What Animal Has The Strongest Bite Force : जंगलातील प्राणी व निरनिराळ्या पक्ष्यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख असते. अगदी रंगांपासून ते शरीररचनेपर्यंत प्रत्येकाचे एक वैशिष्ट्य असते. प्रत्येक प्राणी, पक्षी वेगवेगळ्या पद्धतीने शिकार करतो आणि शिकार करण्यासाठी तो दात व जबड्याचा वापर करतो. पण, तुम्हाला जबडा मोठा असणारे किंवा कोणत्या प्राण्यांचे दात शक्तिशाली असतात हे माहीत आहे का? नाही… तर आज आपण या बातमीतून ते थोडक्यात जाणून घेऊ…
बीबीसीच्या मते, माणसाच्या दातांची चावण्याची ताकद सरासरी प्रति चौरस इंच १६२ पौंड (PSI) इतकी असते. काही प्राण्यांच्या तुलनेत हे काहीच नाही. मगरींपासून ते अस्वलांपर्यंत जगात काही असेसुद्धा प्राणी आहेत; ज्यांचे दात फार तीव्र असतात. बीबीसीच्या मते, प्राण्यांची चावण्याची ताकद फक्त प्राण्यांच्या जबड्याच्या स्नायूंवर अवलंबून नसते; तर ती जबड्याचे हाड, दातांचे पृष्ठभाग व त्यांच्या आहारातील घासाच्या आकार वा क्षेत्रावरदेखील अवलंबून असते.
जबडा मोठा असणारे पाच प्राणी पुढीलप्रमाणे… ( 5 animals with the strongest bite force)
१. पाणघोडा – बीबीसीच्या मते, पाणघोड्याची चावण्याची शक्ती १८०० पीएसआय इतकी असते. कोणत्याही सस्तन प्राण्यापेक्षा याचे तोंड मोठे असते आणि ते साधारणपणे ७१ सेमी असते. आतापर्यंत आढळलेला सर्वांत मोठा पाणघोडा १४४ सेंमी होता. पाणघोडा या जोरात चावण्याच्या शक्तीचा वापर इतर शिकारींपासून बचाव करण्यासाठी आणि इतर पाणघोड्यांवर हल्ला करण्यासाठी करतात.
२. जग्वार – बीबीसीच्या मते, जग्वारमध्ये १५०० पीएसआय इतकी चावण्याची शक्ती असते आणि तो मगरींच्या चिलखतस्वरूपी कातडी आणि कासवांच्या कवचाला चिरडण्यासाठी या प्रचंड मोठ्या जबड्याच्या वापर करतो. जग्वार जवळजवळ प्रत्येक प्राण्याची म्हणजे अगदी त्यांच्या वजनाच्या चौपट असलेल्या प्राण्याचीही शिकार करतात. जग्वार नैर्ऋत्य अमेरिका, मध्य अमेरिका व दक्षिण अमेरिकेत राहतात.
३. गोरिला – बीबीसीच्या मते, गोरिलाची चावण्याची शक्ती १,३०० पीएसआय आहे. गोरिला जबड्याच्या शक्तीचा वापर कडक फांद्या चावण्यासाठी आणि झाडांची साल तोडण्यासाठी करतो. गोरिला मध्य आफ्रिकेच्या जंगलांमध्ये जास्त दिसून येतात.
४. बुल शार्क – बुल शार्कची चावण्याची ताकद १३५० पीएसआय असते. त्याला ३५० दात असतात. खरे तर त्यांचे जबड्याच्या काठाजवळील जुने दात बाहेर पडतात तेव्हा मागून येणारे दात पुढे सरकतात आणि परिणामी या प्रजातीला आयुष्यभरात ५०,००० दात मिळू शकतात, असे बीबीसीने म्हटले आहे. बुल शार्क ऑयस्टर, कासव, पाणघोडे व इतर शार्क खातात आणि जगभरातील किनारी भागात, नद्या आणि तलावांमध्ये राहतात.
५. ध्रुवीय अस्वल – बीबीसीच्या मते, अस्वलांमध्ये ध्रुवीय अस्वलांची चावण्याची शक्ती १२०० पीएसआय असते. त्यांचे दात सुमारे पाच सेंटिमीटर लांब असतात; ज्यांचा वापर ते आर्क्टिक प्रदेशातील प्राण्यांना चावण्यासाठी करतात. पण, ते सस्तन प्राणी, वनस्पती, अंडी किंवा इतर सस्तन प्राण्यांनादेखील खातात.