06 July 2020

News Flash

साहिर आणि जादू

साहिरचं मयत घेऊन गेले त्याच्या अगोदरची ही गोष्ट. मी जादूची गोष्ट सांगतोय आणि उल्लेख आहे साहिर लुधियानवी यांचा. जादू आणि साहिर यांचं नातं न्यारं आहे. जादू

| February 20, 2013 08:16 am

साहिरचं मयत घेऊन गेले त्याच्या अगोदरची ही गोष्ट. मी जादूची गोष्ट सांगतोय आणि उल्लेख आहे साहिर लुधियानवी यांचा.
जादू आणि साहिर यांचं नातं न्यारं आहे. जादू म्हणजे जावेद अख्म्तरचं प्रेमाचं नाव. निक नेम. त्याचा थाट कवीचा आणि बंडखोराचाही. आख्खं खानदानच असं. जादूचे वडील म्हणजे विख्यात उर्दू कवी जां निसार अख्म्तर. श्रेष्ठ शायर मजाज़्‍ा हे जादूचे मामा आणि कैफी आज़्‍ामी हे आता त्याचे सासरे.
जादूनं बापाची कधी बूज राखली नाही. कसला तरी राग होता त्याच्या मनात. नाराजी त्याच्या नसानसांत भिनलेली होती. तो वडिलांच्या खिलाफ. आई हयात होती तोवर जादूनं बापाला थोडं सहन केलं. ती गेल्यावर मात्र जादू ऊठसूट घर सोडायचा आणि साहिरकडे जाऊन थडकायचा. त्याचा चेहरा पाहून साहिर काय समजायचं ते समजत- बापाशी भांडून आलाय. साहिर तो विषयच काढत नसत. त्यांना ठाऊक होतं की, विषय काढला की जादू आधी संतापेल आणि मग रडेल. दोन्ही परिस्थितीत त्याला सांभाळणं ही कठीण गोष्ट.
अशा वेळी साहिर काही बोलत नसत. थोडा वेळ जाऊ देत. मग म्हणत, ‘‘जादू, चल ये. नाश्ता करून घे.’’ नाश्ता करता करता जादू स्वत:च सगळं सांगून मनातली वाफ काढून टाकायचा. आख्खा दिवस साहिरच्या घरीच घालवायचा. कधी कधी साहिर त्याला सावध करत : ‘‘हे पाहा, (जां निसार) अख्म्तर दुपारचं जेवायला इथं येणारेय.’’ जादू डोळे वर करून साहिरकडे पाहायचा. ‘इथंही निवांतपणा नाहीच!’ असा नजरेत एकूण भाव. शक्य असतं तर त्यानं साहिरना सांगून टाकलं असतं- ‘‘हा माझा बाप.. प्रत्येक ठिकाणी, दरवेळी.. का?’’
जादू हा मुलगा जां निसार अख्म्तरचा; परंतु त्यानं स्वभाव घेतला मामाचा- मजाज़्‍ाचा. खूप भावुक आणि रागीट. साहिर यांनी जादूचा मुलाप्रमाणे प्रतिपाळ केला आणि मित्राप्रमाणे त्याला सांभाळलं. साहिर सांगायचे, ‘‘जादू, इरॉसला खूप चांगलं पिक्चर लागलंय, यार. काय बरं नाव सिनेमाचं.. जा, पाहून ये.’’ जां निसार घरी आले तर बाप-मुलाचा सामना होईल.. तो होऊ नये म्हणून साहिर ही सिनेमाची शक्कल लढवत. साहिर-जादू हे नातं अतिशय वेगळं होतं.
एकदा जादूनं साहिरचं घर सोडलं. ‘‘तुम्हीच माझ्या बापाला डोक्यावर चढवून ठेवलंय,’’ असं म्हणाला. यावर साहिर नुस्तं हसले. तर जादू म्हणाला, ‘‘माझा बापसुद्धा असाच हसत असतो मला. मला कुणीच नको. ते नको, तुम्हीही नको.’’ एवढं बोलून तो साहिर यांच्याशी भांडून बाहेर पडला. नंतरचे काही दिवस तो गायब होता. स्वाभिमान पुष्कळ. नाक वर असायचं नेहमी. अन् त्याहून वर त्याचा तोरा. कुठं जेवला, झोपला कुठ- ठाऊक नाही.
