Explained: एका मिस कॉलने मोबाइल हॅक करु शकणारं पेगॅसस म्हणजे नेमकं काय?

‘पेगॅसस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केलं आहे

Pegasus, Pegasus spyware, WhatsApp
‘पेगॅसस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केलं आहे

पेगॅसस पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. इस्रायली गुप्तहेर तंत्रज्ञान संस्थेच्या अनेक सरकारी ग्राहकांनी सूचिबद्ध केलेल्या हजारो दूरध्वनी क्रमांकाच्या फुटलेल्या माहितीत ३०० हून अधिक भारतीय मोबाइल क्रमांकाचा समावेश आहे. हे मोबाइल क्रमांक मंत्री, विरोधी पक्षनेते, पत्रकार, विधिज्ञ, उद्योगपती, सरकारी अधिकारी, शास्त्रज्ञ, मानवी हक्क कार्यकर्ते आणि इतरांनी वापरलेले आहेत, असे शोधपत्रकारितेच्या ‘प्रोजेक्ट पिगॅसस’मधून उघड झालं आहे. यानिमित्ताने हे पेगॅसस म्हणजे नेमकं काय आहे आणि ते तुमचा मोबाइल कसं हॅक करु शकतं हे समजून घेणार आहोत.

मंत्री, विरोधी पक्षनेते, पत्रकारांवर पाळत?

जगभरातील महत्त्वाचे सुमारे १,४०० मोबाइल क्रमांक हॅक करण्यासाठी गुप्तहेरांनी ‘पेगॅसस’ या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. ‘पेगॅसस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केलं आहे, अशा बातम्या २०१९मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. व्हॉटसअ‍ॅप या समाजमाध्यम कंपनीने इस्रायली गुप्तहेर संस्था- ‘एनएसओ’ला न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला होता.

२०१९ मध्ये पेगॅसस चर्चेत आलं होतं जेव्हा काही व्हाट्सअॅप वापरकर्त्यांनी आपल्याला पेगॅससकडून मोबाइल फोनच्या सुरक्षेशी संबंधित तडजोड केली जात असल्याचा मेसेज आल्याची तक्रार केली होती. यामध्ये पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. यामध्ये एल्गार परिषद प्रकरणातील आरोप, भीमा कोरेगाव प्रकरणातील वकील, दलित कार्यकर्ता, याचं वार्तांकन करणारे पत्रकार आणि दिल्ली विद्यापीठातील एका प्राध्यापकाचा समावेश होता.

Pegasus Snoopgate : इस्त्रायलच्या पेगॅससची स्वतंत्रपणे चौकशी करा; शशी थरुर यांची सरकारकडे मागणी

जगभरात अनेक देशांच्या सरकारांकडून पेगॅससचा वापर होत असल्याने प्रत्येक वेळी कशा पद्दतीने याचा वापर करत फोन हॅक करण्यात आला याची चर्चा होत असते. रविवारी संध्याकाळी, काही प्रतिष्ठीत वेबसाईट्सकडून पेगॅससच्या सहाय्याने हॅक करण्यात आलेल्या मोबाइल क्रमांकांची माहिती (global surveillance operations) देण्यात आली. या रिपोर्टमध्ये भारतातील एकूण ४० जणांचा समावेश असून पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि काही महत्वाचे लोक आहेत.

या रिपोर्टनुसार, एकूण देशातील एकूण १० सरकारांनी पाळत ठेवण्यासाठी पेगॅसस सॉफ्टवेअरचा पर्याय निवडला असून यामध्ये भारताचाही समावेश आहेत. भारत सरकारने गार्डियनशी बोलताना दावा चुकीचा आहे सांगितलं असलं तरी पेगॅससचा वापर करत असल्याचं अप्रत्यक्षपणे मान्य केलं आहे.

२०१६ मध्ये सर्वात प्रथम आलं समोर

पेगॅसस स्पायवेअरला इस्त्रायच्या सायबर सिक्युरिटी कंपनी एनएसओने तयार केलं आहे. या कंपनीची स्थापना २००८ साली झाली होती. २०१६ मध्ये सर्वात प्रथम हे सॉफ्टवेअर प्रकाशझोतात आलं होतं. एका अरब सामाजिक कार्यकर्त्याने संशयास्पद मेसेज आल्यानंतर संशय व्यक्त केला होता. पेगॅसस त्यावेळी आयफोन वापरकर्त्यांना टार्गेट करण्याचं प्रयत्न करत होतं अशी शंका होती. काही दिवसांनंतर अॅपलने आयओएसचं नवं व्हर्जन आणलं. यानंतर पेगॅसस सुरक्षेतील त्रुटीचा वापर करत हॅकिंग करत असल्याचं समोर आलं होतं.

२०१९ मध्ये फेसबुककडून तक्रार

२०१९ मध्ये फेसबुकने पेगॅससची निर्मिती केल्याप्रकरणी एनएसओ ग्रुपविरोधात तक्रार दाखल केली. फेसबुकमधील सुरक्षा अधिकारी तपास करत असताना त्यांना पेगॅससच्या माध्यमातून भारतातील काही पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर पाळत ठेवली जात असल्याचं समोर आलं होतं. याचेवळी व्हॉट्सअपने या भारतीयांना मेसेज पाठवून माहिती दिली होती.

पेगॅसस फोन हॅक कसं करतं ?

पेगॅसस अशा पद्धतीने फोन हॅक करतं की वापरणाऱ्यालाही ते कळत नाही. हॅकरला एकदा जो फोन हॅक करायचा आहे त्याची माहिती मिळाली की त्याला एका वेबसाईटची लिंक पाठली जातो. जर युजरने त्या लिंकवर क्लिक केलं तर मोबाइलमध्ये पेगॅसस इन्स्टॉल होतं. ऑडिओ कॉल्स तसंच व्हॉट्सअॅपसारख्या अॅपमधील सुरक्षेच्या त्रुटींमधूनही हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतं. पेगॅससची पद्धत इतकी गुप्त आहे की, युजरला मिस कॉल देऊनही हॅकिंग केलं जाऊ शकतं. सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्या मोबाइलमधील आलेल्या फोन क्रमाकांची यादीही ते डिलीट करु शकतात. यामुळे युजरला मिस कॉल आल्याचीही माहिती मिळत नाही.

पेगॅसस काय करु शकतं ?

एकदा पेगॅससने तुमच्या मोबाइलमध्ये शिरकाव केला की ते सतत पाळत ठेवू शकतं. व्हॉट्सअॅपसारख्या अॅपमधून करण्यात आलेले चॅटही ते पाहू शकतात. सुरक्षा तज्ज्ञांनुसार, पेगॅसस मेसेज वाचू शकतं तसंत कॉलही ट्रॅक करु शकतं. याशिवाय अॅप्सचा वापर, त्यात होणाऱ्या घडामोडी, लोकेशन डेटा, व्हिडीओ कॅमेराचा ताबा मिळवणे, मायक्रोफोनच्या सहाय्याने संभाषण ऐकणं या गोष्टीही शक्य आहेत.

दहशतवादावर नियंत्रणासाठी वापर करत असल्याचा कंपनीचा दावा

हे स्पायवेअर फक्त सरकारी एजन्सीना विकण्यात आलं आहे. त्याचा उद्देश केवळ दहशतवादाविरोधात लढणे हाच आहे असा इस्त्राईलच्या कंपनीचा दावा आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व समजून घ्या बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: What is pegasus spyware how it works and how it hacks into whatsapp sgy

Next Story
समजून घ्या सहजपणे : येस बँकेत झाले काय, होणार काय?
ताज्या बातम्या