लोकसत्ता दिवाळी अंक २०१७

ज्या इंदिराजींना ‘द ओन्ली मॅन इन द कॅबिनेट’ म्हणून ओळखले जात असे, त्या एक व्यक्ती म्हणून कशा होत्या, याबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. डोरोथी नॉर्मन या त्यांच्या अतिशय जवळच्या अमेरिकन मत्रीण होत्या आणि त्या दोघींमध्ये अनेक वर्षे वैयक्तिक पातळीवर पत्रव्यवहार होत असे. नॉर्मन यांनी त्यातील निवडक पत्रांचे संकलन ‘इंदिरा गांधी : लेटर्स टु अ‍ॅन अमेरिकन फ्रेंड’ या नावाने १९८५ साली प्रसिद्ध केले आहे. त्यातील काही पत्रे.. इंदिराजींचे अनवट रूप चितारणारी!

डोरोथी नॉर्मन (२८ मार्च १९०५ – १२ एप्रिल १९९७) या एक लेखिका, संपादक, छायाचित्रकार, कलांच्या आश्रयदात्या आणि सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रातील कार्यकर्त्यां म्हणून प्रसिद्ध होत्या. ‘न्यूयॉर्क पोस्ट’मध्ये त्या काही वर्षे साप्ताहिक सदर लिहीत असत. तसेच साहित्यिक आणि सामाजिक विषयाला वाहिलेल्या ‘ट्वाइस अ इयर’ या नियतकालिकाच्या त्या दहा वष्रे संपादक होत्या. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यात ‘नेहरू: द फर्स्ट सिक्स्टी इयर्स’, भारतीय नेत्यांच्या लिखाणाचे दोन खंड, ‘आल्फ्रेड स्टिएग्लिट्झ: अ‍ॅन अमेरिकन सीअर’ तसेच ‘एनकाउंटर’ हे त्यांच्या आठवणींचे पुस्तक, ‘द स्पिरिट ऑफ इंडिया’ आदींचा त्यात समावेश होतो. १९३० व १९४० च्या दशकात- विशेषत: मानवी हक्क, भारताचा स्वातंत्र्यलढा, शिक्षण, वगरे क्षेत्रांमध्ये तसेच ‘अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज् युनियन’, ‘प्लॅन्ड पेरेंटहूड’, ‘नॅशनल अर्बन लीग’ यांसारख्या अमेरिकन संस्था व संघटनांशीही त्या निगडित होत्या. छायाचित्रणाचा पेशा जरी त्यांनी स्वीकारला नसला तरी कला व राजकारणाच्या क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींची त्यांनी छायाचित्रे घेतली होती. सुप्रसिद्ध अमेरिकन छायाचित्रकार आल्फ्रेड स्टिएग्लिट्झ हे त्यांचे या क्षेत्रातील गुरू होते.

‘इंदिरा गांधी- लेटर्स टु अ‍ॅन अमेरिकन फ्रेंड’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच त्या म्हणतात, की ही पत्रे हा त्यांच्यातील ‘मत्रीचा एक उत्स्फूर्त आविष्कार आहे.’ ‘इंदिरा गांधी व मी अनेक वर्षे एकमेकींना पत्रे लिहीत होतो. कारण आमच्यासाठी ते नैसर्गिक होते. त्यांच्यातील एकाकीपणाची आणि कोणाशी तरी मोकळेपणाने व विश्वासाने बोलण्याच्या गरजेची मला जाणीव झाली होती.. आमच्या मत्रीवर विसंबता येण्यामुळे त्या उत्साहित होत असत आणि आम्ही अनेक स्तरांवर एकमेकींशी संपर्क साधत असू याचे मला नेहमीच आश्चर्य वाटत असे.’ ऑक्टोबर १९४९ मध्ये जवाहरलाल नेहरूंसोबत इंदिरा गांधी अमेरिकेला गेल्या असताना डोरोथी नॉर्मनची व त्यांची प्रथम भेट झाली आणि पहिल्या भेटीपासूनच त्यांच्यात एक मत्रीचे नाते निर्माण झाले. लोकशाही, स्वातंत्र्य, समाजकल्याणाचे कार्यक्रम, गरिबी नष्ट करणे, अिहसा यांमध्ये दोघींना सारखेच स्वारस्य होते. दोघींनाही निसर्गाची आणि सौंदर्याची जात्याच ओढ होती. तसेच साहित्य, कला, नृत्य, वास्तुरचना, संगीत याबाबतीतील दोघींच्या आवडीनिवडीदेखील खूपच मिळत्याजुळत्या होत्या.