कमाल अमरोही प्रॉडक्शन्सचे एक मॅनेजर होते. त्यांच्याशी जादूची गट्टी जमली. त्यांच्याबरोबर संध्याकाळ काढायची आणि स्टुडिओच्या प्रॉडक्शन स्टोअरमध्ये रात्री झोपायचं- असा जादूचा क्रम. स्टोअरमध्ये प्रॉडक्शनशी संबंधित सगळं सामान भरलेलं असायचं. मीनाकुमारीच्या फिल्मफेअर ट्रॉफ्या तिथं होत्या. पुरुषभर उंचीच्या एका आरशासमोर जादू उभा राहायचा. स्वत:च स्वत:ला फिल्मफेअरची ट्रॉफी प्रदान करायचा. स्वत:च ती स्वीकारायचा. उपस्थितांच्या वतीनं टाळ्या वाजवायचा आणि कमरेत थोडं वाकून स्वत:च आभारही मानायचा. ‘रात्री झोपी जाण्यापूर्वी जवळजवळ रोज फिल्मफेअर पुरस्काराची मी तालीम करायचो,’ असं जादूनं नंतर एका मुलाखतीत सांगितलं. कमाल अमरोही स्टुडिओत त्यानं पुष्कळ दिवस असे काढले.
बऱ्याच दिवसांनंतर साहिर यांच्या घरी जादू दिसला. तोंड उतरलेलं, चेहरा सुकलेला. साहिरनी लाडानं त्याला जवळ बोलावलं. जादूचा राग ओसरला नव्हता.
‘‘फक्त तुमची बाथरूम वापरणारेय. आंघोळीसाठी. आणि तुमचा साबण. तुमचा होकार असेल तर..!’’
‘‘जरूर..’’ साहिरनी परवानगी दिली आणि ‘‘काहीतरी खाऊन घे,’’ असं ते जादूला म्हणाले.
‘‘खाईन कुठंही. तुमच्याकडे खायचं नाहीये..’’
जादू आंघोळ करून आला. ड्रेसिंग टेबलवर शंभर रुपयांची नोट साहिरनी ठेवलेली. आणि ते केसांवर फणी फिरवत होते. ‘हे शंभर रुपये घे,’ असं जादूला कसं सांगायच,ं या विवंचनेत ते होते. मनातल्या मनात शब्द जुळवत होते. जादूचा मानी स्वभाव साहिरना ठाऊक होता. अन् म्हणूनच ते त्याची इज्जत करायचे. प्रसंग बांका. शेवटी थोडय़ाशा धास्तीनं साहिर म्हणाले, ‘‘जादू, हे शंभर रुपये ठेव. परत घेईन मी तुझ्याकडनं.’’
त्या काळात शंभर रुपये ही फार मोठी रक्कम होती. शंभराचे सुट्टे करायला लोक बँकेत जात किंवा पेट्रोल पंपावर. साहिर यांच्यावर उपकार करत असल्याच्या थाटात जादूनं शंभराची नोट घेतली. ‘‘ठेवतो. पगार झाला की परत करीन,’’ असं म्हणाला.
शंकर मुखर्जी यांचा साहाय्यक म्हणून जावेद काम करू लागला. तिथं त्याला सलीम खान भेटला. नंतरच्या काळात जादूनं पुष्कळ पैसे कमावले. आपल्या मामाला आदर्श मानल्याप्रमाणे तो दारू प्यायचा आणि पिऊन झालं की साहिर स्टाईलमध्ये आपल्या बापावर राग काढायचा. दारू पिऊन झाली की साहिर शिव्यागाळीवर येत.
जादूनं शंभर रुपये काही साहिरना परत केले नाहीत. हजारो कमावले. लाखावरी पैसा आला जादूकडे. परंतु तो साहिरना नेहमी- ‘‘तुमचे शंभर रुपये मी खाल्ले,’’ असं सांगायचा. आणि साहिर त्याला सांगत, ‘‘ते मी तुझ्याकडनं काढून घेईन, बेटा..!’’
अशी ही शाब्दिक चकमक दोघांत अखेपर्यंत चालत राहिली. अन् दोस्तीही कायम राहिली. खरं तर साहिरना खूप मित्र नव्हते. जे काही होते त्यांची ते मनापास्नं बूज राखत. संध्याकाळी दारू पिऊन झाली की ते अनेकांची ऐशीतैशी करून टाकत. ओमप्रकाश ‘अश्क’ हे साहिर यांचे जुने मित्र. अनेक र्वष ते साहिर यांच्या घरी मुक्कामाला होते. साहिर तेव्हा विख्यात उर्दू कथाकार कृष्णचंद्र यांच्या इमारतीत राहत असत. एके दिवशी अश्कसाहेबांनी माझ्यासमोर साहिरना पंजाबीत विचारलं, ‘‘साहिर, दारू प्यायल्यानंतर तू शिवीगाळीवर का येतोस?’’
साहिरनी पंजाबीतच उत्तर दिलं- ‘‘दारूबरोबर काहीतरी चटपटीत हवं ना, यार!’’
एक होते डॉक्टर कपूर. साहिर यांच्या मित्रवर्तुळातले. डॉक्टर स्वत: हृदयविकारानं आजारी. आणि साहिर यांच्यावर ते हृद्रोगाचा उपचार करायचे. साहिर त्यांना म्हणत, ‘‘कपूर, मी तुझ्याकडे यायचं ते तुझी तब्येत विचारायला, की माझी तब्येत दाखवायला?’’
