– योगेश मेहेंदळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतला पहिला डॉक्टर कोण असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे गार्सिया दा ओर्ता. हा मूळचा पोर्तुगालचा डॉक्टर होता. गोव्यात पोर्तुगीज गव्हर्नरपासून ते आदिलशाहीसारख्या राजघराण्यांचा किंवा अतिश्रीमंत लोकांचा फॅमिली डॉक्टर होता. त्यामुळे गार्सिया हा स्वत:देखील प्रचंड श्रीमंत होता. पोर्तुगालच्या करन्सीवर किंवा नोटेवर त्याचं चित्र होतं, हे लक्षात घेतलं म्हणजे तो किती बडी हस्ती होता हे लक्षात येतं. पण हा गार्सिया ज्यू होता आणि त्यावेळी पोर्तुगाल हा कट्टर कॅथॉलिक होता. गोव्यासह भारतामध्ये पोर्तुगीजांची ओळख ही सक्तीचं धर्मांतर ही होती. या गार्सियाचंही सक्तीनं धर्मांतरण केल्याचं सांगण्यात येतं. परंतु असंही सांगितलं जातं की तो बाह्य दर्शनी ख्रिश्चन झाला परंतु मनानं व खासगी आटरणानं ज्यूच राहिला होता. गार्सियाच्या मृत्यूनंतर झालेल्या इन्क्विझिशनमध्ये म्हणजे अशा कॅथॉलिकांचा छळ ज्यांनी कॅथॉलिक धर्म स्वीकारलाय परंतु गुप्तपणे जुनाच धर्म पाळतायत, यात गार्सियाच्या बहिणीला जिवंत जाळून मारण्यात आलं होतं.

सोळाव्या शतकातली ही गोष्ट आहे. पोर्तुगालमधल्या धार्मिक कट्टरतेला कंटाळून गार्सिया गोव्यात आला होता. अत्यंत विद्वान व डॉक्टर असलेल्या गार्सियाचा औषधी वनस्पतींचा विशेष अभ्यास होता. कॉन्व्हर्सेशन ऑन दी ड्रग्ज अँड सँपल्स ऑफ इंडिया हे गार्सियानं लिहिलेलं पुस्तक खूप गाजलं होतं. या पुस्तकात त्यानं भारतात लागवड होणाऱ्या औषधी ववस्पतींची व औषधांची अतिशय उपयुक्त माहिती दिलेली आहे. या श्रीमंत असलेल्या गार्सियानं मुंबई बेट, म्हणजे मुंबईतील सात बेटांपैकी एक जे सध्याच्या फोर्ट परीसराबाबत म्हणता येईल ते पोर्तुगालच्या राजाकडून १५५४ साली भाड्यानं घेतलं. त्याचं वर्षाचं भाडं होतं ७५ पौंड. अशा वार्षिक भाड्यानं दिलेल्या इस्टेटींना वाझा दौर म्हणत. आता सांगितलं तर विश्वास बसणार नाही पण सोळाव्या शतकात म्हणजे फक्त पाचशे वर्षांपूर्वी मुंबई व आजुबाजुची बेटं पोर्तुगीजांनी अशा श्रीमंत पोर्तुगीजांना भाड्यानं दिली होती. सगळ्यात जास्त भाडं होतं माहिम बेटाचं. ते होतं वर्षाला ७५१ रुपये. तर घारापुरी किंवा एलिफंटा केव्हज हे बेट जोआ पिरेज यास दिलं वार्षिक ३९ रुपये भाड्यावर. माझगावच भाडं होतं वर्षाला १७८ रुपये तर परळ, वडाळा, सायन, व वरळी या चारही बेटांचं मिळून वार्षिक भाडं होतं १५४ रुपये.