१९५० साली पंतप्रधान नेहरूंच्या पाहुण्या म्हणून दिल्लीला आल्या असताना डोरोथी त्यांच्याच घरी राहत होत्या आणि त्यांची खोली इंदिराजींच्या कुटुंबाशेजारीच होती. त्या काळापासूनच त्यांच्यात पत्रव्यवहार सुरू झाला. आणि जेव्हा मनापासून वाटेल तेव्हाच लिहिण्याची मुभा त्या दोघीही घेत असत. १९७५ साली ‘आणीबाणी’ जाहीर झाल्यानंतर भारताचे मित्र असणाऱ्या इतर काही अमेरिकी विचारवंतांबरोबर त्या काळातील मानवी हक्कांच्या उल्लंघनाला विरोध करणारे पत्रक डोरोथींनी प्रसारित केले होते. त्या काळात त्यांच्यातील पत्रव्यवहार खंडित झाला होता. पण १९ सप्टेंबर १९७५ रोजी भूतानहून आणलेली एक भेटवस्तू डोरोथींना पाठवताना सोबतच्या पत्रात इंदिरा गांधींनी लिहिले होते, ‘या हुकूमशहाकडून (‘ग्रेट डिक्टेटर’) ही भेट तू स्वीकारशील ना?’ संजय गांधींच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांचा पत्रव्यवहार परत सुरू झालेला दिसतो.

या सर्व पत्रांमधून एक वेगळ्याच इंदिरा गांधी- एक कर्तव्यदक्ष कन्या, प्रेमळ माता, निसर्ग, संगीत, नृत्य-नाटय़ यांचा मनापासून आस्वाद घेणाऱ्या, सुसंस्कृत आणि तरीही एकाकी व्यक्ती- आपल्या समोर येतात.

उदाहरणादाखल या संग्रहातील काही पत्रांचा अनुवाद इथे सादर केला आहे.

 

पंतप्रधानांचे निवासस्थान,
नवी दिल्ली
१३ ऑक्टोबर १९६३

प्रिय डोरोथी…

तुझे पत्र कालच मिळाले. मी पाठवीन म्हटलेले पत्र अर्धवटच राहिले आहे. ते कधी पूर्ण होईल, कोण जाणे.

हे अगदीच खाजगी आहे. अखेर मला थोडाफार समतोल साधता आला आहे.

खाजगीपणाची आणि सतत प्रकाशझोतात न राहण्याची माझी गरज गेल्या तीन वर्षांत आणखी वाढत गेली आहे. आणि आता जर त्याकडे लक्ष दिले नाही तर त्याचा माझ्यावर काहीतरी गंभीर आणि विपरीत परिणाम होईल अशी मला भीती वाटते. दुर्दैवाने या देशाच्या कोणत्याही दूरच्या कोपऱ्यात गेले तरीदेखील मला खाजगीपणा मिळणे शक्य नाही. १६ हजार फुटांवरील कोलाहोय ग्लेशियरच्या पायथ्याशीसुद्धा लोक मला त्यांच्या नावाची कार्डे आणून देतात आणि आपल्या समस्या सांगतात! हा नुसता लोकांना भेटण्याचा प्रश्न नाही; पण ते केवळ काहीतरी मागण्यासाठी आणि मिळवण्यासाठीच येतात. आणि मग शांतपणे विचार करण्यासाठी, विसाव्यासाठी किंवा एकांतात असण्यासाठी काही क्षणही मिळत नाहीत.

