Loksabha Election 2024 लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याला २४ तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. अशात राजस्थानच्या आदिवासीबहुल बांसवाडा-डुंगरपूर लोकसभा मतदारसंघात चित्र विचित्र निवडणूक परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस आपल्याच उमेदवाराला पाठिंबा देऊ नका, असे आवाहन मतदारांना करत आहे. यामागील नेमके कारण काय? याबद्दल जाणून घेऊ या.

“डामोर यांना मत देऊ नका”

काँग्रेसने अरविंद डामोर बांसवाडा-डुंगरपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, आता काँग्रेस आपल्याच उमेदवाराला मत देऊ नका, असे आवाहन करत आहे. याला पक्षांतर्गत संघर्ष आणि काँग्रेसच्या राज्य व केंद्रीय घटकांमधील असमन्वय कारणीभूत आहे. अनेक अडथळ्यांनंतर काँग्रेसने बांसवाडा-डुंगरपूर लोकसभा मतदारसंघातून भारत आदिवासी पक्षाचे (बीएपी) उमेदवार राजकुमार रोत यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेच्या एक दिवस आधी काँग्रेसने ही घोषणा केली आहे. बीएपीला पाठिंबा देण्याच्या पक्षाच्या घोषणेनंतर डामोर हे उमेदवारी अर्ज मागे घेणार होते, परंतु अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख संपेपर्यंत ते कुठेच दिसले नाहीत.

BJPs ex-MP leave party Big blow to BJP in East Vidarbha
भाजपच्या माजी खासदाराने ठोकला पक्षाला रामराम ; पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का
thorat
फुटीर आमदारांवर कारवाई; काँग्रेसने नावे जाहीर करण्याचे टाळले
Anger about allies in BJP meeting  Complaints of Shiv Sena  NCP not working in Lok Sabha Mumbai
भाजपच्या बैठकीत मित्रपक्षांविषयी नाराजी; शिवसेना, राष्ट्रवादीने लोकसभेत काम न केल्याच्या तक्रारी
Thane Congress president, thane,
ठाणे काँग्रेस अध्यक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम, अफवा पसरवून गटबाजी करणाऱ्यांवर कारवाईचे प्रदेशाध्यक्षाचे संकेत
uddhav Thackeray, Bhaskar Jadhav
परकेपण पुरे आता शिवसैनिकांनाच उमेदवारी – भास्कर जाधव
Key takeaways from PM Modi replies in Parliament
हिंदू धर्म ते मणिपूर! विरोधकांच्या आरोपांना पंतप्रधान मोदींनी काय उत्तरे दिली?
Prime Minister Narendra Modi criticizes Congress as anti Dalit  anti tribal OBC in Rajya Sabha
काँग्रेस दलित, आदिवासी ओबीसीविरोधी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यसभेत टीका, संविधानाला हरताळ फासल्याचा आरोप
Criticism of Prime Minister Narendra Modi Injustice to the underprivileged by Congress
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका; काँग्रेसकडून वंचितांवर अन्याय
भारत आदिवासी पक्षाचे (बीएपी) उमेदवार राजकुमार रोत (छायाचित्र- राजकुमार रोत/एक्स )

हेही वाचा : गेल्या पाच वर्षांत देशाला अतिवृष्टी, पूर, दुष्काळाचा फटका, याविषयी भाजपा-काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय?

त्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर येऊन त्यांनी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. पूर्वी या मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेस-बीएपी युती अशी थेट लढत रंगणार होती. मात्र, आता या लढतीचे रूपांतर त्रिपक्षीय लढतीत झाले आहे. डामोर काँग्रेसच्या मतांमध्ये फूट पाडण्याची शक्यता आहे, त्यामुळे भाजपाचे उमेदवार महेंद्रजितसिंह मालवीय यांना फायदा होऊ शकतो.

काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने जनतेला त्यांच्याच उमेदवाराऐवजी रोत यांना मतदान करण्याचे आवाहन केले असताना, बीएपीबरोबर केलेल्या युतीच्या विरोधात असलेल्या नेत्यांच्या एका वर्गाचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा डामोर यांनी केला आहे. जिल्हास्तरीय नेते आणि काँग्रेस आमदार अर्जुन बामनिया यांचा मुलगा विकास बामनिया यांनी सांगितले की, पक्ष रोत यांना पाठिंबा देत आहे.

“आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही बीएपी उमेदवाराला पाठिंबा देत आहोत. लोकांच्या भावना आणि पक्षाकडून मिळालेले निर्देश लक्षात घेऊन आम्ही काम करत आहोत”, असे बामनिया म्हणाले. आणखी एका स्थानिक काँग्रेस नेत्याने सांगितले, “आम्ही लोकांना स्पष्टपणे सांगत आहोत की, काँग्रेस उमेदवाराला (डामोर) मत देऊ नका.” अनेक स्थानिक रहिवाशांनी ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ला सांगितले की, ही स्पर्धा प्रामुख्याने मालवीय आणि रोत यांच्यात होती, परंतु डामोर यांनी पक्षाला नकार देणे काँग्रेससाठी लाजिरवाणी बाब आहे. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दक्षिण राजस्थानमध्ये स्थापन झालेल्या बीएपीमध्ये राजकुमार रोत यांच्यासह तीन आमदार आहेत.

भाजपाचे उमेदवार महेंद्रजितसिंह मालवीय यांची प्रचारसभा (छायाचित्र-एएनआय)

बांसवाड्याची लढाई

बांसवाडा-डुंगरपूर ही अनुसूचित जमातीसाठी राखीव जागा असून शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांसवाडा येथे एका प्रचारसभेला संबोधित केले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर आक्षेप घेत त्यांनी असा आरोप केला की, विरोधी पक्ष लोकांच्या कष्टाने कमावलेला पैसा घुसखोर आणि ज्यांना जास्त मुले आहेत त्यांना द्यायचे ठरवत आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या २००६ च्या भाषणाचा संदर्भ देत, देशाच्या संसाधनांवर मुस्लिमांचा पहिला हक्क असल्याचे मनमोहन सिंग म्हणाले होते, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने मात्र याचे खंडन केले.

मालवीय यांनी त्यांच्या प्रचारसभेतील भाषणात राजकुमार रोत यांच्यावर बांसवाड्यातील लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला, तर काँग्रेस-बीएपी उमेदवार रोत यांनी मालवीय यांच्यावर आदिवासी समाजात फूट पाडल्याचा आरोप केला आहे. मालवीय यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. “हे लोक आमच्या आदिवासी बांधवांना कुठे घेऊन जातील? ते आदिवासी समाजाची दिशाभूल करत आहेत. एका व्यक्तीसाठी घर बांधल्याने संपूर्ण समाजाचा फायदा होत नाही,” असे मालवीय म्हणाले. ते पुढे म्हणाले, “हे लोक अराजकता पसरवण्याचे काम करत आहेत. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी लाखो मतांनी भाजपा ही जागा जिंकणार आहे. काँग्रेस आणि बीएपी यांची युती चालणार नाही.”

बांसवाडा येथे आयोजित प्रचारसभेला पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले. (छायाचित्र-एएनआय)

त्यांच्या विरोधात रोत म्हणाले की, भाजपाचे उमेदवार आदिवासी समाजात फूट पाडत आहेत आणि शिवीगाळ करत आहेत. “मालवीय ज्या प्रकारची वक्तव्ये देत आहेत, त्यातून आदिवासी समाजाला शिव्या देत आहेत. भाजपा आदिवासी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आमचे आदिवासी कोणत्याही पक्षाशी संबंधित असतील, पण त्यांना एकत्र आणण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही पक्षापेक्षा वरचा विचार करतो, आम्ही आदिवासींचा विचार करतो,” असे ते म्हणाले.