गार्सिया दा ओर्ताचं चित्र पोर्तुगालच्या चलनावर होतं

गार्सिया हा गोव्याला रहात होता, पण त्यानं सुट्टीत विश्राम करायला जागा हवी म्हणून सेकंड होमसारखं मुंबई बेट वार्षिक भाड्यानं घेतलं व या ठिकाणी बंगला बांधला. आजच्या तारखेला, जी अजूनही उभी आहे अशी मुंबईतली सर्वात प्राचीन वास्तू कुठली असेल तर तो हा बंगला किंवा कासा दोर्ता… म्हणजे दोर्ताचं घर. यालाच मनोर हाऊस असंही म्हणतात. गार्सिया १५७० मध्ये गोव्यात मरण पावला, त्यानंतर बडं प्रस्थ असलेल्या दुसऱ्या पोर्तुगीजानं हे बेट भाड्यानं घेतलं.

या गार्सियाला वनस्पतींची इतकी आवड होती की त्यानं या मुंबई बेटावर बंगल्याच्या आजुबाजुला अनेक प्रकारची झाडं लावली होती. या मध्ये औषधी वनस्पतींचा समावेश होता त्याप्रमाणेच गुलाब, फणस, जांभूळ, नारळ या सोबतच एका वेगळ्याच जातीच्या आंब्यांचीही लागवड केली होती. या झाडांना ऑक्टोबर व मे असा दोनवेळा बहर येत असे. माझगावमध्येही वर्षाला दोन वेळा बहर येणाऱ्या आंब्यांची झाडं होती.
या गार्सिया दा ओर्ताच्या बंगल्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुंबई इंग्रजांकडे सुपूर्त करण्याचा ऐतिहासिक करार १६६५ मध्ये तत्कालिन गव्हर्नर आजारपणामुळे मरण पावल्यामुळे त्याचा सचिव हंफ्रे कुक यानं पोर्तुगीजांशी केला व मुंबईचा ताबा घेतला तो याच बंगल्यात. नंतरच्या वर्षांमध्ये ब्रिटिशांनी आजुबाजुला घरं बांधली, कस्टम्स हाऊस बांधलं. समुद्रातून चाच्यांच्या होणाऱ्या हल्ल्यांपासून बचावासाठी गार्सियाच्या मूळ बंगल्याच्या बाजुला भक्कम तटबंदी, चार बुरूज बांधण्यात आले, व गार्सिया दा ओर्ता या पोर्तुगीज डॉक्टरच्या बंगल्याचं रुपांतर एका कॅसलमध्ये झालं.

या बंगल्याची किंवा गार्सियाच्या घराची अनेकवेळा डागडुजी करण्यात आली असली तरी मुंबईत उभी असलेली सगळ्यात जुनी वास्तू किंवा मुंबईचं मूल स्थान हा मान याच वास्तुचा आहे. मुंबईचा ताबा घेतल्यानंतर इंग्रजांनी या बंगल्यात आपली मुख्य कचेरी थाटली होती. सुरुवातीचे काही गव्हर्नर या बंगल्यात वास्तव्यास होते. सूर्यप्रकाशावर चालणारं सर्वात जुनं घड्याळ अजूनही इथं जपलेलं आहे. याच बंगल्याच्या एका खोलीत समुद्राविषयी वस्तुंचं संग्रहालय होतं, जे हलवण्यात आलं आहे.

मुंबईचं मूलस्थान किंवा गार्सिया दा ओर्ताचा बंगला व कॅसल या रॉयल एशियाटिक सोसायटी किंवा टाउन हॉलच्या मागे आहे

सध्याचा विचार केला तर आता ही जागा भारतीय नौदलाच्या ताब्यात असून वेस्टर्न कमांडचा प्रमुख या जागेमधून किंवा कॅसलमधून काम करतात. तुम्ही जर रॉयल एशिअॅटिकच्या किंवा टाउन हॉलच्या प्रांगणात गेलात तर नौदलाचं प्रवेशद्वार असलेल्या या कॅसलकडे तुम्ही बघू शकता. नौदलाच्या ताब्यात असल्यामुळे तुम्हाला आत प्रवेश मिलणार नाही, परंतु मुंबईचं मूलस्थान आपल्या समोर आहे याचा अनुभव मात्र नक्की येईल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of mumbai garsia da orta portuguese british rule origin of mumbai
First published on: 25-05-2021 at 08:30 IST