गेल्या मे महिन्यात लंडनमध्ये असताना विकाऊ असलेले एक लहानसे घर माझ्या फार मनात भरले होते.  इतक्या छान ठिकाणी होते. मध्यवर्ती- आणि तरीही अगदी शांत, एका बगिच्याच्या शेजारी. मला जर ते विकत घेता आले असते तर! एक खोली माझ्यासाठी आणि राहिलेल्या (म्हणजे केवळ दोनच) भाडय़ाने देता आल्या असत्या. आता भाडी खूपच वाढली आहेत. आणि त्यातून परकीय चलनाचा प्रश्नही मिटला असता. परंतु ते विकत घेण्यासाठी परकीय चलन कुठून आणायचे, हीच मोठी समस्या होती. त्याची जमवाजमव करण्याच्या  विचारात मी बराच वेळ घालवला आणि मग मला जेव्हा कळले की, आमच्या ओळखीपकीच कोणीतरी ते घेतले होते, तेव्हा अनेक महिने मी अतिशय उदास होते. कोणीतरी माझ्यासमोरच एखादे दार धाडकन् बंद करावे तसे मला वाटले.

माझ्या वडिलांमुळे आणि मुलांमुळे मला दिल्लीतून बाहेर जाता येत नाही. ही परिस्थिती आता थोडी सुकर झाली आहे- राजीव आता इंग्लंडमध्ये आहे आणि संजयची शाळाही या वर्षअखेरीस संपेल. त्यानेही इंग्लंडला जावे अशी माझी फार इच्छा आहे. मी जर लंडनमध्ये राहिले तर त्यालाही परदेशी जाणे सोपे होईल.  मग मुले मला मधून मधून भेटू शकतील आणि मलाही एकटीने राहता येईल. काम करायला किंवा आराम करायला मी मोकळी असेन. ही काही फार मोठी अपेक्षा नव्हे, पण तेही मला साधेल असे दिसत नाही. यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे एक सुयोग्य अशी नोकरी मिळवणे- पण ती भारत सरकारमधील किंवा उद्योगसमूहातील नको.

दोन-तीन दिवसांपूर्वीच मी परत एकदा पुपुलशी बोलले. तिचे म्हणणे होते, की मी कृष्णमूर्तीशी बोलावे. ते पुढील महिन्यात दिल्लीला येणार आहेत.

मी कोणापासून किंवा कशापासूनही पळ काढीत नाही आहे. गेली अनेक वष्रे मी माझ्या देशाची आणि कुटुंबाची सेवा केली आहे असे मी नक्कीच म्हणू शकते. त्याबद्दल मला क्षणभरही खंत वाटत नाही. कारण आज मी जी काही आहे, ती गेल्या अनेक वर्षांतील अनुभवांतूनच बनले आहे. पण आता मला निराळे जीवन हवे आहे. कदाचित ते यशस्वी ठरणारही नाही. कदाचित मला ते आवडणारही नाही, किंवा ते चांगले असणारही नाही. पण एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे? माझ्या जुन्या आयुष्यापासून दूर जाण्याची निकड आता निर्माण झाली आहे. त्यात काही चूक आहे का?
प्रेमपूर्वक तुझी,
इंदिरा

 

पंतप्रधानांचे निवासस्थान,
नवी दिल्ली
३ जून १९७३

प्रिय डोरोथी…

विल्यम थॉम्पसनचे ‘द एज ऑफ हिस्टरी’ (‘इतिहासाच्या काठावर’) मला पाठवल्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे एक नवीनच विचारधारा सुरू झाली आहे. वर्तमान अमेरिकेतील सर्व घडामोडींबद्दल माहीत असणे शक्य नसल्याने त्यातील काही संदर्भ माझ्या डोक्यावरूनच गेले.

