World’s Smallest Snake: जगात सापांच्या अनेक प्रजाती आहेत; ज्यात नाग, मण्यार, अजगर, कोब्रा, धामण यांसारख्या अनेक जातींच्या सापांचा समावेश आहे. त्यातील काही साप विषारी, तर काही बिनविषारी असल्याचे म्हटले जाते. त्याशिवाय अनेक पौराणिक ग्रंथामध्ये आणि काल्पनिक कथांमध्ये आपल्या कल्पनाशक्तीहून अधिक लांबीच्या सापांचे वर्णन तुम्ही वाचले किंवा ऐकले असेल. पण, सर्वांत कमी फुटाचा साप कोणता हे तुम्हाला ठाऊक आहे का?
हा आहे जगातील सर्वांत कमी लांबीचा साप
बारबाडोस थ्रेडस्नेक हा जगातील सर्वांत कमी लांबीचा साप आहे. हा लहान साप अधिकृतपणे जगातील सर्वांत लहान ज्ञात साप आहे आणि तो इतका लहान आहे की, तो एका नाण्यावर आरामात विळखा घालून राहू शकतो. जीवशास्त्रज्ञ एस. ब्लेअर हेजेस यांनी २००८ मध्ये बार्बाडोसच्या कॅरेबियन बेटावरील जंगलात टेट्राकिलोस्टोमा कार्लेला शोधून काढले. त्याची लांबी फक्त १० सेंमी किंवा सुमारे चार इंच इतकी आहे.
हे साप जमिनीखाली राहतात आणि प्रामुख्याने मुंग्या व वाळवी खातात. ते लेप्टोटायफ्लोपिडे नावाच्या खोडावर राहणाऱ्या सापांच्या कुटुंबाचा भाग आहेत आणि ते इतके लहान आहेत की मादी सहसा एका वेळी फक्त एकच अंडे घालते. मनोरंजक बाब म्हणजे उबवलेल्या सापाचे पिल्लू आधीच प्रौढांच्या आकाराच्या अर्धे असते.
शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, ते बार्बाडोसच्या पूर्वेकडील जंगलाच्या एका छोट्याशा भागात राहतात आणि दुर्दैवाने ते जंगल झपाट्याने कमी होत चालले आहे. त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा बराचसा भाग विकासासाठी साफ केला जात असल्याने ही प्रजाती आता अत्यंत धोक्यात असल्याचे मानले जात आहे.