23 February 2019

News Flash

‘ऑक्युपाय’ एक क्लोजअप्!

‘पण तुम्ही इथून जाणार? संपणार हे सगळं? का?’ हा प्रश्न विचारताना आपण हळहळतोय की काय, असं वाटत होतं. बहुधा नाही.. नाही, हळहळ नाही. कारण हे जे

| February 4, 2013 07:28 am

‘पण तुम्ही इथून जाणार? संपणार हे सगळं? का?’
हा प्रश्न विचारताना आपण हळहळतोय की काय, असं वाटत होतं. बहुधा नाही.. नाही, हळहळ नाही. कारण हे जे काही चाललंय ते संपलं तरी फार काही बिघडणार नाही, हेही दिसतच होतं.
तरीही हळहळ होती. लाँगशॉट आणि क्लोजअप् यांमध्ये इतका फरक असल्याबद्दल वाटते, तशी…

‘आपल्यासारख्याच अनेक लोकांच्या गरजांना केवळ मागण्यांचं स्वरूप देऊन आता थांबता येणार नाही. कारण ‘गरज- मागणी- पुरवठा’ हे चक्र आपल्याला या राजवटीत फार उपयोगी पडणार नाही. म्हणजे आता राजवट बदलावी किंवा वाकवावी लागेल,’ हे जेव्हा लोकांच्या लक्षात येतं तेव्हा चळवळ सुरू होते. एवढी साधी व्याख्या मनाशी ठेवून ‘ऑक्युपाय’ चळवळीकडे खूप दुरून पाहणं सुरू झालं होतं. ‘हा तर आपला बैठा सत्याग्रहच!’ असं वाटायचं. पण अमेरिकेत सुरू झालेली ‘ऑक्युपाय’ झपाटय़ानं लंडनमार्गे सर्वदूर पसरलेली ही चळवळ आपल्या धरणं, सत्याग्रह यांच्यापेक्षा वेगळा मार्ग शोधते आहे, हेही कळत होतं. हा मार्ग एक प्रकारे इंटरनेट-युगाच्या मर्यादा लक्षात आल्यानंतरचा! इंटरनेटवरून पिटिशनबाजी न करता प्रत्यक्ष रस्त्यावर येऊन दमनकारी यंत्रणांच्या नाकासमोरच ठिय्या देणं आणि तिथंच ‘जगणं’- असा हा मार्ग अमेरिकी किंवा युरोपीय तरुणांनी निवडल्याबद्दल त्यांचं कौतुक वाटत होतं. हे मेणबत्तीबाज नाहीत याचं कौतुक. ‘वी आर द नाइन्टीनाइन पर्सेट’ वगैरे ऑक्युपाय चळवळीच्या घोषणा तर ‘इंडिया विरुद्ध भारत’ या शरद जोशींच्या घोषणेइतक्याच परिणामकारक वाटू लागल्या होत्या.