अलीकडे मी फार ‘मूडी’ झाले आहे. अगदी सुरुवातीची काही वष्रे सोडल्यास आपल्या मनाचा थांग घेण्यास एक क्षणही मोकळा मिळत नाही. ‘मी कोण आहे आणि मी का आहे?’ हे नेहमीचेच प्रश्न आहेत.  ज्याबाबतीत दिरंगाई चालणार नाही अशी काहीतरी कामे कायमच समोर असतात. म्हणून शांत बसून आपला स्वतचा आणि आयुष्याचा विचार करणे हे जरा विचित्र वाटते.. किंवा कदाचित हे नसíगक आणि वाढत्या वयाचा एक भागच असेल.

मी कुठेतरी वाचले होते की, आयुष्याबद्दल कार्ल मार्क्‍सला विचारल्यावर त्याचे उत्तर होते, ‘आयुष्य म्हणजे संघर्ष’! माझ्या आयुष्यात तर संघर्ष कायमचाच आहे. पण तरीही मला वाटते, की आयुष्य हा एक चमत्कार आहे. निसर्गाची किमया आणि त्याच्या चतन्यातील विविधता.

तारुण्याचा गर्व आणि उद्धटपणा आता ओसरला आहे. आणि त्याची जागा आता एका नम्रतेने घेतली आहे- केवळ वैयक्तिकच नव्हे, तर संपूर्ण मानवतेसाठीची नम्रता. आपल्या स्वतलाच जग मानणे हा आपला उद्दामपणाच नाही का? आपल्याला माहीत असलेल्या मानवजातीचे अस्तित्वच संपुष्टात आले तर असा काय फरक पडणार आहे? पृथ्वी असेलच आणि निराळे प्राणी उदयाला येतील!

मला तर आता तुरुंगात असल्यासारखेच वाटते. माझ्याभोवतीचे सुरक्षारक्षक त्यांची अक्षमता लपवण्यासाठी संख्या वाढवतात, माझ्याभोवतीचे कडे अधिक घट्ट करतात. कदाचित त्यामुळे, किंवा मलाच अशी जाणीव झाली आहे, की मी आता शेवटाकडे येऊन पोचले आहे. या दिशेने आता अधिक प्रगती शक्य नाही.  शाळेत असताना आणि जीवनाच्या निरनिराळ्या टप्प्यांवर आपल्याला मित्र-मत्रिणी असतात. पण अशी एक वेळ येते की, आपण त्यांना मागे टाकून एकटेच पुढे निघून गेलेले असतो. आपण बोलतो, भेटतो, पण ते सर्व फारच वरवरचे वाटते. सध्या तरी मी अशा मन:स्थितीत आहे.

त्याचे कारण परिस्थिती आता वेड लावण्याजोगी विफल आणि कठीण बनली आहे. यावर तोडगा दिसतच नाही. कारण त्यासाठी उचलावयाची पावले एका लहानशा, आपल्याशी मिळत्याजुळत्या विचारांच्या गटातील लोकांवर अवलंबून नाहीत, तर ज्यांना आपल्या स्वतच्या फायद्यापलीकडे काही दिसत नाही आणि काहीतरी बिघडवण्यातच ज्यांना आनंद मिळतो अशा बहुसंख्यांवर अवलंबून आहेत. हे असेच असू शकेल. पण मला वाटते की याची कारणे अधिक खोलवर रुजलेली आहेत आणि काही काळापासून वाढतच आहेत.

माझी वाढ ही निरनिराळ्या कल्पना आणि विचारांचा स्वीकार करण्यातून आपोआपच  झाली आहे. आपला काळ हा गुंतागुंतीचा आहे आणि त्यामुळेच खरा आव्हानात्मक आहे. कोतेपणा, हव्यास आणि क्षुद्रपणात गुरफटलेले लोक पाहून हताशपणा येतो. लहानसहान गोष्टींच्या मागे लागण्यात खऱ्या महत्त्वाच्या गोष्टी निसटूनच जातात.

३१ तारखेच्या रात्री इथे फार मोठा विमान अपघात झाला. अनेक मित्र आणि ओळखीची मंडळी त्यात गमावली. माझ्या मंत्रिमंडळातील एक मंत्रीदेखील त्यात होते..

