अनेकदा लोकं एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘RIP’ हा शब्द वापरतात. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही पाहिले असेल लोकं भावपूर्ण श्रद्धांजली असे शब्द लिहायचे परंतु आता आपल्याकडे हल्ली कोणाचाही मृत्यू झाल्याची बातमी कळली की, लगेच RIP लिहून श्रद्धांजली वाहण्याची पद्धत सुरु झाली आहे. सध्याच्या स्थितीमध्ये हा शब्द खूप प्रसिद्ध झाला आहे. गावातील लोकं सुद्धा या शब्दाचा वापर करतात. परंतु RIP या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? आणि या RIP शब्दाचा फुल फॉर्म काय होतो? हे बऱ्याच जणांना माहिती नाही. आज आम्ही आपल्याला या शब्दाचा नेमका आणि खरा अर्थ काय हे सांगणार आहोत. याशिवाय हा शब्द कधी आणि कसा सुरू झाला, याबद्दलही माहिती देणार आहोत.
RIP हे शॉर्ट फॉर्म असले तरी, आता ते एखाद्या शब्दासारखे वापरले जात आहे. अनेकांना या शब्दाचा खरा अर्थ आणि पूर्ण रूप देखील माहित नाही, परंतु कोणीतरी गेल्यावर ते या शब्दाद्वारे आपले दुःख व्यक्त करतात. सोशल मीडियावर जसे फेसबुक, व्हाॅट्सअप आणि इंस्टाग्राम यावर RIP हा शब्द त्याच व्यक्तीसाठी लिहिला जातो ज्याचा मृत्यू झालेला असतो आणि RIP हा शब्द दुसरा कोणासाठी लिहिता येत नाही.
(हे ही वाचा: रेल्वेच्या दाराजवळची खिडकी इतर खिडक्यांपेक्षा वेगळी का असते माहितीये? ‘हे’ आहे यामागील खरं कारण…)
RIP चा खरा अर्थ काय?
तुम्ही पाहिले असेलच की, बरेच लोकं RIP ला ‘Rip’ लिहितात. मात्र, ‘Rip’ हा शब्द पूर्णपणे चूकीचा आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? ‘रिप’ चा अर्थ कट करणे असा होतो. त्यामुळे श्रद्धांजली व्यक्त करण्याऐवजी लोकं कापणे असे लिहितात.
RIP एक संक्षिप्त रूप आहे. ज्याचा संपूर्ण अर्थ ‘रेस्ट इन पीस’ असा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा शब्द नेमका आला कुठून? या Rest In Peace ची उत्पत्ती लॅटिन फ्रेज ‘Requiescat In Pace’ पासून झाली आहे. Requiescat In Pace चा अर्थ ‘शांतपणे झोपणे’. या शब्दाचा मराठीतील अर्थ ‘आत्म्याला शांती लाभो’ असा आहे. तर इंग्रजीत लोकं फक्त RIP लिहितात. ख्रिश्चन धर्मात असे मानले जाते की, मृत्यूनंतर ‘आत्मा’ शरीरापासून वेगळा होतो आणि ‘जजमेंट डे’च्या दिवशी दोघे पुन्हा एकत्र येतील.
RIP शब्दाचा वापर अठराव्या शतकापासून सुरू झाल्याचे मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीचे चर्चच्या शांततेत निधन झाले तर, त्याचा आत्मा येशू ख्रिस्ताशी एकरूप होतो. अशा वेळी Requiescat In Pace हा शब्द वापरला जातो, असे अठराव्या शतकात मानले जात होते. याआधी पाचव्या शतकात मृत्यूनंतरच्या कबरीवर ‘Requiescat in Pace’ असे शब्द लिहिले गेले आहेत. ख्रिश्चन धर्मात या शब्दाचा वापर वाढला. हे लोकं प्रियजन हे जग सोडून गेल्यावर शोक व्यक्त करताना या शब्दाचा वापर करतात. ख्रिश्चन धर्मातूनच या शब्दाचा प्रसार वाढला आणि हा शब्द जागतिक झाला.