सिनिकली पाहाल तर- हे म्हणजे दुरून दुसऱ्यांच्या चळवळीचा आस्वाद घेणं सुरू होतं. कुठल्याही आस्वादासाठी जेवढी लायकी, जाणकारी कमवावी लागते, तितकी कमावण्याचा प्रयत्नही सुरू होता. म्हणजे ‘ऑक्युपाय’च्या संदर्भात- तिकडले प्रश्न समजून घेणं. अमेरिका आणि काही प्रमाणात ब्रिटन यांना बसलेला आर्थिक हादरा, युरोपातले स्पेन- ग्रीस- पोर्तुगालसारखे कंगालीकडे निघालेले देश आणि जर्मनीसारखे तुलनेनं संपन्न देश या सर्वाचे आर्थिक प्रश्न वेगवेगळे आहेत. पण बेरोजगारी आणि बेघर असणं हे प्रश्न सामायिक आहेत. या प्रश्नांवरचं उत्तरही सामायिक असावं, अशी दिशा ‘ऑक्युपाय वॉलस्ट्रीट’नं दिलेली आहे. पण तरीही ‘ऑक्युपाय’वाल्यांना गांभीर्यानं घेतलं गेलं, ते त्यांची संख्या जास्त होती म्हणूनच! ही संख्या वाढत होती, तेव्हाही त्या सर्वाचा एकत्र उद्गार म्हणून समांतर विचारधारा पुढं येते आहे असं दिसत नव्हतं. घोषणा होत्या आणि लोक होते. मग विचारधाराही येणार का कधीतरी? तशी वैचारिक मशागत करणारं कुणाचे तरी लेख, महत्त्वाचा ब्लॉग असं काही आहे का? ब्लॉग खूप आहेत; पण एखादा ब्लॉग सर्वपरिचित आहे असं झालंय का? हा शोध ‘नाही.. नाही’कडेच जाणारा होता. ते साहजिकही होतं. ऑक्युपाय चळवळीनं ज्या अनेक गोष्टींविरुद्ध एकाच वेळी बंडाच्या राहुटय़ा ठोकल्या, त्यात ‘व्यक्तीच्या मार्केटिंगला विरोध’ हीदेखील एक गोष्ट होती. ‘मी बोललो तो कार्यकर्ता म्हणून. तसं मी सांगितलंसुद्धा. पण साल्यांनी मला प्रवक्ताच म्हटलं.. सॉरी दोस्तहो..’ असं म्हणणारी एखादी ब्लॉग-नोंद अधूनमधून दिसे. नेता नाही, प्रवक्ताही नाही, याचा एक अर्थ म्हणजे आजवर ‘वर्ल्ड सोशल फोरम’ वगैरेंसारख्या ठिकाणी जी ‘कुणी नेता नाही’ म्हटल्यावरही धनको संस्थांनी आतल्या आत बरोब्बर मांडून ठेवलेली उतरंड दिसते, तीही नसणार ‘ऑक्युपाय’मध्ये!
हे सारे पॉझिटिव्ह अंदाज दुरूनच बांधलेले; पण बऱ्यापैकी ठीकठाक होते. फक्त उतरंड नाही म्हणजे सगळे गुण्यागोविंदानं नांदत असणार, सानेगुरुजींनी दाखवलेलं एका सुरात मानवमुक्तीचा घोष करणाऱ्यांचं चित्र आता कुठेतरी साकार होऊ लागलेलं असणार, हे पुढले अंदाज मात्र सपशेल चुकीचे आणि फसणारेच होते. मुळात या अशा अंदाजांमागे अभ्यासापेक्षा सहानुभूतीच अधिक होती!
त्या सहानुभूतीची लेन्स मला ‘ऑक्युपाय फ्रँकफर्ट’च्या क्लोजअप्कडे घेऊन गेली. जर्मनीत अन्यत्र जाऊन ठरलेली कामं करण्याच्या आधीचा एक दिवस यासाठी मोकळा होता. इथं जे मोठं ‘फ्रांक्फुर्त आम मेन’ स्टेशन आहे, त्याच्या परिसरातच कुठंतरी एक युरोपियन सेंट्रल बँक आहे आणि तिकडे हे ‘ऑक्युपाय’वाले आहेत, एवढंच माहीत होतं. गेलो. ती सेंट्रल बँक विचारावीच लागली नाही इतकी फेमस. युरो चलनाची मध्यवर्ती बँक. तिच्या समोरच प्रचंड- १५ मीटर उंचीचं ‘युरो’चं शिल्प आणि बऱ्यापैकी मोकळी जागा. १५ ऑक्टोबर २०११ रोजी जेव्हा ‘ऑक्युपाय’ आंदोलनाची फ्रँकफर्टमध्ये सुरुवात झाली, तेव्हा ही सगळी जागा म्हणे माणसांनी भरून गेली होती. जुलै २०१२ मध्ये या जागेचा ३० ते ३५ टक्केच भाग तंबूंनी व्यापलेला पाहिला. त्यातही काही तंबू या दिशेला, मध्ये थोडी मोकळी जागा.. तिथं ‘कम्युनिटी स्पेस’सारख्या सोयी. एक मोठा हॉलवजा शामियाना. त्याच्या समोर जुनेपाने सोफा, बाकं.