आता ४ तारखेची पहाट झाली आहे. मी कॅनडा भेटीवर जाणार आहे. पण जिथे जाण्यासाठी मी खरोखर उत्सुक होते, त्या फिजी आणि टोंगाची भेट रद्द करावी लागली. कारण इतके दिवस मी बाहेर असणे योग्य होणार नाही.

प्रेमपूर्वक तुझी,
इंदिरा

 

द रेसिडेन्सी,
बंगलोर
१२ जुल १९५१

प्रिय डोरोथी…

तुझे म्हणणे खरेच आहे. जितके दिवस आपण लिहीत नाही, तितकेच एकमेकांच्या संपर्कात राहणे अधिकाधिक कठीण होत जाते.

मी काही गोष्टी तुझ्यासाठी पाठवल्या आहेत- भारताच्या तीन अगदी वेगवेगळ्या भागांतील खेडय़ातील जुनी चित्रे हाताने तयार केलेल्या ठोकळ्यांच्या साहाय्याने यांवर छापलेली आहेत: गुजरातमधले रेशमी कापड, ईशान्येकडील कॅिलपाँगचे स्कार्फ आणि बंगालमधील रुमाल- कारण तुला त्या आवडतील असे मला वाटले. आणि दुसरे म्हणजे मला नेहमी तुझी आठवण असते, हे तुला कळवावे म्हणून. मला लिहायला जमले नव्हते कारण नेहमीपेक्षा आजकाल मी फारच गडबडीत आहे. सारखाच प्रवास चालू आहे. आणि शिवाय, उजव्या हाताला काहीतरी झाले आहे, त्याचाही सारखा त्रास होत असतो.

आठवडय़ाअखेरीस जर कोणी मला विचारले, की मी काय करत होते, तर मला खरेच काही उत्तर देता येणार नाही. पण प्रत्येक क्षणी अनेक कामे महत्त्वाची आणि तातडीचीच असतात. थोडक्यात सांगायचे तर आयुष्य फार वैफल्याचेच आहे. खूप वर्षांपूर्वी मी जेव्हा इंग्लंडमध्ये शिकत होते, तेव्हा माझ्या अभ्यासाबद्दल सल्ला घेण्यासाठी मी हॅरोल्ड लास्कींकडे गेले होते.  ते म्हणाले, ‘हे पाहा, तुम्हाला आयुष्यात जर कोणीतरी बनायचे असले, तर आतापासूनच स्वत:साठी जगायला सुरुवात करा. तुम्ही जर आपल्या वडिलांची काळजी घेत राहाल, तर तुम्हाला दुसरे काहीच करता येणार नाही.’ पण मला यातून दुसरा काही मार्ग दिसत नाही. अशा दृष्टीने, की मला माझ्या वडिलांचा एकाकीपणा प्रकर्षांने जाणवला. आणि मला असेही वाटले, की मी आयुष्यात काही केले, किंवा माझ्या स्वतच्या कामातून मला काही समाधान मिळाले, तरी मी माझ्या वडिलांची पाठराखण करणे, आवश्यक त्या बारीकसारीक तपशिलांची काळजी घेणे, त्यांच्या सोयींकडे लक्ष देणे हे त्याहून अधिक महत्त्वाचे आणि उपयोगाचे आहे. मी नसले तर या सर्व गोष्टी त्यांनाच पाहाव्या लागतील आणि त्यांच्यात तशी चिकाटी नाही, वेळही नाही आणि मग त्यांची चिडचिड होते! मी काही तक्रार करत नाही. चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टीही येणारच. सुदैवाने अगदी वाईट परिस्थितीतूनही निभावून जाण्याइतकी विनोदबुद्धी मला लाभली आहे. आणि माझ्या निसर्गप्रेमामुळे अगदी अनपेक्षित ठिकाणीदेखील मला सौंदर्य आणि आनंद शोधता येतो. शिवाय इतरही अनेक गोष्टी आहेत- लोक आणि पुस्तके, संगीत आणि कलाकृती. आणि या सर्वाहून महत्त्वाचे म्हणजे माझी मुले आणि ती मोठी होताना, दोन निराळ्या प्रकारच्या व्यक्ती बनताना पाहण्याचा अनोखा आनंद.

