रिझर्व्ह बँकेने बुधवारी कोटक महिंद्र बँकेवर आयटी व्यवस्थापनात अनियमितता आढल्याने कारवाईचा बडगा उचलला. कारवाई नेमकी काय झाली, त्याचा बँकेच्या ग्राहकांवर नेमका काय परिणाम होणार, हे जाणून घेऊया…
कोटक महिंद्र बँकेवर नेमकी कारवाई काय?
खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्र बँकेवर कारवाईचा बडगा उगारत, तिला ऑनलाईन आणि मोबाइल बँकिंग माध्यमातून नवीन ग्राहक नोंदवण्यावर तसेच नव्याने क्रेडिट कार्ड वितरित करण्यावर रिझर्व्ह बँकेने बुधवारी निर्बंध लादले. बँकेच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) प्रणालीच्या २०२२ आणि २०२३ या वर्षातील परीक्षणात आढळून आलेल्या त्रुटी आणि उणिवांमुळे आणि त्यांचे वेळेवर निराकरण करण्यात बँक अपयशी ठरल्याने ही कृती आवश्यक होती, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. याचबरोबर बँकेला नवीन क्रेडिट कार्डाचे वितरणदेखील करता येणार नाही. मात्र, बँक तिच्या विद्यमान क्रेडिट कार्ड ग्राहकांसह इतर सर्व प्रकारच्या ग्राहकांना सेवा प्रदान करणे सुरू ठेवू शकणार आहे. कोटक महिंद्र बँकेत मोबाईल उपयोजन आणि ऑनलाइन माध्यमातून नवीन खाते उघडले जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यावरच निर्बंध आल्याने बँकेचे नवीन ग्राहक संपादन लक्षणीय स्वरूपात प्रभावित होण्याची शक्यता आहे. सलग दोन वर्षे रिझर्व्ह बँकेकडून कोटक महिंद्र बँकेच्या माहिती-तंत्रज्ञान प्रणालीतील जोखीम व्यवस्थापन, विक्रेता जोखीम व्यवस्थापन, विदा (डेटा) सुरक्षा आणि विदा प्रतिबंधक धोरण यांचे मूल्यांकन केले गेले आहे. नियामकांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विपरित, यांमध्ये उणिवा आढळून आल्या आहेत. तपासणीच्या दरम्यान, बँकेने तिच्या वाढीशी सुसंगत माहिती-तंत्रज्ञान प्रणाली आणि नियंत्रणे तयार करण्यात अपयश दिसून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असे मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे. निदर्शनास आणल्या गेलेल्या सर्व उणिवांबाबत सर्वसमावेशक बाह्य लेखापरीक्षण करून, समाधानाकारक बदल दिसून आल्यास निर्बंधांचे पुनरावलोकन केले जाईल, असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : गेल्या पाच वर्षांत देशाला अतिवृष्टी, पूर, दुष्काळाचा फटका, याविषयी भाजपा-काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय?
रिझर्व्ह बँकेकडून कारवाई कशामुळे?
रिझर्व्ह बँकेने २०२२ आणि २०२३ असे सलग दोन वर्षे चाललेल्या मूल्यांकनात आढळून आलेल्या उणिवांनंतर, जारी केलेल्या सुधारात्मक कृती योजनांचेही कोटक महिंद्र बँकेने पालन केले नाही. बँकेने सादर केलेला अनुपालन अहवाल एकतर अपुरा, आणि योजलेले उपाय चुकीचे किंवा तकलादू होते, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. ग्राहक सेवा प्रदान करण्याच्या बँकेच्या क्षमतेवरच नव्हे तर डिजिटल बँकिंग आणि देयक प्रणालीच्या आर्थिक परिसंस्थेवरही गंभीर परिणाम संभवणाऱ्या या उणिवा तातडीने दूर करणे ग्राहकहित पाहता अत्यावश्यक होते. २०२० मध्ये अशाच निर्बंधांचा बडगा देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या एचडीएफसी बँकेवरही याच कारणाने उगारला गेला होता.
ग्राहक सेवेशी संबंधित काय उणिवा होत्या?
रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, मजबूत माहिती तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणि जोखीम व्यवस्थापन आराखड्याचा अभाव आढळून आला. परिणामी बँकेची कोअर बँकिंग प्रणाली (सीबीएस), आणि तिच्या ऑनलाइन आणि डिजिटल बँकिंग चॅनेलला गेल्या दोन वर्षांत (सर्वात अलीकडे १५ एप्रिल रोजी) सेवा स्थगित कराव्या लागल्या. परिणामी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागला. रिझर्व्ह बँकेने सुसंगत आयटी प्रणाली तयार करण्यासाठी बँकेला सूचना करूनही त्यात कमतरता असल्याचे आढळून आले.
हेही वाचा : जातगणना, वारसा कर आणि संपत्तीचे फेरवाटप; काँग्रेसचे काय म्हणणे आहे?
बँकेशी संपर्क साधला गेला?