गावच जणू छोटंसं. दोन वस्त्यांत विभागलेलं. या वस्त्या बहुधा स्वच्छतागृहांची सोय पाहून त्याप्रमाणे झाल्या असणार. कारण राहुटय़ांचा एक कळप ओलांडून पन्नास पावलांवर बांधीव स्वच्छतागृह होतं. तिथल्या पालिकेनंच उभारून ठेवलेलं. तर दुसऱ्या राहुटय़ांच्या कळपापासून तेवढय़ाच अंतरावर फायबरची, भाडय़ानं मिळणारी दोन सिंगल स्वच्छतागृहं. पाहत पाहत जात होतो. यांचं ‘ऑफिस’ नसणारच; पण बहुतेक त्या हॉलवजा शामियान्यात चावडीसारखे काही लोक जमले असणार, असं वाटत होतं.
हॉल मोकळा.
तसंच पुढं गेलो. पल्याड बाजूच्या राहुटय़ा जिथं संपत होत्या, तिथं रस्त्यालगत एक काऊंटरवजा झोपडी होती. तिथंही कुणीच नव्हतं. मग आतच गेलो. तंबूंच्या तिथं.. तर आमची प्रायव्हसी मोडायला हा कोण आला, नि कुठला काळा, असे दहा चेहरे मोजले.
हिय्या का काय म्हणतात तो केलेलाच होता. शिवाय सारे ऑक्युपायी माझे बांधव आहेत, असा स्फुल्लिंग का उत्साह चेतू म्हणत होता. तेवढय़ा भांडवलावर जर्मन येत नसताना एका उघडय़ा तंबूत शिरलो. हाच इथला बऱ्यापैकी उंचीचा- माणसाला उभ्या उभ्या आत येता येईलसा- तंबू होता आणि तिथं एक मुलगा लॅपटॉपसमोर बसला होता. पायाशी कुत्रा. मुलाचं नाव- मार्क. विशीतला असावा. शिक्षण सोडलंय म्हणाला. काय शिकत होता? म्युझिक. मग आता काय? काही नाही. चळवळीचं काम बघतो. इथं सहा संस्था आहेत. त्यांच्यातर्फे हितचिंतक लोक येतात. खाय-प्यायची सोय होते. ‘घेणार का कॉफी?’
‘नको,’ म्हणालो. माझ्याकडे टी-बॅग्ज होत्या भारतीय. त्यातली एक त्याला दिली. तेवढय़ात दुसरा आला. योहान. आणखी एक टी-बॅग. ‘इंद्या’मध्ये ‘मास्साला’ चहा असतो तोच ना हा, असं योहाननं विचारलं. त्याचं बहुसांस्कृतिकत्व अंगोपांगी झळकत होतं. सोनेरी झाक असलेले काळे केस, पण शेलाटा आफ्रिकन. आफ्रिकन ओठांचा आणि इंडियाला ‘इंद्या’ म्हणण्याइतपत इंग्लिशेतर. बोलका. त्यामुळे प्रयत्नपूर्वक इंग्रजीही बोलणारा. काय काम आहे, वगैरे त्यानंच विचारलं. हा म्होरक्याच जणू. आणि होताही तो. काऊंटरवर तोच दिसायचा. लघवीला गेला म्हणून दिसला नव्हता.
मग काऊंटरवर गेलो. तो आत, मी बाहेर.
‘इट वॉज सो बीग..’ अशी योहाननंच सुरुवात केली. लोक हिवाळय़ात पांगले. बरेचजण आले नाहीत परत. मग निराळेच लोक आले. हे जे पलीकडचे तंबू दिसताहेत, ते आधीचे आहेत. आम्ही नंतरचे.
मग हे काऊंटर?
योहान म्हणाला- आम्हीच उभारलं. इथं शहरातल्या ग्रुप्सवर कशाला राहायचं अवलंबून? अमेरिकेपर्यंत कॉन्टॅक्टस् आहेत माझे. मी इंटरनेटवरनंही ‘ऑक्युपाय फ्रँकफर्ट’ टिकवायचा प्रयत्न करतोय, म्हणाला.
