15 August 2020

News Flash

समजून घ्या सहजपणे : करोनाचा कर्दनकाळ… साबण!

पारंपरिक साबणाने हात धुवूनच या विषाणूचा मुकाबला आपण जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो

राजेंद्र येवलेकर

सध्या करोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी हात स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले जात आहे त्यासाठी सॅनिटायझर्स म्हणजे जंतुनाशक द्रव, जेल, क्रीम असे अनेक उपाय सांगितले जात असले तरी पारंपरिक साबणाने हात धुवूनच या विषाणूचा मुकाबला आपण जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो किंबहुना सॅनिटायझर्स ऐवजी साबणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. आपण सोपी गोष्ट करायला सांगितली तर अवघड, महागडी गोष्ट करण्याच्या मागे असतो तसे करणे टाळले पाहिजे. बाजारात सॅनिटायझर्सच्या किंमती आता अवाच्या सवा वाढल्या आहेत शिवाय त्यांची टंचाई निर्माण होऊ शकते म्हणून त्यावाचून अडून राहणे अजिबात शहाणपणाचे नाही. साध्या साबणाने हात धुतले तरी हा विषाणू निष्क्रीय होतो.
साबणाने विषाणू कसा निष्क्रीय होतो ?
विषाणू हा आधी आपल्या शरीराबाहेर निद्रिस्त अवस्थेत असतो तो आपल्या शरीरात गेल्यानंतर तो सक्रिय होतो. सार्स सोओव्ही २ विषाणू म्हणजेच कोविड १९ (करोना) हा इतर विषाणूंसारखाच आहे. विषाणू म्हणजे नॅनो कणांचा स्वसमुच्चय असतो त्याची सर्वात कमजोर कडी हे त्याच्या भोवती असलेले द्विस्तरीय मेदावरण ही असते. आपण जेव्हा साबणाने हात धुतो तेव्हा हा विषाणू पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे उद्ध्वस्त होतो. कारण साबणाने या विषाणूचे मेदावरण म्हणजे संरक्षक कवच नष्ट होते व त्या विषाणूचे तुकडे तुकडे होऊन तो निष्क्रिय होतो.
मुळात विषाणूची रचना कशी असते.?

विषाणू हा निर्जीव असतो तो शरीरात गेल्यावर त्याची पुनरावृत्ती शक्य होते. विषाणूत तीन प्रमुख भाग असतात १) रायबोन्युक्लिइक अ‍ॅसिड (आरएनए),२) प्रथिने ३) मेदावरण. विषाणू जेव्हा मानवी पेशीत प्रवेश करतो तेव्हा तो याच रचनेमुळे टिकाव धरू शकतो. या घटकांना एकत्र राखणारा मेदावरणाशिवाय कुठलाही मजबूत असा कुठलाही घटक नसतो. त्यामुळे साबणाने त्यावर आघात केला की, विषाणूचे तुकडे होतात. पण हा विषाणू आपण साबणाने हात धुतले नाहीत तर शरीरात यजमान पेशीत घुसून बस्तान बसवतो व तिथे आपली पिलावळ तयार करतो जेव्हा ही संसर्गित पेशी मरते तेव्हा ही विषाणूंची वाढती पिलावळ इतर पेशींवर चालून जाते. त्यातील काही हल्ले श्वाासनलिकेतील पेशी व फुफ्फुसातील पेशींवर होतात. नंतर कफ खोकल्यातून हेच विषाणू बाहेर पडतात, ते दहा मीटर दूरपर्यंत पसरतात. यातील मोठे थेंब हे करोनाचे वाहक असतात, ते दोन मीटरपर्यंत पसरतात. कफाचे कण पृष्ठभागावर वाळतात पण विषाणू सक्रिय असतात. मानवी त्वचेवर विषाणू आरामात वस्ती करतो. कारण त्वचा ही नैसर्गिक पृष्ठभाग असते. त्वचेवरील प्रथिने व मेदाम्ले यांच्याशी मृत पेशींची क्रिया होऊन विषाणू सक्रिय होतो. पोलादावर किंवा इतर पृष्ठभागावर जर हे कण असले तर ते त्वचेला चिकटून हातावर येतात. नंतर चेहरा, डोळे, नाक यांना स्पर्श केला तर तेथून संसर्ग सुरू होतो. आपण दर दोन-पाच मिनिटांनी डोळे, नाक यांना हात लावत असतो. त्यामुळे विषाणूचा प्रसार होतो.
नुसते पाणी पुरेसे नाही का ?
नुसत्या पाण्याने हात धुतल्यास काही फायदा होत नाही कारण विषाणू टिकून राहू शक तो. विषाणू त्वचेवर काही अभिक्रियांमुळे घट्ट चिकटून असतो तो साध्या पाण्याने जात नाही. साबणाचे पाणी वेगळे असते. साबणात मेदासारखे अ‍ॅम्फीफाइल्स घटक असतात. त्यातील काही विषाणूच्या मेदावरणासारखे असतात. साबणाचे रेणू हे त्या मेदावरणाशी झटापट करून त्याचे रक्षक कवच असलेले मेदावरण तोडतात. साबणाने घट्ट चिकटलेला विषाणू त्चचेपासून ढिला होतो, विषाणू हा वेलक्रो प्रमाणे प्रथिने, मेद व आरएनए या सह चिकटलेला असतो. त्याची ती ‘चिकाटी’ साबणाच्या पाण्याने गळून पडते
सॅनिटायझर्समध्ये काय असते?
सॅनिटायझर्स हे अल्कोहोलवर आधारित असतात, त्यात ६०-८० टक्के इथॅनॉल असते. त्यामुळे साबणाप्रमाणेच विषाणू निष्क्रिय केले जातात. पण साबण हा त्यापेक्षा जास्त प्रभावी ठरतो. कारण साबणाचे पाणी फार कमी प्रमाणात घेतले तरी त्याने हात चोळून धुतल्यास विषाणूचे लगेच तुकडे होतात. साबणाचे पाणी हातावर व्यवस्थित फिरवता येते. सॅनिटायझर वापरताना तो विषाणू इथॅनॉलमध्ये काही काळ राहिला तरच निष्क्रिय होतो. त्यामुळे महागडे सॅनिटायझर भरपूर व योग्य प्रकारे वापरले तरच अपेक्षित परिणाम साधला जातो. जेलमध्येही ते चोळून लावलेतरी त्याचा फारसा फायदा होईल असे नाही त्यामुळे साबणच योग्य ठरतो. पण काही ठिकाणी आपण साबण वापरू शकत नाही तिथे सॅनिटायझर्स वापरणे योग्य असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2020 6:33 pm

Web Title: read how the soap is more useful than hand sanitizer against corona virus scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : करोनाचा प्रभाव वाढण्याआधी कुटुंबासाठी घ्या विमा कवच, हा पर्याय आहे सर्वोत्तम
2 समजून घ्या सहजपणे : लाखोंचा बळी घेणारं कम्युनिटी ट्रान्समिशन म्हणजे काय?
3 समजून घ्या सहजपणे : विलगीकरण आणि अलगीकरण कक्ष म्हणजे काय?
Just Now!
X