ती संध्याकाळ. त्या शेवटच्या संध्याकाळीही असंच काहीसं झालं. बऱ्याच वर्षांनंतर साहिर यांचं स्वत:चं घर झालं होतं- ‘परछाईयां’! तर डॉ. कपूर यांचा बंगला वर्सोव्याला. एव्हाना जादू एक आघाडीचा, यशस्वी लेखक झाला होता.
त्या संध्याकाळी साहिर डॉ. कपूरना पाहायला गेले. डॉक्टरसाहेबांची तब्येत ठीक नाहीए असं कळलं म्हणून! विख्यात हार्ट स्पेशालिस्ट डॉ. सेठ कपूरना पाहायला यायचे होते. मला वाटतं, (सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक) रामानंद सागरसुद्धा तिथं हजर होते, किंवा ते नंतर आले असावेत. डॉ. कपूरना बरं वाटावं म्हणून साहिर डॉक्टरसाहेबांच्या पलंगावर पत्त्यांचा डाव मांडून बसले. साहिर पत्ते पिसत होते आणि तीव्र वेदनेनं त्यांचा सगळा चेहराच ताठरला. ते डॉ. कपूर यांच्या लक्षात आलं.  कळा दाबण्याचा प्रयत्न करीत होते साहिर. ‘‘साहिर..’’ डॉ. कपूर यांनी हाक मारली आणि तेवढय़ात साहिर डॉ. कपूर यांच्या पलंगावर कोसळून पडले. डॉ. सेठ आले. हृदय परत सुरू करण्याचे खूप प्रयत्न झाले, परंतु साहिर गेले होते. डॉ. कपूर घाबरलेले. रामानंद सागर तात्काळ त्यांना आपल्या घरी घेऊन गेले.
साहिर यांचा ड्रायव्हर अन्वर धावत आला. त्यानं प्रेताचा ताबा घेतला. यश चोप्रा साहिरच्या अतिशय जवळचे. त्यांच्याकडे कळवलं. ते श्रीनगरला गेले होते. जावेद अख्म्तरला निरोप गेला. ड्रायव्हर नसल्यानं तो टॅक्सीनं डॉ. कपूर यांच्या घरी आला, अन् त्याच टॅक्सीतनं जावेद साहिरना घेऊन ‘परछाईयां’मध्ये आला. अन्वर आणि टॅक्सीवाल्याच्या मदतीनं साहिरना पहिल्या मजल्यावरच्या त्यांच्या घरी घेऊन आला.
इतका वेळ निबिड, नि:शब्द मौन घेऊन वावरणाऱ्या जावेदचा ‘परछाईयां’ला आल्यावर बांध फुटला. साहिरना घट्ट कवटाळून तो असा रडला.. आयुष्यात कधीही रडला नसेल असा. रात्रीचा एक वाजला होता. कुठं जायचं? कुणाला सांगायचं, बोलवायचं? काहीही न करता जादू साहिर यांच्यापाशी बसून राहिला. शेजारपाजारचे लोक आले. ‘‘काही वेळातच प्रेत आखडून जाईल,’’ असं एक शेजारी म्हणाला. ‘‘दोन्ही हात छातीला बांधून टाका. नाहीतर पुढे त्रास होईल.’’
जादू रडत होता आणि लोकांनी सांगितल्याप्रमाणे सगळं काही करत होता. सकाळ होता होता सगळ्यांना फोन करणं सुरू केलं. बातमी पसरली आणि लोक ‘परछाईयां’वर येऊ लागले. बसायला चादर अंथर, खुच्र्या हटव, पलीकडचं दार उघड.. एखाद्या लहान मुलाप्रमाणे जादू रडत होता आणि सगळी कामं करीत होता.
अंत्ययात्रेची तयारी करण्यासाठी जादू खाली आला तर पाहतो तो काय, की रात्रीचा टॅक्सीवाला उभाय.
‘‘ओह.. सांगायचं नाही? किती पैसे झाले तुझे?’’ टॅक्सीवाला सुसंस्कृत होता. त्यानं पटकन् हात जोडले अन् म्हणाला, ‘‘साहेब, पैशासाठी नव्हतो थांबलो. रात्री कुठं गेलो असतो?’’
जादूनं खिशातनं पैशाचं पाकीट काढलं.
टॅक्सीवाला परत म्हणाला, ‘‘नाही साहेब.. राहू द्या साहेब.’’
जादू जवळजवळ ओरडून म्हणाला, ‘‘हे घे. हे शंभर रुपये ठेव. मेल्यावरसुद्धा स्वत:चे पैसे वसूल केले!’’
आणि जादू  स्फुंदून स्फुंदून रडू लागला.
साहिरचं मयत घेऊन गेले त्याअगोदरची ही गोष्ट.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2013 8:16 am

Web Title: gulzar book dyodhi sahir ludhianvi and his magic
टॅग Diwali
Next Stories
1 फुटपाथवरून…
2 झड
3 सारथी
Just Now!
X