एव्हाना योहानच्या बोलण्यात अहंभावाचा वास येऊ लागला होता. लोक येत-जात होते, टूरिस्टांसारखी फोटो काढण्याची सोयही ‘ऑक्युपाय’वाल्यांनीच करून ठेवली होती. शोषक आणि शोषित यांचं कार्टुन. त्यांचे चेहरे कापलेले.. तिथं आपला चेहरा ठेवून फोटो काढायचा. त्याच्या समोरच काऊंटर होतं. लोक येत-जात होते. काऊंटरवरची जर्मन पत्रकं वाचत होते. योहानला काही विचारत होते.. योहानही प्रवक्त्याच्या थाटात माहिती देत होता. शेजारी जरा पुढं बाकं होती. तिथं एक दारूडय़ासारखा दिसणारा माणूस बसला होता, तो उठून आला. योहाननं ओळख करून दिली.. हा कलाशिक्षक होता आणि आता इथंच असतो.. एवढीच. त्याला त्याची कहाणी विचारली, तर तो एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगू लागला. मी स्पेशल स्कूलमध्ये (गतिमंद मुलांच्या शाळेत) शिकवायचो. चित्रकला नि हस्तकला. तिथंच शिकलो होतो. त्यांनी मला काढून टाकलं. हेच तीनदा. विषय बदलण्यासाठी त्याला त्याचा आवडता चित्रकार विचारला. त्याचा चेहरा प्रश्नार्थक. तो दारूडा नव्हता. पण पत्रकारासारख्या हेतूंनिशी त्याच्याशी संवाद अशक्य होता.
दुपारच्या उन्हात पाण्यासाठी म्हणून पुन्हा मार्कच्या तंबूत गेलो. तिथल्या त्या मोठय़ा टेबलावर एक जोडपं खाणं आटोपत होतं. त्यातले दादा पन्नाशीचे, वहिनी पंचेचाळीस वगैरे. आपल्याकडे ट्रेकर जोडपी असतात तसे लहान चणीचे. त्यांच्याशी बोलणं काढलं. पण पाणी देऊन वहिनी निघाल्याच. तंबू मोडला होता एक- तिथं पोहोचल्या. दादा थोडा वेळ ‘भारत.. तिथं नाही का ऑक्युपाय?’ वगैरे विचारत राहिले. ‘टेक्निशियन..’ एवढीच त्यांनी स्वत:ची ओळख सांगितली. मग म्हणाले, कशात काही उरलं नाही.
म्हणजे कशातच! जॉब गेलाय. ‘ऑक्युपाय’ही संपतेय. गट पडलेत. हे या बाजूला राहणारे वेगळे, आम्ही वेगळे. त्या दादांचं हे बोलणं सुरू असतानाच गलका झाला. योहान काऊंटर सोडून रस्त्यावरून परत झाडीच्या दिशेनं गेला. तिथून पाच-सहाजण ‘पोलीस’ असं इंग्रजीत लिहिलेला बंदगळा टी-शर्ट घातलेल्या बाईसोबत बाहेर आले. पोलीसबाईनं त्यांना काहीतरी करताना रंगेहात पकडलंय, पण ती त्यांच्याशी बोलताना पोलिसासारखी नव्हे, तर संघटनेतल्या ताईगिरी करणाऱ्या असतात तशी बोलतेय. योहानसुद्धा एकेकाच्या खांद्यावर हात ठेवून जमेल तेवढी रुजवात घालतोय. लोक जमताहेत भोवती. हे होत असताना दादा मला घेऊन पुन्हा काऊंटरवर आले. ‘कशात काही उरलं नाही..’ हे जे त्यांनी सांगितलं होतं, तसा चेहरा करून भकास बसले- तिसरीचकडे पहात. फ्रस्ट्रेशन यायला असं काम किती हो केलंत तुम्ही, असं विचारावंसं वाटलं.. पण विचारलं नाही. उगाच तोडक्यामोडक्या इंग्रजीत वाद नको. शिवाय आपण एकटे. इथं भांडाभांडी नेहमीचीच दिसत्येय. कारण आता योहान त्या चुकार तरुणाचे दोन्ही खांदे धरून गदागदा हलवतोय त्याला.
