सध्याच्या घडीला धकाधकीच्या आयुष्यात नातेसंबंध हे गुंतागुंतीचे होऊ लागले आहेत. एक काळ असा होता की विवाहबाह्य संबंधांची व्याख्या ही परपुरुष किंवा स्त्री यांच्याशी आलेले शारिरीक संबंध. आता या सगळ्याच्या व्याख्या बदलून गेल्या आहेत. सोशल मीडिया आणि डिजिटल युगात मायक्रो चिटिंग हा शब्द चर्चेत आला आहे. मायक्रो चिटिंग म्हणजे काय? शिवाय याची चर्चा का होते आहे? हे आपण जाणून घेऊ.
काय आहे मायक्रो चिटिंग?
मायक्रो चिटिंग म्हणजे थेट अफेअर असं नाही. पण छोट्या छोट्या गोष्टी. अशा गोष्टी ज्या दुर्लक्षित असतात. त्या दुसऱ्याशी शेअर करणं. मात्र त्या गोष्टी जर तुमच्या पतीला किंवा पत्नीला समजल्या तर नात्यात दुरावा निर्माण होण्याची चिन्हं असतात. शिवाय अविश्वासही निर्माण होऊ शकतो.
मायक्रो चिटिंग म्हणजे थोडक्यात..
खास मित्राशी, मैत्रिणीशी गरजेपेक्षा जास्त बोलणं हे अनेकजण/जणी करतात. यात सुरुवातीला गंमत वाटते पण नंतर आपल्या पती किंवा पत्नीपासून हे बोलणं लपवावसं वाटतं.
चॅट्स आणि मेसेजेस लपवणं, लॉक ठेवणं ही याची पुढची पायरी असते. आपल्या पतीला किंवा पत्नीला कळू नये म्हणून फोन लॉक ठेवला जातो किंवा मेसेज हाईड अर्थात लपवले जातात.
एखाद्या व्यक्तीची अनेकदा तारीफ करणं हे देखील त्याच्याकडून किंवा तिच्याकडून होऊ शकतं. जे तुमच्या पार्टनरला खटकण्याची चिन्हं खूप असतात.
पूर्वाश्रमीच्या प्रियकर किंवा प्रेयसीच्या आठवणीत सारखं रमणं. ती कशी चांगली होती, तो कसा चांगला होता अशी तुलना करत राहणं. त्याबाबत विचार करणं.
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खोटं बोलणं हे आपसूकच या सगळ्या गोष्टींमुळे वाढतंंच.
या सगळ्या गोष्टी मायक्रो चिटिंगमध्ये येतात. वर-वर यात तसं फसवणुकीसारखं काही नाही. पण समोरच्या तिला किंवा त्याला ही फसवणूक वाटू शकते. कारण यामध्ये गोष्टी लपवण्यावर भर असतो. त्यामुळे मायक्रो चिटिंगची सध्या चर्चा आहे. कारण थोड्या प्रमाणात जवळपास अनेकजण असं करतात.
पती पत्नीचं नातं विश्वासावर आधारलेलं
पती-पत्नी किंवा प्रियकर प्रेयसी यांचं नातं विश्वासावर आधारलेलं असतं. मायक्रो चिटिंगमुळे या विश्वासाला तडा जाण्याची शक्यता असते. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही तुमच्या व्यक्तीपासून लपवू लागलात किंवा त्यात खोटं बोलू लागलात तर समोरच्या त्याला किंवा तिला संशय येणं स्वाभाविक असतं. कधीकधी बोलून मार्ग निघतोही पण तरीही या गोष्टी होणं हे नात्यात दुरावा निर्माण होण्याची सुरुवात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.