KYC Fraud : केवायसी ही बँक किंवा वित्तीय क्षेत्रातीतील एक आवश्यक प्रक्रिया आहे. केवायसीच्या माध्यमातून ग्राहकांकडून आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म भरला जातो. या फॉर्मध्ये ग्राहकाची ओळख आणि त्याच्याविषयी माहिती सांगितली जाते. केवायसीचा फुल फॉर्म ‘Know Your Customer’ असा आहे. जर संगणकावर किंवा मोबाईलवर हा फॉर्म भरला जात असतील तर त्यास ई केवायसी म्हणजेच ‘Electronic Know Your Customer’ असे म्हणतात. या प्रक्रियेद्वारे बँक किंवा वित्तीय क्षेत्रातील सेवांचा गैरवापर होणार नाही, हे सुनिश्चित केले जाते. त्यामुळेच वेळोवेळी बँक त्यांच्या ग्राहकांकडून केवायसी अपडेट करतात पण तरीसुद्धा केवासयी फसवणूकीचे अनेक प्रकरणे समोर येतात.
तुम्ही अनेकदा केवायसी फसवणूकीत पैसे गमावल्याच्या अनेक बातम्या वाचल्या असतील किंवा ऐकल्या असतील पण तुम्हाला केवायसी घोटाळा म्हणजे काय, माहिती आहे का? आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत.
केवायसी घोटाळा म्हणजे काय?
वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक केली जाते. आपले नाव, पत्ता, आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच संबंधित बँकेच्या तपशीलाचा वापर करतात. या माहितीच्या आधारे गैर व्यव्हार करतात, अनधिकृत खाती उघडतात आणि खाती हॅक करून त्याचा गैरवापर करतात.
स्कॅमर कॉल, इमेलवर बँकिंग अधिकाऱ्यांची नक्कल करून संबंधित व्यक्तींना माहिती विचारतात. याशिवाय मेसेजवर केवायसी अपडेट करण्यासाठी लिंक पाठवतात आणि त्या लिंकवर क्लिक करून अपडेट करण्यास सांगतात. जर आपण त्या लिंकवर क्लिक केले तर आपले आर्थिक नुकसान होऊ शकते.
हेही वाचा : कधीकधी एखाद्या व्यक्तीने स्पर्श करताच तुम्हाला करंट लागतो का? हे आहे कारण…
केवायसी फसवणूक होऊ नये, म्हणून कोणती काळजी घ्यावी?
- वैयक्तिक माहितीविषयी काळजी घ्या – तुमची संवेदनशील माहिती ऑनलाइन किंवा फोनवर शेअर करणे टाळा. अनोळखी कॉलरबरोबर आणि अज्ञात वेबसाइटवर माहिती शेअर करू नका. वैध वित्तीय संस्था क्वचितच तुम्हाला ईमेलवर किंवा फोनवर पिन, पासवर्ड विषयी माहिती विचारतात.
- डिजिटल व्यवहार सुरक्षित करा – तुमच्या सर्व खात्यांसाठी चांगला आणि कठीण पासवर्ड तयार करा ज्यामुळे तुम्ही सुरक्षितरित्या डिजिटल व्यव्हार करू शकता.शक्य असेल तिथे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन करा ज्यामुळे तुमचे खाते लगेच हॅक होऊ शकत नाही. त्यासाठी दोन प्रकारची ओळख आवश्यक असते. मोबाईल किंवा लॅपटॉप सुरक्षित ठेवा.
- कोणत्याही ऑनलाईन गोष्टींचा वापर करण्यापूर्वी माहिती तपासा – कोणतेही अॅप किंवा ऑनलाईन कोणत्याही गोष्टींचा वापर करण्यापूर्वी त्याबाबतील पडताळणी करा आणि माहिती तपासा. वेबसाइट किंवा अॅपविषयी जाणून घ्या अन्यथा फसवणूक होऊ शकते.
- आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवा – तुमचे बँक स्टेटमेंट, क्रेडिट कार्ड बिल, इत्यादी आर्थिक व्यवहारांवर नीट लक्ष ठेवा. जर तुम्हाला कोणतीही बाब संशयास्पद किंवा अनधिकृत वाटली तर त्या संदर्भात संबंधित संस्थेला कळवा.
- सावध राहा – डिजिटल व्यवहार करताना नवीन घोटाळे किंवा फसवणूकीच्या प्रकरणांविषयी जाणून घ्या आणि त्यापासून सावध राहा. सायबर धोका ओळखण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी जास्तीत जास्त नवीन माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
- संशयास्पद गोष्टीची तक्रार करा- तुम्हाला डिजिटल व्यव्हार करताना एखादी गोष्ट संशयास्पद वाटली किंवा वैयक्तिक माहिती किंवा आर्थिक खात्यांशी संबंधित गैरव्यव्हार होत असल्याचा संशय आला तर संबंधित वित्तीय संस्था आणि अधिकाऱ्याला कळवा.
- याशिवाय पासवर्ड नियमितपणे बदलणे, ऑनलाईन कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी डिजिलॉकर वापरणे, सार्वजनिक वायफाय वापरू नये, पडताळणीशिवाय कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये, इत्यादी काळजी घेणे गरजेचे आहे.