Why are books square and rectangular: ग्रंथ, कादंबरी, कवितासंग्रह असो किंवा भयकथेचं पुस्तक असो अशी विविध विषयांवरील आधारित पुस्तकं वाचायला अनेकांना आवडतात. पण, ही विविध विषयांवरील पुस्तकं वाचताना तुम्ही कधी पुस्तकाच्या आकाराकडे लक्ष दिले आहे का? पुस्तकांचा आकार नेहमीच चौकोनी आणि आयताकृती का असतो, असा प्रश्न तुम्ही कधी स्वत:ला विचारला आहे का? हा प्रश्न आता तुमच्याही मनात उभा राहिला असेल, तर आज आम्ही तुम्हाला विज्ञान आणि डिझाइनशी संबंधित त्याचे मनोरंजक कारण सांगणार आहोत, जे तुम्ही कदाचित यापूर्वी कधीही ऐकले नसेल.

व्यावहारिक डिझाइन

चौकोनी किंवा आयताकृती पुस्तके निर्माण करणे, कपाटात ठेवणे, पिशवीत ठेवणे किंवा एकावर एक ठेवणे सोपे आहे. जर पुस्तके गोल किंवा त्रिकोणी असतील, तर ती घडी करणे, साठवणे आणि कुठेही घेऊन जाणे एक त्रासदायक काम झाले असते.

जर चौकोनी किंवा आयताकृतीऐवजी गोल किंवा त्रिकोणी पुस्तके बनवली गेली असती, तर गोल पुस्तके बॅगेत इकडून-तिकडे फिरली असती आणि त्रिकोणी पुस्तकाचे कोपरे वाकले असते.

छपाईचे वैज्ञानिक कारण

छपाई यंत्रांमध्ये वापरली जाणारी मोठी कागदी पाने आयताकृती असतात. त्यांना कापून पुस्तकाच्या स्वरूपात करण्याचा सर्वांत सोईस्कर आणि कमीत कमी वेळ जाणारा मार्ग देखील आहे.

याचा अर्थ गोल किंवा त्रिकोणी पुस्तके बनवणे म्हणजे जास्त वेळ, जास्त खर्च व जास्त अपव्यय होण्यासारखे आहे.

वाचनास सोईस्कर

जेव्हा तुम्ही पुस्तक वाचायला सुरुवात करता, तेव्हा ते वाचन तुम्ही डावीकडून उजवीकडे आणि वरपासून खालपर्यंत, असे केले जाते. या वाचन पद्धतीसाठी आयताकृती पृष्ठे सर्वोत्तम काम करतात. गोल पानांवर मजकूर बसविणे कठीण होईल आणि त्रिकोणी पाने जागेचा अपव्यय ठरतील.

प्राचीन काळी लोक गुंडाळ्यांवर (लांब कागदी गुंडाळ्यांवर) लिहायचे; परंतु त्या गुंडाळ्या वाचणे खूप कठीण होते. गुंडाळी पुन्हा पुन्हा उघडावी लागायची. जेव्हा पुस्तकांचा शोध लागला तेव्हा आयताकृती स्वरूप सर्वांत सोईस्कर वाटले.

डिझाइनपासून उत्पादनापर्यंत

पुस्तके डिझाइन करावी लागतात, छापावी लागतात, बांधावीही लागतात. ही संपूर्ण प्रक्रिया चौरस आकारात सर्वांत सोपी आणि स्वस्त आहे. प्रकाशकांसाठी हा आकार सर्वांत किफायतशीरदेखील आहे.

दरम्यान, यापूर्वी अनेकदा छोट्यांची पुस्तके प्रयोग म्हणून गोल, हृदयाच्या आकाराची किंवा त्रिकोणी बनवली गेली आहेत. परंतु, त्यांचा वापर आणि साठवणूक करणे कठीण झाल्यामुळे ती सामान्य झालेली नाहीत. पुस्तके चौकोनी, आयताकृती असणे हा केवळ योगायोग नाही, तर शतकानुशतके व्यावहारिक समज, वाचनाची सोय व उत्पादन या गरजांचा तो परिणाम आहे आणि म्हणूनच आपण आजही चौकोनी,आयताकृती पुस्तके वाचतो.