हिंदू धर्मात धाग्यांना फार महत्त्व आहे. हे धागे म्हणजे नुसते दोरे नाहीत. तर त्यामागे खास अर्थ आणि कारण लपलं आहे. हिंदू धर्मात पाच धागे असे आहेत जे धार्मिक प्रतीक म्हणून हातात बांधले जातात किंवा गळ्यात घातले जातात. प्रत्येक धाग्यांचा खास अर्थ आहे. आपण याचबाबत जाणून घेणार आहोत.
लाल धागा (कलावा किंवा मोली)
लाल रंगाच्या धाग्याला हिंदू धर्मात खास महत्त्व आहे. या धाग्याला कलावा किंवा मोली असंही म्हटलं जातं. हा धागा उजव्या हाताच्या मनगटावर बांधला जातो. ताकद, सुरक्षा आणि पावित्र्य यांचं प्रतीक म्हणून हा धागा बांधण्याची पद्धत हिंदू धर्मात आहे. हा धागा राक्षसी शक्तींपासून आणि नकारात्मक उर्जेपासून रक्षण करतो अशी श्रद्धा आहे. देवी दुर्गा, मारुती आणि गणपती यांचं प्रतीक म्हणून हा धागा हातात बांधण्याची पद्धत रुढ आहे.
पिवळा धागा
पिवळा रंग हा ज्ञान आणि बुद्धिमत्ता या दोहोंसाठी कारक रंग मानला जातो. तसंच हा रंग विष्णूचा आवडता रंग म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे हिंदू धर्मात उजव्या हातावर बांधण्याची प्रथा आहे. हा धागा विष्णू आणि सरस्वती यांचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे हा धागा हातावर बांधण्याची प्रथा हिंदू संस्कृतीत आहे.
काळा धागा
काळा धागा हातात बांधण्यालाही हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. असुर शक्ती, नकारात्मक उर्जा यांच्यापासून काळा रंग आपलं रक्षण करतो अशी धारणा हिंदू धर्मात आहे. औदास्य, नैराश्य यांना हा रंग शोषून घेतो आणि तो धागा परिधान करणाऱ्याच्या आयुष्यात शांतता, सुख प्रदान करतो अशीही धारणा आहे. शनि, काली माँ, काळभैरव यांचं प्रतीक म्हणून हा धागा हातात बांधण्याची पद्धत आहे.
भगवा किंवा नारंगी धागा
भगवा रंग किंवा नारंगी रंगही हिंदू धर्मात महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या रंगाचा धागाही हातावर बांधण्याची प्रथा हिंदू धर्मात आहे. आरोग्य, धनसंपदा यासाठी हा धागा हातावर बांधणं महत्त्वाचं मानलं जातं. अग्नी आणि सूर्य यांचं प्रतीक म्हणूनही हा धागा हातावर बांधतात. सकारात्मक उर्जा निर्माण करण्याचं काम हा धागा करतो अशी श्रद्धा आहे.
जानवे किंवा यज्ञोपावित
हिंदू संस्कृतीत जानवे किंवा यज्ञोपावित परिधान करण्यालाही विशेष महत्त्व आहे. उपनयन म्हणजेच मुंज संस्कार झाल्यानंतर खांद्यावरुन कमरेपर्यंत रुळणारे जानवे घातले जाते. जानवं हे आत्मशांतीसाठी, साधेपणासाठी आणि सकारात्मक विचारांसाठी खांद्यावरुन कमरेपर्यंत घालण्याची प्रथा आहे. गायत्री मंत्र म्हणून जानवे परिधान केलं जातं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.