योहान परतून, काऊंटरवर बसून स्वत:च सांगतो- ड्रग अ‍ॅडिक्ट आहेत ते. वाट्टेल तिथं मुततात. पालिकावाल्यांना आणि पोलिसांना आयताच ठपका ठेवायला वाव मिळतो. हा समोरचा संडास आधी उघडा असायचा. आता आम्ही कुलूपबंद केलाय. नाहीतर तिथं नशाच चालायची यांची. हे कोण? इथलेच!
एकटेपणा फार वाटू लागला. थोडा योहानशी बोलल्यासारखं करून पुन्हा त्या दादांकडे गेलो. तुमची तिथं ओळख आहे का? त्या वरच्या पाखाडीत? तिथं जरा मला भेटवता का चार लोकांशी बोलायला? – हे विचारल्यावर दादा म्हणतात कसे, मीटिंगच आहे की आता सायंकाळी. भेटतीलच की तेव्हा तिथले सगळे!
ही मीटिंग मोठी होती. विशेष होती. त्याला बिननावाचे दादा, योहान, मार्क सगळेच जाणार होते, हे पुढे मार्कशी बोलताना कळलं. त्यासाठी आज शामियाना हॉलमध्ये ठेवलेला रोमा संगीताचा कार्यक्रम रद्द होणार होता. मधेच एक तरुण आणि एक तरुणी- दोघेही समलिंगी आहेत हे लक्षात यावं असे- मार्ककडे येऊन काही बोलून गेले. यापैकी तरुणी- त्यांच्या संभाषणात सहभागी होण्यासाठी संधीची वाट पाहत असल्यासारखा चेहरा झालेल्या भारतीय माणसाकडे पाहून खिक्कन् हसली. या युरोपीय आढय़तेचं काय करायचं?
ते मीटिंगसाठी आले होते. जरा आधीच. जुलैमधल्या- म्हणजे समर सीझनच्या उन्हाचा भर उतरू लागला होता. एक पोक्त बाई आसपासच्या झाडांना पाणी घालत होत्या. फोटो काढू गेलो की चेहरा वळवून दुसऱ्या झाडाला पाणी. फोटो-पाण्याचा खेळ संपून बोलण्याचा प्रसंगही आला. या मावशी गरीब, वागायला खूपच शांत, बुजऱ्या आणि इंग्रजी न येणाऱ्या होत्या. मग बोलणंच खुंटलं.
दादा भेटले.. त्यांना विचारलं- तुम्ही आणि तुमच्या इथं राहणारे तरी अगदी कुटुंबासारखे झाला असाल, नाही? भारतात ना मोठ्ठी कुटुंबं असतात! तसं वाटत असेल ना! सगळेच आपले.. दादांना समोर जास्त बोलणारा भारतीय माणूस दिसला. म्हणजे त्यांनी तसं पाहिलं. समजूत काढल्यासारखं ते ‘या.. फॅमिली..’ असं म्हणून तडक वहिनींना मदत करायला गेले.
आता दोन सायकलवाले आले होते. पैकी एक कोरियन. जर्मनीत खूप आहेत. बरोबरचा जाड जर्मन. बहुधा सहपाठी. हो, सोशल सायन्सेस- म्हणाला. सोशियॉलॉजी की सोशल वर्क? या प्रश्नावर संवाद तुटलाच असता. उत्तर एकच- सोशल सायन्सेस. नजरेत भारतीयाबद्दल अपरंपार करुणा.
