सौरभ कुलश्रेष्ठ

दक्षिण भारतातील प्रख्यात संत आणि समाज सुधारक श्री रामानुजाचार्य यांच्या एक हजाराव्या जयंतीनिमित्त हैदराबादजवळील शमशाबाद येथील त्यांच्या २१६ फूट उंच बैठ्या मुद्रेतील पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी झाले. आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी २०२२ रोजी रामानुजाचार्य पुतळ्याच्या खाली १२० किलो सुवर्णजडीत खोलीचे अनावरण होणार आहे. देशाच्या सर्वोच्च पदावरील दोन व्यक्ती या प्रकल्पासाठी वेळ देत आहेत कारण भाजपसाठी समतेचा हा पुतळा सत्तेचा मार्ग दाखवणारा ठरू शकतो. दक्षिण भारतातील हिंदुत्वाच्या या नवा प्रयोगातून भाजपला मतदारांचे सोशल इंजिनीयरिंग साध्य करायचे आहे.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

कोण होते रामानुजाचार्य आणि त्यांचे महत्त्व काय?

श्री रामानुजाचार्य हे श्री पेरूमबूदूर, तामिळनाडू येथे १०१७ मध्ये जन्माला आले. वैष्णव परंपरेतील संत व समाजसुधारक म्हणून ओळखले जाणाऱ्या रामानुजाचार्य यांनी सामाजिक, सांस्कृतिक, स्त्री-पुरुष, आर्थिक आणि जातीभेद असे सर्व भेदभाव दूर सारण्याची शिकवण देत समतेचा विचार लोकांमध्ये रुजविण्यासाठी प्रयत्न केले. रामानुजाचार्य यांचा समतेचा संदेश अधोरेखित करण्यासाठी त्यांचा २१६ फुटी पुतळा तेलंगणमधील हैदराबादजवळील शमशाबाद येथे ४५ एकर जागेवर उभारण्यात आला असून त्यास ‘स्टॅच्यु ऑफ इक्वालिटी’ म्हणजेच ‘समतेचा पुतळा’ असे नाव देण्यात आले आहे. २१६ फुटी पुतळ्यात रामानुजाचार्य यांच्या हाती १३५ फुटांचा त्रिदंडम असून तो निसर्ग, आत्मा आणि ईश्वर या तीन शक्तींच्या एकात्मतेचे म्हणजेच रामानुजाचार्य यांनी सांगितलेल्या विशिष्ट अद्वैत तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे. दक्षिण भारतातील हिंदूंमध्ये प्रभावी असणाऱ्या वैष्णव पंथाचे असल्याने रामानाजुचार्य यांना वैष्णव हिंदूंमध्ये मानाचे स्थान आहे. तर रामानुजाचार्य यांनी एक हजार वर्षांपूर्वी जातीभेदाविरोधात जनजागृती करत दलित समाजाला सन्मानाचे स्थान देण्यासाठी उपक्रम राबवल्याने द्रविड राजकारणात प्रभावी असलेला ब्राह्मणेतर वर्गही रामानुजाचार्य यांचे योगदान मानतो. द्रविड राजकारणाचे खंदे पुरस्कर्ते व पेरियारस्वामींचे अनुयायी असलेले तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनीही अखेरच्या काळात रामानुजाचार्य यांच्या समाजसुधारणेच्या कार्याचे कौतुक केले होते.

भाजपसाठी रामानुजाचार्यांचे राजकीय-सामाजिक महत्त्व काय?

भाजपची ओळख ही हिंदुत्ववादी पक्ष असल्याने दक्षिण भारतात त्यांच्याकडे ब्राह्मण व उच्चवर्णीयांचा पक्ष या दृष्टिकोनातून पाहिले जाते. दक्षिण भारतातील तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण या राज्यांमध्ये भाजपला अद्यापही प्रभाव पाडता आलेला नाही. त्यासाठी आवश्यक राजकीय-सामाजिक आधार तयार करण्यासाठी भाजपला द्रविड राजकारणात प्रभावी असलेल्या ब्राह्मणेतर चळवळीशी जोडलेल्या समाजघटकांमध्ये आपला राजकीय आधार तयार करण्याचे आव्हान आहे. समाजिक सुधारणा आणि समतेच्या संदेशामुळे ब्राह्मण व इतर उच्चवर्णीय आणि ब्राह्मणेतर चळवळ अशा दोन्ही समाज घटकांमध्ये सन्मानाचे स्थान असलेले रामानाजुचार्य हे भाजपला आपल्या राजकारणाचे प्रतीक म्हणून अधोरेखित करायचे आहे. त्यातून उच्चवर्णीय व इतर समाजघटक असे सोशल इंजिनियरिंग करून हळूहळू द्रविड राजकारणातील आपले उपरेपण संपून दक्षिण भारतात आपल्याला जनाधार तयार होईल असे भाजपचे समीकरण आहे. तर रामानुजाचार्य यांना मानणाऱ्यांच्या निमित्ताने दक्षिण भारतातील वैष्णव हिंदू पंथाच्या रूपाने एक मोठा समाजगट-आर्थिक ताकद संघ परिवाराच्या हिंदुत्वाच्या कामासाठी उपलब्ध होते.

समतेतून सत्तेची नीती

रामानुजाचार्य यांच्या समतेच्या मंत्राची राजकीय गुंफण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत चातुर्याने आपल्या धोरणांशी केली. ‘सब का साथ सब का विकास’ हे आपल्या सरकारचे धोरण आणि रामानुचार्य यांची समतेची शिकवण हे एकाच तत्त्वावर आधारित असल्याचे सांगत या धोरणामुळेच समाजातील दलित आणि वंचितांना कुठल्याही भेदभावाशिवाय घर, शौचालय, विमा, गॅस असे लाभ केंद्र सरकारच्या योजनांमधून मिळाल्याचा दावा मोदींनी केला. भाजप हा समता मानणारा आणि सरकारी धोरणात ते तत्त्व राबवून कल्याणकारी योजना आखणारा पक्ष असल्याचा राजकीय संदेश देत मोदींनी द्रविड राजकारणाशी जोडल्या गेलेल्या तामिळनाडू, आंध्र प्रदेश व तेलंगणमधील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याचबरोबर आपल्या मुळांशी नाते तोडून नव्हे तर जोडून सामाजिक सुधारणा करता येतात असे सांगत दक्षिण भारतात जातीभेदाला कंटाळून होणारे धर्मांतर आणि त्यावरून सुरू असलेल्या अस्वस्थतेला भावनिक साद घातली. सत्ता मिळाल्यावर आम्ही समतावादी धोरणे आखली असे सांगत समतेच्या संदेशातून भाजपसाठी सत्तेचा पाया रचण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत. दक्षिण भारतातील पुढील निवडणुकांपर्यंत त्यातून पक्षाला आजच्या अवस्थेतून वर नेत सत्तेचे दावेदार म्हणून उभे करण्याच्या एका दीर्घकालीन नियोजनाचा हा भाग आहे.