Pradhan Mantri Bal Puraskar 2025 : केंद्र सरकारने १९९६ मध्ये राष्ट्रीय बाल पुरस्काराची सुरुवात केली. महिला आणि बालविकास मंत्रालयाने विविध क्षेत्रांत असामान्य कामगिरी करणाऱ्या बालकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने या पुरस्काराची घोषणा केली. १९९६ पासून पुरस्कार मिळालेली सर्व मुले कर्तव्य पथावरील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेतात. पण, या पुरस्काराचे पात्रता निकष नेमके काय आहेत, तसेच अर्ज प्रक्रिया कशी आहे यासह इतर तपशिलांबद्दल जाणून घेऊ….
पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणत्या मुलांना मिळतो?
भारत सरकारकडून दिला जाणारा हा पुरस्कार देशातील सर्वांत प्रतिष्ठित नागरी सन्मानांपैकी एक आहे. महिला आणि बालविकास मंत्रालय या पुरस्कारासाठी मुलांची निवड करते. ५ ते १८ वयोगटातील मुलांना त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. जे भारताचे नागरिक आहेत आणि देशात राहतात, त्या मुलांना हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. निवडलेल्या मुलांची नावे २६ डिसेंबर या राष्ट्रीय शौर्यदिनी जाहीर केली जातात.
७ श्रेणींत दिला जाईल ‘हा’ पुरस्कार
सात श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जातो. ज्यामध्ये कला व संस्कृती, शौर्य, नवोपक्रम, शिक्षण, समाजसेवा व क्रीडा यांचा समावेश होता. पण, आता त्यात विज्ञान व तंत्रज्ञान या श्रेणींची भर पडली आहे.
कोणाच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडतो?
पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार सोहळा दरवर्षी भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पार पडतो. मुलांच्या कामगिरीची ओळख पटवणे, त्यांच्या समवयस्कांना प्रेरणा देणे आणि देशातील तरुणांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
अर्ज कोण करू शकते?
या पुरस्कार सोहळ्यासाठी इतर कोणत्याही व्यक्ती, शाळा, युवा गट, स्वयंसेवी संस्थेद्वारे अर्ज करता येतो किंवा स्वतः बालक \ बालिकादेखील अर्ज करू शकते. अर्ज करण्यासाठी नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल, आधार क्रमांक यांसारख्या माहितीसह पोर्टलवर नोंदणी करावी लागते. पण या पुरस्कारासाठी संबंधित मुलाने वरील सात श्रेणींत कोणत्याही एका श्रेणीत विशेष योगदान दिलेले असावे.
अर्ज करण्याची पद्धत
पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. तुम्ही सरकारच्या अधिकृत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल [https://awards.gov.in] ला भेट देऊन, अर्जाचा फॉर्म भरू शकता.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी
अर्ज करणाऱ्या मुलाचा जन्मदाखला
जर मुलाने शाळा पूर्ण केली असेल, तर शाळा सोडल्याचा दाखला
आधार कार्ड
पासपोर्ट आकाराचा फोटो
मुलाच्या कामगिरीचे शाळेकडून प्रमाणपत्र.
त्या क्षेत्राशी संबंधित कामगिरीची प्रमाणपत्रे किंवा कागदपत्रे
मान्यताप्राप्त आणि प्रतिष्ठित व्यक्तीकडून शिफारस पत्र
पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज कसा करावा? (How To Apply Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar 2025)
१) अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम awards.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२) आता होमपेजवर दिसणाऱ्या रजिस्ट्रेशन बटणावर क्लिक करा.
३) आता ज्या व्यक्ती किंवा संस्थेच्या वतीने नोंदणी केली जात आहे, त्याचे ऑप्शन निवडा.
४) आधार क्रमांक, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी इत्यादी सर्व आवश्यक माहिती योग्य रीतीने भरा.
५) जर एखादी संस्था अर्ज करीत असेल, तर तिला तिच्या संस्थेशी संबंधित माहिती आणि अधिकृत व्यक्तीची माहिती द्यावी लागेल.
६) नोंदणी पूर्ण झाल्यावर, तुम्हाला लॉगिन क्रेडेन्शियल्स मिळतील.
७) आता दिलेल्या क्रेडेन्शियल्ससह लॉगिन करा आणि अर्ज प्रक्रिया सुरू करा.
८) पुरस्कार यादीमध्ये पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार निवडा.
९) नंतर ‘नॉमिनेट किंवा ‘अप्लाय नाऊ’ बटणावर क्लिक करा.
१०) फॉर्म ओपन होईल. त्यानंतर सर्व आवश्यक ती माहिती भरा. नंतर कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.
११) भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआऊट काढून ठेवा.
पुरस्कार जिंकल्यास काय मिळेल?
पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराच्या प्रत्येक विजेत्याला पदक व प्रमाणपत्र दिले जाते. त्यासह पुरस्कार विजेत्यांना एक लाख रुपयांचे रोख पारितोषिकही दिले जाते.