अर्थात, आता मी आणखी काहीतरी करायलाच हवे. लिखाण? पण कशाबद्दल? सर्वच गोष्टींबाबत माझ्या कल्पना ठाम आहेत. पण त्या सगळ्याचा एक गुंताच आहे. कदाचित लिहिण्याने त्यात एक प्रकारची शिस्त येईल आणि भविष्यातील विचार व कार्य यांना एक स्पष्ट दिशा मिळेल. एकच गोष्ट जी मला करता येईल किंवा जी मला करावीशी वाटते (हादेखील त्याचा एक भाग आहे का?), ती म्हणजे काहीतरी साहित्यिक किंवा ऐतिहासिक संशोधन.

स्वतबद्दल मी ज्या तऱ्हेने तुला लिहू शकते त्याचे मला स्वतलाच फार आश्चर्य वाटते- मी कोणालाच या प्रकारे कधीच लिहिले नाही.

अन्नधान्याच्या विधेयकासाठी तू आम्हाला फारच मोठी मदत केली आहेस. त्याबद्दल तुझे कसे आभार मानावेत तेच मला समजत नाही. ‘थँक यू’ हे दोन शब्द आपण दिवसात इतक्या वेळा आणि बऱ्याचदा यांत्रिकपणे  म्हणतो, की जेव्हा ते अगदी मनापासून म्हणावेसे वाटतात तेव्हा ते पुरेसे वाटत नाहीत. आणि तरीही आपल्याकडे दुसरे शब्दच नसतात.

१७ तारखेला आम्ही दिल्लीला परत जाणार आहोत आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी काश्मीरला जाणार आहे. मुले अगोदरच तेथे गेलेली आहेत. आम्ही सर्वजण महिन्याच्या अखेरीला दिल्लीला परत येऊ.

प्रेमपूर्वक तुझी,
इंदिरा
ता. क. ‘वुड्स होल’ हे किती मनमोहक नाव आहे!
(‘वुड्स होल’ हे नॉर्मन यांच्या घराचे नाव आहे.)

 

पंतप्रधानांचे निवासस्थान,
नवी दिल्ली
१० फेब्रुवारी १९६७

प्रिय डोरोथी…

प्लॅस्टिक सर्जरीबद्दल ऐकल्यापासूनच मला माझ्या नाकाबाबत काहीतरी करून घेण्याची इच्छा होती. मी त्यासाठी पसेदेखील साठवायला सुरुवात केली होती. पण त्याबाबत उगाच बभ्रा न होता ते करायचे असेल तर प्रथम काहीतरी लहानसा अपघात घडावा, म्हणजे त्यानिमित्ताने मला ते करून घेता येईल असे मला वाटत होते. पण तुला माहीतच आहे की आपल्याला हवे तसे कधीच घडत नाही. तू ऐकलेच असशील की माझ्या भुवनेश्वरच्या सभेत दगडफेक झाली. काही थोडे विद्यार्थी एक घोळका करून उभे होते आणि घोषणा देत होते.  त्यांच्याभोवती लोकांचा एक मोठा जमाव जमला होता आणि ते हे सर्व ऐकत होते आणि मधून मधून ‘जय’ असे ओरडत होते.

मी माझे ४०-४५ मिनिटांचे संपूर्ण भाषण केले, पण भाषण करत असतानाच माझ्या लक्षात आले होते की काहीतरी दगडफेक वगरे चालू होती. कारण स्टेजच्या खाली असलेले वृत्तपत्रांचे प्रतिनिधी घाबरलेले दिसले आणि स्टेजच्या मागच्या बाजूला आले.