गेल्या दोन वर्षांत नियामकाने बँकेच्या समस्येबाबत सतत सूचना केल्या होत्या. या कालावधीत क्रेडिट कार्ड्सशी संबंधित व्यवहारांसह, बँकेच्या डिजिटल व्यवहारांमध्ये झपाट्याने वाढ असल्याचे निरीक्षण रिझर्व्ह बँकेने नोंदवले होते. ज्यामुळे आयटी प्रणालींवर आणखी भार पडत असल्याचेही रिझर्व्ह बँकेने सांगितले जाते. परिणामी ग्राहकांच्या हितासाठी बँकेवर काही व्यावसायिक निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोटक महिंद्र बँकेकडून यावर वेळीच पावले उचलली न गेल्यास बँकेच्या क्षमतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. परिणामी एकूण बँकिंग परिसंस्थेला देखील हानी पोहोचू शकते. कोटक महिंद्र बँकेचा बहुतांश व्यवसाय हा डिजिटल माध्यमातून पार पडतो. शिवाय किरकोळ ग्राहक सेवा (रिटेल सेगमेंट) हा प्रमुख गाभा आहे. त्यामुळे यावर परिणाम झाल्यास बँकेच्या एकूण व्यवसायावर परिणाम शक्य आहे.
बँकेच्या विद्यमान ग्राहकांचे काय होईल?
रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, कोटक महिंद्र बँक त्यांच्या विद्यमान क्रेडिट कार्ड ग्राहकांसह बँकिंग सेवा प्रदान करणे सुरू ठेवू शकणार आहे. त्यांच्या व्यवहारांत कोणत्याही अडचणी येणार नसून ते नेहमीप्रमाणे सुरू राहतील. फक्त ऑनलाइन, मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून नवीन ग्राहक आणि नवीन क्रेडिट कार्डचे वाटप करता येणार नाही.
हेही वाचा : विश्लेषण: पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती घोटाळा नेमका काय? शिक्षकांवरच वेतन परत करण्याची वेळ का आली?
कोटक महिंद्र बँकेची प्रतिक्रिया काय?
कोटक महिंद्र बँकेने स्पष्ट केले की, त्यांच्या बँकेच्या शाखा नवीन ग्राहकांना सामावून घेणे सुरू ठेवतील आणि त्यांना केवळ नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्याव्यतिरिक्त बँकेच्या सर्व सेवा प्रदान करतील. तसेच बँकेने आपल्या आयटी प्रणाली मजबूत करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत आणि लवकरात लवकर उर्वरित समस्यांचे निराकरण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेसोबत काम करणे सुरू ठेवेल. बँकेच्या विद्यमान ग्राहकांना क्रेडिट कार्डसह मोबाईल आणि नेट बँकिंगद्वारे अखंडित सेवा देणे सुरू ठेवू, अशी प्रतिक्रिया बँकेने रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर दिली आहे.
कोटक बँकेच्या शेअरवर परिणाम काय?
रिझर्व्ह बँकेने केलेल्या कारवाईनंतर शेअर बाजारात गुरुवारी गुंतवणूकदारांची नकारात्मक प्रतिक्रिया उमटली आहे. सकाळी व्यवहार सुरू होताच कोटक बँकेच्या समभागात १० टक्क्यांची घसरण झाली. दुपारी १२ वाजता मुंबई शेअर बाजारात कोटक बँकेचा शेअर १०.४१ टक्क्यांच्या म्हणजेच १९१ रुपयांच्या घसरणीसह १६५२.५० रुपयांवर व्यवहार करतो आहे. बुधवारी बाजार बंद होतेवेळी बँकेचे बाजार भांडवल ३.६६ लाख कोटी होते, ते आता ३.२८ लाख कोटींपर्यंत खाली आले आहे.
बँक प्रवर्तक आणि निवडणूक रोखे…
स्टेट बँकेने निवडणूक आयोगाला दिलेल्या निवडणूक रोख्यांच्या तपशिलानुसार, मुंबईस्थित इन्फिना फायनान्सने एकंदर ६० कोटी रुपयांची देणगी भारतीय जनता पक्षाला दिली आहे. इन्फिना फायनान्स ही कोटक कुटुबीयांच्या मालकीची कंपनी आणि कोटक महिंद्र बँकेच्या प्रवर्तकांपैकी एक आहे. ही देणगी तिने २०१९, २०२० आणि २०२१ या वर्षांत दिली. मार्च २०२४ रोजी उपलब्ध माहितीनुसार, संस्थापक उदय कोटक यांची बँकेत २५.७१ टक्के मालकी आहे. उल्लेखनीय म्हणजे बँकेतील त्यांच्या भागभांडवली हिस्सेदारीची मर्यादा तसेच त्यांच्याकडे असलेले बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद यावरून, याच काळात तिचे रिझर्व्ह बँकेबरोबर खटके उडाले. रिझर्व्ह बँकेला न्यायालयात खेचले गेले आणि इतक्या विकोपाला गेलेल्या या प्रकरणी एकाएकी सामोपचाराने तोडगाही निघाला.