्यात गुंग झालेले आहेत!
समोर आलेल्या सौंदर्याचा रसिकतेनं आस्वाद घेऊन त्यापासून आनंद उपभोगणं आणि त्याच्या शास्त्रीय विश्लेषणात डोकं पिंजून घेऊन तो गमावणं, यामधला फरक मुखपृष्ठानं चित्रित केला आहे.
‘जिगसॉ’- रामदास भटकळ
राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या संग्रहात आपल्याला निकट सहवास लाभलेल्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंतांची व्यक्तिचित्रं रामदास भटकळांनी सादर केली आहेत. त्याचं मी केलेलं हे मुखपृष्ठचित्र.
मुखपृष्ठावर एका व्यक्तीचं पोट्र्रेट आहे. रंगीत आहे. पाहताक्षणी लक्षात येतं की, त्याची चित्रणशैली नेहमीसारखी नाही. ती एकसंध नाही. वेगवेगळ्या आकाराचे रंगीबेरंगी तुकडे एकत्र जुळवून ते तयार केलेलं आहे. संपूर्ण चित्र या पद्धतीनं जमवलं असलं तरी त्याच्यातला एक तुकडा त्याच्या योग्य जागी बसवता आलेला नाही व तो रंगीतही नाही. या उणिवेमुळं व्यक्तीची ओळख पटण्यात अडचण येत नसली तरी तिचं हे पूर्ण वास्तव चित्रण नव्हे, हे जाणवतं.
तात्पर्य, कोणत्याही व्यक्तीचं शंभर टक्के वास्तववादी व्यक्तिनिरपेक्ष चित्रण कधीच शक्य असत नाही. चित्रण निर्मात्याचा प्रत्यक्षातला त्या व्यक्तीच्या थेट परिचयातून आलेला अनुभव व त्याबरोबरीनं त्याची स्वत:ची समजूत हे परिणाम करणारे घटक असतातच. एका अर्थी व्यक्तिचित्रण हा ‘जिगसॉ’ नावाचा खेळच असतो. तुकडय़ा-तुकडय़ांत विभागलेलं चित्र. सगळे तुकडे उचित पद्धतीनं जुळवून जसंच्या तसं मूळ चित्र तयार करणं हा जिगसॉचा खेळ. भटकळांच्या व्यक्तिचित्र संग्रहासाठीचं सार्थ नाव!

आजवर मी केलेल्या मुखपृष्ठचित्रांमध्ये विनोदी पुस्तकांसाठीच्या चित्रांची संख्या अधिक आहे. व्यंगचित्रकार म्हणून मी केलेली कामगिरी लेखकांना/ रसिकांना/ वाचकांना जास्त प्रभावी वाटल्यामुळं प्रकाशकांच्या निवडीवर झालेला हा परिणाम!
‘पु. ल. एक साठवण’ – संपादक : जयवंत दळवी
पु. ल. देशपांडे यांच्या षष्ठय़ब्दिपूर्तीनिमित्तानं मॅजेस्टिक बुक स्टॉल प्रकाशनानं जयवंत दळवी यांनी संपादित केलेला पु. ल. देशपांडे यांच्या तोवरच्या साहित्यामधील निवडक साहित्याचा हा ग्रंथ प्रकाशित केला. त्याचं मी केलेलं हे मुखपृष्ठ. एखाद्यानं सार्वजनिक क्षेत्रातील केलेल्या संस्मरणीय कामगिरीचा गौरव म्हणून त्याच्या नावाचा स्टॅम्प प्रसृत करण्याची टपाल खात्याची प्रथा आहे. टपाल खात्यानं पु. ल. यांच्या नावाचा स्टॅम्प काढण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्या साहित्य, रंगभूमी, संगीत या क्षेत्रामधील त्यांची कामगिरी दर्शविणाऱ्या स्टॅम्पचे डिझाइन कसे असावे, हे या मृखपृष्ठावर चित्रित केले आहे.
‘पु. ल. नावाचे गारूड’ संपादन : मुकुंद टाकसाळे
पु. ल. देशपांडे यांच्या निधनानंतर मुकुंद टाकसाळे यांनी संपादन केलेल्या व मॅजेस्टिक प्रकाशनानं प्रसिद्ध केलेल्या संग्रहाचं हे मुखपृष्ठ. त्यांच्या आयुष्यभराच्या कामगिरीचा गौरव म्हणून सरकारनं त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ नाणं काढायचा निर्णय घेतला तर त्यासाठीचं माझ्या कल्पनेतील माझं हे डिझाइन.