पण हा करुणेचा उंबरठा ओलांडून बोलणं झालं. जर्मन सोप्पंय की अवघड, वगैरेवरून विषय आजच्या मीटिंगकडे गेला. तिथं काय ठरतंय सांगणार का मला, या विनंतीला कोरियनानं मान दिला. मीटिंग खूपच वेळ चालली. खूप खूप वेळ. हा कोरियन आणि जाडा जर्मन त्याआधी एका जाडय़ा बाईंशी बोलत होते. ‘वी विल फाइंड वेज..’ असं ती बाई आवर्जून माझ्यासाठी भाषांतर केल्यासारखं म्हणत होती. व्हॉट्स द प्रॉब्लेम? – यावर बाई आणि कोरियन- ‘बिल्स, बिल्स.. इलेक्ट्रिसिटी, वॉटर..’ म्हणाले.
यांना फक्त जमीनच फुकट मिळत होती. वीज, पाणी, स्वच्छतागृहांचा वापर आणि भाडं यांपायी दहा हजार युरोंहून जास्त देणी थकली होती. ती कशी फेडायची, कोण मदत करील का, अशी चर्चा. ती पुढे मीटिंगमध्ये होणारच होती. पण एकंदर लक्षात आलं की, मीटिंगमध्ये आपण काय बोलायचं, याबद्दल या वरच्या पाखाडीत बरीच एकमेकांत चर्चा चाललीय. त्यामानानं खालच्या पाखाडीतले गाफील आहेत. नाही म्हणायला पोलीसबाई दोघांशी पुन्हा तक्रारीच्या सुरात बोलत होत्या. पण ती तक्रार तिसऱ्याच कुणाबद्दल असावी, अशा. मीटिंगला वेळ होता म्हणून जरा लांबून शक्य तितक्या जास्त तंबूंचा फोटो काढायला गेलो. जाता जाता काऊंटरवर योहानला ‘पोलीस’बद्दल विचारलं.. खरंच आहे ती? नाही. पण फार हुशाऱ्या करते. सरकारीच समजते स्वत:ला. पत्रकार वगैरे कळलं तर बोलणारही नाही. फोटोत कमीच तंबू टिपून परतलो तेव्हा मीटिंगला बरेचजण शहरातूनही आलेले दिसले. मला वाटलं होतं- सगळय़ांशी ओळख होईल, वगैरे. तसं काही नाही. शहरवाले हितचिंतक लोक आले आणि मीटिंग सुरूच झाली. मग केव्हातरी योहान, मार्क आले.
बेघर आणि कुठंतरी घर असणारे ऑक्युपायी- अशी इथल्या पाखाडय़ांतली जनरल विभागणी होती. योहान बेघर; पण त्यांना शिस्त लावू पाहणारा. जरा कार्यकर्तेगिरी केलेला. तो इथं शेळी झाला होता. जास्त बोलत होते, ते हितचिंतकच. फार वेळ जर्मन ऐकून काही कळेनासं झालं. तेवढय़ात एक पंजाबी म्हणून खपेलसा पोरगा दिसला. त्याला मी विचारलंच- आर यू फ्रॉम साऊथ एशिया? ‘साऊथ एशिया? नो! आय अ‍ॅम फ्रॉम पंजाब.. व्हॉट यू से.. पंजाबी मुंडो..’ माझ्या सर्द ‘रिअली?’वर पोरग्याचं विकट हास्य. तेही पंजाबी खलनायकांसारखं.
तो रोमा आहे. त्याचा मोठा भाऊ हॉटेलात वेटरची नोकरी करून आत्ता परतेल. वडील इथंच असतात, नि बाहेर छोटी-मोठी कामं मिळवतात. रुमानियातून जगायला आले, इथं बिनभाडय़ाचे राहिले. ऑक्युपायी झाले. त्यांच्यासाखे जवळपास ६० रोमा! तो शामियाना हॉल होता ना? जिथं आज रोमा संगीताचा कार्यक्रम होणार होता? तिथंच झोपतात हे.