माझे भाषण झाल्यावर कोणीतरी आभार प्रदर्शनाचे भाषण करायला उठले म्हणून मी मागे जाऊन बसावे असे मला लोकांनी सुचवले. पण मला वाटले की, मी त्यावेळी समोर असणे महत्त्वाचे होते, म्हणून मी तेथेच उभी राहिले आणि विटेचा एक मोठा तुकडा माझ्या तोंडावरच येऊन आदळला. रक्ताची एक चिळकांडी उडाली. प्रथम मला वाटले की माझे नाक मोडले. मला कोणीतरी एक हातरुमाल दिला. ती सभा संपेपर्यंत मला तिथे राहायचे होते. पण लवकरच माझ्या लक्षात आले की, काहीतरी मोडले असेल तर ते लवकरात लवकर ठीक करायला हवे. म्हणून मग मी घरी गेले. ती सभा त्यानंतर बराच वेळ चालू होती.

राजभवनवर माझ्या लक्षात आले की, मी एखाद्या बॉक्सरसारखी दिसत होते. आरशात तर मी फारच भयंकर दिसत होते. माझ्या नाकाची डावी बाजू वेडीवाकडी झाली होती. मग मीच ती उजव्या बाजूला ओढली आणि मला ‘टिक’ असा आवाज ऐकू आला.  माझा डावा ओठ सुजून एका मोठय़ा अंडय़ाइतका झाला होता. माझा चेहरा पांढरा पडला होता आणि बराच वेळ नाकातून रक्त येत होते.

ओरिसाचा कारभार इतका गलथान आहे की डॉक्टरना यायलादेखील खूप वेळ लागला. आणि मग मी म्हटले की, माझे नाक मोडले आहे. आणि ते म्हणाले की, नाही. ही चर्चा मग बराच वेळ चालली. सुदैवाने मी स्वतच हुशारी करून हा संपूर्ण वेळ माझ्या चेहऱ्यावर बर्फ ठेवला होता आणि सूज उतरवत आणली होती.

माझ्या कार्यक्रमात काही बदल न करता दुसऱ्या दिवशी सकाळी मी पाटण्याच्या एका मोठय़ा सभेत भाषण केले आणि मग इथे आले. माझ्या नाकाचे डावीकडचे मोडलेले हाड थोडेसे चुकीच्या जागी गेले आहे आणि आता मी वििलग्डन हॉस्पिटलमध्ये आहे आणि ते दुरूस्त करण्यात येणार आहे. सूज जरी जवळजवळ पूर्णपणे उतरली असली तरी मी भयंकरच दिसते आहे.

११ फेब्रुवारी

तू मला आता पाहायला हवे होतेस. माझ्या कपाळावर मोठे डौलदार क्रेपचे बँडेज आहे आणि नाकावर आडव्या पट्टय़ा.

माझी भूल उतरण्याच्या क्षणाचीच उषा वाट पाहत असावी- आणि लगेच तिने मला केनेडीच्या हत्येच्या  चौकशीची भयानक कथा वाचून दाखवली. ती चांगली लिहिलेली आणि खिळवून ठेवणारी आहे. आणि हॉस्पिटलमध्ये असताना अगदी वाचण्यायोग्यच!!

मला या खोलीची सजावट बदलावी लागली, कारण काही दिवसांपूर्वी इस्पितळात असलेल्या एका कलाकाराने आपले सर्वात उग्र दिसणारे चित्र देणगी म्हणून दिले असावे. या खोलीतील चित्रात एक अगदी वेडेवाकडे गाठी असणारे झाड होते आणि त्याकडेच सारखे लक्ष जात असे. आता ते इथल्या मागल्या व्हरांडय़ात हलवले आहे आणि खोली आता प्रफुल्लित झाली आहे.
प्रेमपूर्वक तुझी,
इंदिरा

(डोरोथी नॉर्मन यांच्या ‘इंदिरा गांधी- लेटर्स टु अ‍ॅन अमेरिकन फ्रेंड’ या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद राजहंस प्रकाशनतर्फे लवकरच प्रसिद्ध होत आहे.)
सुजाता गोडबोले