डामोर म्हणाले की, काँग्रेस नेत्यांचा एक गट बीएपीबरोबर केलेल्या युतीच्या विरोधात आहे. “मला लोकांचा आणि पक्षाच्या नेत्यांचा पाठिंबा आहे, जे युतीच्या बाजूने नाहीत. मला निवडणूक जिंकण्याचा विश्वास आहे,” असे डामोर म्हणाले. मालवीय यांच्या समर्थनार्थ मतदारसंघात प्रचार करणारे भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले की, काँग्रेस कुठेही दिसत नाही. “काँग्रेस नेत्यांची अवस्था अशी झाली आहे की, ते महाप्रसादाला गेले तर प्रसाद संपला आणि बाहेर आल्यावर चपला गायब झाल्या.”

मतदारसंघातील कळीचे मुद्दे

काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या क्षेत्रात शिक्षण, रोजगार, रस्ते आणि वीज हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. “या भागात उद्योग आणि रोजगाराच्या संधी नाहीत. या भागातील अनेक लोक शेजारच्या गुजरात राज्यात काम मिळावं म्हणून जातात. स्त्रिया शेतात मजुरी करताना दिसतात,” असे एका आदिवासी स्थानिक रहिवाशाने सांगितले. ते पुढे म्हणाले, “बीएपीची विचारधारा कट्टरपंथी असल्याचे दिसते आणि भविष्यात ती धोकादायक ठरू शकते. ते समाजाच्या नावाखाली लोकांचे ध्रुवीकरण करत आहेत.”

मालवीय यांनी अलीकडेच भाजपामध्ये प्रवेश केला. मागील काँग्रेस सरकारमध्ये मालवीय दोनदा कॅबिनेट मंत्री राहिले होते. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर त्यांनी राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद नाकारले आणि पक्ष सोडला. त्यांनी बागीदोरा विधानसभा मतदारसंघातून आमदारकीचा राजीनामा दिला आणि फेब्रुवारीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला.

युतीमुळे मतभेद

काँग्रेस आणि वागड विभागातील नवीन पक्ष बीएपीमध्ये युतीसाठी चर्चा सुरू होती. मात्र, या युतीत जागावाटपावरून अनेक मतभेद होते. काही स्थानिक काँग्रेस नेत्यांनी विरोध केल्याने युतीची घोषणा करण्यात विलंब झाला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने बांसवाडा-डुंगरपूरमधून डामोर आणि बागीदोरामधून पोटनिवडणुकीसाठी कपूर सिंह यांना उभे करण्याचा निर्णय घेतला.

अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस आधी राजस्थान काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर सिंह रंधावा यांनी घोषणा केली की, दोन्ही निवडणुकांमध्ये पक्ष बीएपीला पाठिंबा देईल. मात्र, काँग्रेसच्या दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यास नकार दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला. बांसवाडा-डुंगरपूर लोकसभा मतदारसंघांतर्गत आठ विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपाकडे चार, काँग्रेसकडे तीन आणि बीएपीकडे एक आमदार आहे. राजस्थानमधील काँग्रेस नागौर (राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षासह) आणि सीकर (सीपीआय(एम)सह) या दोन जागांवर युतीचा भाग म्हणून निवडणूक लढवत आहे.

हेही वाचा : जातगणना, वारसा कर आणि संपत्तीचे फेरवाटप; काँग्रेसचे काय म्हणणे आहे?

बांसवाडा लोकसभा मतदारसंघातील बागीदोरा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतही अशीच काहीशी परिस्थिती आहे. या जागेवरून काँग्रेसने सुरुवातीला कपूर सिंह यांना उमेदवारी दिली होती. मात्र, आता काँग्रेसचे कार्यकर्ते कपूर सिंह यांच्या विरोधात उभे असून, बीएपी उमेदवार जयकृष्ण पटेल यांच्यासाठी घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत, असे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.