‘मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास’ – पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
पु. लं.च्या अनेक पुस्तकांसाठी मी जी मुखपृष्ठं केली त्यामध्ये मला स्वत:ला आवडलेल्या चित्रांपैकी मौज प्रकाशनानं प्रसिद्ध केलेलं हे एक पुस्तक. पु. लं.नी स्वत: उघडलेली ही भलीमोठ्ठी डिस्टिलरी म्हणजे हातभट्टी.. वाङ्मयाचा अर्क गाळण्यासाठी. चुलीवरील भांडय़ात ठेवलेला कच्चा माल दिसतोय तो म्हणजे मराठीतील आणि आंग्ल भाषेतील नवी-जुनी सगळी पुस्तकं. अनेक विषयांवरची. या हातभट्टीसाठीच्या चुलीतील अग्नी सांभाळण्याचं काम पुलंनी स्वत:कडे घेतलं आहे व त्यात ते तत्परतेनं कामाला लागलेले दिसताहेत. भट्टीसाठीचा ‘माल’ तत्परतेनं आणून द्यायच्या कामात मीही पूर्ण बिझी असलेला दिसतो आहे. डिस्टिल करून गाळलेला अर्क नळावाटे तळघरातील साठय़ापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे. पुलनिर्मित हा गाळीव अर्क साहित्यातील डॉक्टरेट मिळवण्याचं गॅरंटेड औषध असल्यामुळं तळघरात भरपूर गर्दी जमलेली दिसत आहे. गिऱ्हाईकांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या आकारांच्या बाटल्या ठेवलेल्या आहेत. बरं का!
‘उरलंसुरलं’ – पु. ल. देशपांडे
पुलंचं आतापर्यंत प्रसिद्ध होण्यासारखं सगळं लिखाण प्रसिद्ध झाल्यावर शेवटचं जे काही उरलंसुरलं राहिलं होतं त्याचा हा संग्रह. हा संग्रह मौज प्रकाशनानं प्रसिद्ध केला आहे. त्यासाठीचं माझं हे मुखपृष्ठ. आपल्या रसोईत उभे असलेले पुल जणू त्यांच्या सगळ्या खवय्यांना सांगताहेत- ‘आतापर्यंत माझ्यातलं, माझ्याजवळचं सगळं पाककौशल्य वापरून तुमच्या जिभेचे लाड पुरवले, पोटाला तृप्त केलं. आता माझ्याकडे ‘पु. ल. ब्रँड’ राहिलेले नाहीत. आता देतोय ते शेवटचं उरलंसुरलं. स्वयंपाकाची सर्व भांडी, पातेली सगळं सगळं साहित्य अगदी रिकामं करून धुऊन पालथी घातली आहेत. ती तुम्हाला दिसतातच आहेत की!’
‘आणखी ठणठणपाळ’ – जयवंत दळवी
१९६४ ते १९८४ या वीस वर्षांमध्ये जयवंत दळवींनी ‘ललित’ मासिकात ‘ठणठणपाळ’ या टोपणनावानं साहित्य क्षेत्रातील घटनांवर विनोदी टिपणं लिहिली. त्यामधली चेष्टा बहुमतानं ‘निर्विष’ ठरवली व मजेनं स्वीकारली गेली. त्यामुळं भरपूर गाजलीही. ठणठणपाळच्या लिखाणाशेजारी त्याचं म्हणून जे अर्कचित्र छापलं जाई तेही तसंच सगळ्यांच्या ओळखीचं झालं. त्याच्या त्या ‘हातोडय़ा’सहित! या लेखाचा पहिला संग्रह मॅजेस्टिक प्रकाशनानं प्रसिद्ध केला. त्याचं भरपूर स्वागत झालं. त्यामागून ‘आणखी ठणठणपाळ’ या मथळ्यानं दुसरा संग्रह मॅजेस्टिकनं प्रसिद्ध केला. त्याचं मी केलेलं हे मुखपृष्ठ.
पहिला हातोडा टाकून देऊन (कदाचित वापरून वापरून झिजला असेल म्हणून!) दुसरा नवा हातोडा घेऊन ठणठणपाळ चित्रासाठी सज्ज होऊन उभा राहिलेला दिसतो आहे!
‘विक्षिप्त कथा’ – जयवंत दळवी
जयवंत दळवींनी विनोदी कथाही भरपूर लिहिल्या व त्यांचे संग्रहही प्रसिद्ध झाले आहेत. त्यापैकी ‘विक्षिप्त कथा’ हा एक. त्याचं मी केलेलं हे मुखपृष्ठ.
मी चित्रित केलेल्या प्रसंगात एक म्हातारा कुत्रा विक्षिप्त परिस्थितीत पकडला गेलेला आहे. रस्त्यात कुठंही खांब दिसला की पाय वर करून त्यावर ‘शू’ करायची कुत्रा जमातीची जन्मजात सवय आणि प्रथा. पण विशिष्ट परिस्थितीपायी चित्रातला हा कुत्रा वयानं अनुभवी असूनदेखील आपल्या जमातीची प्रथा मोडायची पाळी त्याच्यावर आली आहे. कुत्रा थबकलेला आहे, कारण खांबाच्या वरील टोकावर तरुण सुंदर सिनेनटीचं चित्र चिकटवलेलं खालूनसुद्धा दृष्टीला पडतं आहे! काय करायचं? विक्षिप्तच परिस्थिती आणि अडचण आहे की!
‘कानोकानी’ – कलंदर
‘कलंदर’ या टोपणनावानं अशोक जैन यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या साप्ताहिक पुरवणीत ‘कानोकानी’ या मथळ्यानं अनेक र्वष सदर चालवलं. त्यामधील निवडक लेखांचा संग्रह रोहन प्रकाशननं प्रसिद्ध केला. त्यासाठी मी मुखपृष्ठ चित्रित केलं ते हे!
