मी अनघा. एक सुशिक्षित, सुस्वरूप, उच्चविद्याविभूषित तरुणी. एका सुसंस्कारित कुटुंबात मी लहानाची मोठी झाले. आई-वडिलांच्या छत्रछायेखाली सुरक्षित कवचात भावंडांसोबत वाढले. लहानपणापासून माझ्यावर इतर छंदांबरोबर वाचनाचेही संस्कार झाले. त्यातून वेगवेगळय़ा विषयांवर माझी अशी काही मतं बनत गेली. ती ठाम होत गेली. पुढे मी त्याविषयी आग्रही होऊ लागले. शिक्षण पूर्ण झालं. नोकरीमुळे आíथक स्वातंत्र्यही मिळालं. अर्थातच योग्य त्या वयात आई-वडिलांनी माझ्यासाठी अनुरूप जोडीदार शोधावयास सुरुवात केली. पण तोपर्यंत वाचनाने, विचाराने मला लग्न आणि एकूणच विवाहसंस्थेविषयी प्रचंड आकस निर्माण झाला होता. इतका, की लग्नच करू नये, या हट्टात तो बदलला.
माझ्या कुटुंबात- अगदी जवळच्या नातेवाईकांतही कुठेही तुटलेल्या-मोडलेल्या लग्नाचा पूर्वेतिहास नव्हता. पण तोवर मला विवाहसंस्थेविषयी अनेक प्रश्न पडायला लागले होते. लग्न ‘स्त्री’ला काय देतं, या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं. स्त्रीचे अनेक प्रश्न, ती भोगत असलेली दु:खं ही लग्नामुळेच निर्माण झालीयत असं मला वाटे. लग्न टिकावं म्हणून स्त्रीला केवढा आटापिटा करावा लागतो. तडजोडी कराव्या लागतात. जणू काही लग्न टिकावं ही एकटय़ा स्त्रीचीच जबाबदारी असते. असं का? उत्तर मिळत नव्हतं. याचंच पर्यवसान बहुधा मग ‘मला लग्नच करायचं नाही’ ही टोकाची भूमिका होण्यात झालं. ‘गद्धेपंचविशी’चा तो काळ होता. या वयात जाचक नियमांची चौकट मोडून-तोडून टाकावीशी वाटते. आखीवरेखीव नसलेलं काहीतरी करावंसं वाटतं. त्यातूनच असेल कदाचित, मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. पण शरीराच्याही काही गरजा होत्या. त्या ऊर्मी दाबून टाकता येत नव्हत्या. लग्न हे शरीरसंबंधांना वैधत्व देतं. आपल्या समाजात पुरुषाला लग्नाशिवाय अनेक पर्याय सहज उपलब्ध आहेत. पण स्त्रीचं काय? तिच्यासाठी ही वाट सहज खुली नाही. विचारांची आवर्तनं सुरू असायची. त्याचदरम्यान मनोज माझ्या आयुष्यात आला. एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटू लागला. पण हे नातं कोणत्या नावानं स्वीकारावं, हे कळेना. ती फक्त मत्री नव्हती, हे निश्चित. विवाहाचं बंधन मला नको होतं. आणि त्यालाही आधीच्या पत्नीने घटस्फोट दिल्याखेरीज माझ्याशी लग्न करता येत नव्हतं. आम्हाला एकमेकांशिवाय राहणं आता अशक्य झालं होतं. शेवटी कुटुंब, आई-वडील, समाज यांचा विचार न करताच आम्ही एकत्र राहू लागलो.
साहजिकच मला गाव सोडावं लागलं. मी शेजारच्याच मोठय़ा शहरात राहू लागले. मोठय़ा शहरात राहण्याचा फायदा असा, की इथे प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात मग्न असतो. इतरांच्या आयुष्यात नाक खुपसत नाही. आम्हीही कोणाला कसली माहिती देणं, स्पष्टीकरण करणं या भानगडीत पडलो नाही. साहजिकच आमचे नवे शेजारी आम्हाला पती-पत्नीच समजू लागले. आणि आता आमचं ‘कुटुंब’ही विस्तारलंय. आज मी दोन मुलांची आई आहे. तीही माझीच गरज होती. मला आई व्हायचं होतं. मग हाही निर्णय घेतला. आज मी माझ्या मुलांमध्ये रमलेय..   
काळ विरोधाची धार बोथट करतो असे म्हणतात. पण आज आठ-दहा वर्षांनंतरही माझ्या आई-वडिलांनी मला स्वीकारलेलं नाही. एक गोष्ट चांगली झालीय. भाऊ-बहिणी व इतर नातेवाईकांचा विरोध मावळलाय. प्रासंगिक त्यांच्याकडे जाणं-येणं सुरू झालंय. मनोजचे नातेवाईकही नातवंडांवर खूश आहेत. माझ्या मुलांचं कोडकौतुक करायला सगळे आहेत. आत्या, काका, मामा, मावशी सगळय़ा नात्यांची ऊब त्यांना मिळतेय. पण एक विरोधाभास मला सातत्याने जाणवतोय. विवाहबंधनात स्त्रीलाच तडजोडी कराव्या लागतात, तिचीच गळचेपी होते असे मानत विवाह नाकारणारी मी- आज विवाह न करताही अनेक बंधनांत अडकलीच आहे की! आम्ही पती-पत्नीसारखेच एकत्र राहतो. उगीच चर्चा कशाला, म्हणून मी मंगळसूत्रही घालते. मुलांच्या शाळेतही ‘वडील’ म्हणून मनोजचंच नाव लावलेलं आहे. लोक मला ‘मिसेस श्रीवास्तव’

(त्याचं आडनाव) म्हणूनच ओळखतात. आणि मी..? लग्नाच्या बायकोसारखंच दोन मुलांच्या शाळेत जाण्या-येण्याच्या वेळा सांभाळते, त्याच्या आवडीनिवडी, खाण्या-पिण्याच्या वेळा यांची काळजी घेते. त्याचे कपडे धुतले की नाही, ते इस्त्री करून आलेत की नाही, याकडे लक्ष देते. त्यासाठी वेळप्रसंगी स्वत:चे प्राधान्यक्रमही बदलते.
आणि तरीही मला वाटतं- तो आणि मी केव्हाही, अगदी कोणत्याही क्षणी एकमेकांपासून वेगळे होऊ शकतो. उगीच एकमेकांना कशाला गृहीत धरा? नको असताना उगीच एकमेकांमध्ये अति गुंतणं नकोच. पटेल तोपर्यंतच एकत्र राहिलेलं बरं!
कदाचित ऐकणाऱ्याला हे फार भयानक, खूपच व्यावहारिक वाटेल; पण प्रेम म्हटलं की विश्वास आला. एकमेकांना सांभाळणं. जपणं आलं. आपलेपणा आला. सोबतच तडजोड आली. अगदी टोकाला जाऊन एकमेकांसाठी काय वाट्टेल ते करणं आलं. एकमेकांवर अवलंबित्वही आलं. आणि हेच मला नको आहे. ज्या गोष्टींसाठी एकत्र आलो त्या पूर्ण होताहेत. मग आता फार जबाबदारीची भावना, एकमेकांसाठी काही करण्याची भावना मी मानत नाही. जोपर्यंत
पटतंय तोपर्यंत ठीक; नाही तर तुझा तू, मी माझी मोकळी !
(नाव बदलले आहे.)