हौशागवशा बेघरांची मीटिंग. ती सुरूच तिकडे. इकडे रोमा पोरग्यानं ‘आवारा हूं..’ म्हणून दाखवलं. त्याच्या भावाचं इंग्रजी नि इटालियनही चांगलं; त्यामुळे इटलीबद्दल गप्पा झाल्या. तिथल्याच हॉटेलांमध्ये रोमाभाऊ काम करायचा. पण यंदा इटलीत जाणे नको. तिथं त्यांचेच हाल चाललेत. म्हणून मुक्काम फ्रँकफर्ट.
मीटिंग संपली. कोरियनाला मी गाठलं. त्यानं तर उजेड असेस्तो बराच भाग चित्रितही केला होता- आयपॅडवर. अतिसुलभीकृत इंग्रजीत त्यानं माहिती दिली. दे से- दे कान्ट पे बिल्स, पुलीस से- धिस प्लेस न्यूसन्स, सिटी गव्हर्नमेंट से- प्लेस डर्टी, सो वी हॅव टु लीव्ह.
झाली डर्टी- आम्ही साफ करू म्हणायचं. सरकारी यंत्रणांना झुलवत ठेवून कार्यभाग साधायचा. आमच्या आझाद मैदानला आले नाय का कधी? मैदान कसले सोडताय?
‘पण तुम्ही इथून जाणार? संपणार हे सगळं? का?’
कोरियन पोरासोबत काही जर्मनांकडे जाऊन विचारलेल्या प्रश्नाला कुणीही सीरियसली
घेतलं नाही.
‘बिलं न भरणारी चळवळ’ या सांस्कृतिक धक्क्यापेक्षा मोठा धक्का या सर्वाच्या मीटिंगमध्ये दिसलेल्या निरुत्साहामुळे आधीपासूनच बसू लागला होता. त्यामुळे काही वाटलं नाही. ऑक्युपाय फ्रँकफर्ट गाशा गुंडाळणार, हेच खरं. पण बेघर आणि रोमांच्या रेटय़ामुळे त्यांनी स्वत:हून तसं केलं नाही. अखेर गेल्या सहा ऑगस्ट रोजी पोलिसांनी हा एरिया अख्खा मोकळा केला.
फ्रँकफर्टमध्ये आता ‘ऑक्युपाय’ दिसत नाही. एखाद् दिवसाचं धरणं धरण्याचा ‘ब्लॉक्युपाय इव्हेन्ट’ आता १४ ते १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे, असा ई-मेल आलाय.
चळवळ वगैरे काही नाही. आंदोलन होईल.. ‘इव्हेन्ट’च म्हणतायत ना ते स्वत:च.
मला या मजकुरासोबत ऑक्युपाय फ्रँकफर्टच्या अख्ख्या परिसराचा एक फोटो टिपायचा होता. पॅन शॉट. तो नाहीच आला. आणि हा क्लोजअप्सुद्धा बिघडलाच.
चळवळ का नाही? पण त्यांना सामूहिक स्वरूप नाही. नुसती गर्दी. पण एकवाक्यता नाही. ‘ते’ काहीतरी करताहेत तर आपणही जावं आणि आपलं भलं करून घ्यावं, असं प्रत्येकाला वाटतंय. काहीजण तर राजकीय जाणिवा असण्यासाठी पुरेसे सक्षम नाहीत, त्यांना सक्षम करणारं कुणी नाही. नेता नसताना चळवळ पुढे जाईल अशी परिस्थिती नाही. आणि कोणत्याच नेत्यावर विश्वास नाही!
‘ऑक्युपाय’चा संघर्ष आहे तसाच, पण घोषणा न देता, तंबूऐवजी घरीच राहून आणि फार सपक पद्धतीनं आपण करतच असतो. ‘ऑक्युपाय’नं त्याला प्रतीकरूप दिलं. ही प्रतीकं देशोदेशी शोषकांसाठी निरनिराळ्या डोकेदुख्या उत्पन्न करण्यात यशस्वी ठरली. पण प्रतीक म्हणजे चळवळ नव्हे,  हे समजून घेऊन पुढे ‘चळवळ’ बळकट करण्याची संधी आपण-तुपण सर्वानी गमावली.

First Published on February 4, 2013 7:28 am

Web Title: occupy movement a close look