जैनांनी आपल्या मिश्कील शैलीत सभोतालच्या राजकीय, सामाजिक तसंच वाङ्मयीन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील घटना, नेत्यांची वक्तव्यं यांच्या निमित्तानं अनेकांच्या लेखणीनं टोप्या उडवल्या आणि वाचकांना त्यातील निर्विषतेमुळं निखळ आनंद मिळाला.
स्वत: अशोक जैन यांनी दोन्ही हातात टाक घेऊन, ते वापरून सगळ्यांची कशी भंबेरी उडवली, तारांबळ उडवली, ती हे माझं चित्र बारकाईनं आणि एकेक तपशील सावकाशीनं पाहिलं म्हणजे लक्षात येईल. मात्र, त्यासाठी चित्र पाहावयास मुबलक वेळ दिला पाहिजे.
उदाहरणार्थ, एका हातातील टाक नेत्याची गांधी टोपी उडवून लावतो आहे, तर दुसऱ्या हातातील टाक लेखकाच्या पोटाला डिवचतो आहे; पायानं ढकलून दौतीतील शाई दुसऱ्या लेखकाच्या टकलावर उपडी करतो आहे.. इ. इ.
‘टप्पू सुलतानी’ – मुकुंद टाकसाळे
जयवंत दळवी आणि अशोक जैन यांच्याप्रमाणेच विनोदी लिखाण करणाऱ्या मुकुंद टाकसाळे यांनीही ‘ललित’मध्ये १९९२ ते २००७ या कालावधीत टोपणनावानं सदरलेखन केलं होतं. ‘आनंदीआनंद’ आणि ‘टप्पू सुलतान’ या नावाने ते प्रसिद्ध होत असे. तुलनेनं तरुण असलेल्या व साहित्य क्षेत्रात नव्यानं पदार्पण करीत असलेल्या या लेखकानं आजूबाजूच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील तत्कालीन कार्यकर्त्यांच्या कृती व वक्तव्यं यांना निशाणा करून, पण निर्विष अशी चेष्टा करणार सदरलेखन केलं. त्यामधील निवडक लिखाणाचे ‘आनंदीआनंद’ आणि ‘टप्पू सुलतानी’ या नावानं मॅजेस्टिक प्रकाशनानं दोन संग्रह प्रसिद्ध केले आहेत. त्यापैकी ‘टप्पू सुलतानी’चं माझं हे मुखपृष्ठचित्र. छापील मजकुरामध्ये मोकळी जागा करून घेऊन मजकुरालाच टपली मारणारा टप्पू सुलतान या चित्रात दिसतो आहे.
‘मी न माझा राहिलो!’ – रमेश मंत्री
रमेश मंत्रींच्या निधनापश्चात अनुभव प्रकाशनानं प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाचं हे मुखपृष्ठचित्र मी केलेलं आहे. मंत्री हे त्यांच्या हयातीत गाजलेलं व्यक्तिमत्त्व होतं. आयुष्यभर सातत्याने लेखन करून दीडशेहून अधिक पुस्तकांची त्यांनी निर्मिती केली. त्यात प्रामुख्यानं विनोदी पुस्तकांची संख्या अधिक होती. जगभर हिंडून अनेक देशांना भेटी दिलेल्या, सतत हसत-खेळत, सभोवतालच्यांना हसवत जगण्यातला आनंद मुक्तपणे घेणाऱ्या मंत्रींना शेवटच्या पर्वात अर्धागवायूच्या झटक्यानं गाठलं. शारीरिक हालचाल करणं जवळजवळ अशक्य होऊन बसलं. वाचाही गेली. नेहमी भटकत राहणाऱ्या या माणसाला घरीच एका खुर्चीवर स्थानबद्ध अवस्थेत काळ कंठणं नशिबी आलं.
त्यांच्या निधनानंतर त्यांच्या प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठचित्रात त्यांच्या अखेरच्या स्थितीतलं चित्रण मी केलं आहे. ते दु:खांतिकेचंच चित्र आहे. राखी रंगाचं प्राधान्य असलेल्या खोलीमध्ये अंधार दाटू लागल्याच्या पाश्र्वभूमीवर संध्याकाळ होऊ लागलेल्या आकाशातील भगवा रंग खिन्नत्वच अधोरेखित करतो.

Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
jalgaon, raver lok sabha seat, rohini khadse, eknath khadse, facebook page, remove father s image, ncp sharad pawar, bjp, maharashtra politics, lok sabha 2024, election 2024, marathi news,
रोहिणी खडसे यांच्या फेसबुक पानावर एकनाथ खडसे यांच्या छायाचित्रास फाटा
amravati, politics, sanjay khodke, navneet rana, ncp, bjp, lok sabha election 2024
अमरावतीत राजकीय वैरत्‍वाचा दुसरा अंक
sanjay raut prakash ambedkar (4)
“वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला”, प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर संजय राऊत म्हणाले, “आम्ही आता त्यांना…”