भारतामध्ये दरवर्षी असंख्य चित्रपट प्रदर्शित होतात. चित्रपट पाहण्यासाठी लोक चित्रपटगृहांमध्ये जात असतात. चित्रपटगृहांमध्ये गेल्यावर सिनेमा सुरु होण्याआधी अनेकजण खाण्यासाठी पॉपकॉर्न खरेदी करतात. ज्या लोकांना पॉपकॉर्न खायला आवडत नाही असे लोक सुद्धा चित्रपटगृहामध्ये गेल्यावर पॉपकॉर्न खरेदी करुन खातात. सिनेमागृह आणि पॉपकॉर्न हे समीकरण आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते. पण चित्रपट पाहताना पॉपकॉर्नच का खाल्ले जातात असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? सिनेमा पाहत पॉपकॉर्न खाण्याचा ट्रेंड कसा सुरु झाला हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपटगृहांमध्ये पॉपकॉर्न खाण्याची सुरुवात ही काही दशकांपूर्वी झाली होती. ‘पॉप्ड कल्चर: ए सोशल हिस्ट्री ऑफ पॉपकॉर्न इन अमेरिका’ या पुस्तकाचे लेखक एंड्र्यू एफ स्मिथ यांनी म्हटले आहे की, ‘पॉपकॉर्नची लोकप्रियता ही त्याची कमी किंमत, पॉपकॉर्न तयार करण्यासाठी लागणारा वेळ आणि लोकांची आवड या तीन गोष्टींमुळे वाढली. हा पदार्थ लवकर तयार होतो. तो बनवण्यासाठी मेहनत घ्यावी लागत नाही. शिवाय किंमत जास्त नसल्याने पॉपकॉर्न हे सिनेमागृहांची ओळख बनला.”

रिपोर्ट्सनुसार, पूर्वीच्या काळी चित्रपटगृहे बांधताना खूप खर्च येत असे. एखाद्या राजमहालाप्रमाणे त्यांची रचना केली जात असे. चित्रगृहामधील कारपेट, खुर्च्या या लक्झरी फील देणाऱ्या असत. तेव्हा या महागड्या गोष्टी खराब होऊ नये यासाठी चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ नेण्यावर बंदी होती. पुढे कालांतराने ही बंदी उठवण्यात आली. पॉपकॉर्न कुठेही खाता येतात. शिवाय पचायला हलका असलेला हा पदार्थ टाइमपास म्हणून कधीही खाता येतो. या कारणांमुळे लोकांनी चित्रपट पाहताना पॉपकॉर्न खाण्यावर भर दिला. पॉपकॉर्नची वाढती लोकप्रियता पाहून चित्रपटगृहांच्या मालकांनी त्याचे स्टॉल्स सुरु केले. यातून त्यांना अधिक पैसे मिळू लागले. यामुळेही पॉपकॉर्न खाण्याचा ट्रेंड सुरु झाला असे काहीजण म्हणतात. आजकाल पॉपकॉर्नचे दर हे चित्रपटाच्या तिकीटापेक्षा जास्त असल्याचे पाहायला मिळते. तेव्हा चित्रपटगृहाचे मालक नक्कीच पॉपकॉर्नमार्फत चांगली कमाई करत असावेत असे आपण म्हणू शकतो.

आणखी वाचा – नेत्रहीन व्यक्ती नेहमी काळा चष्मा का वापरतात? जाणून घ्या यामागील कारणे…

१९४० च्या दशकात दुसऱ्या महायुद्धामुळे आतंरराष्ट्रीय पातळीवर साखरेचे दर वाढले होते. तेव्हा पाश्चिमात्य लोक कॅन्डी खात असतं. कॅन्डीमध्ये साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे. साखरेची किंमत वाढल्याने कॅन्डीचा पर्याय म्हणून लोक पॉपकॉर्नकडे वळले. त्यावेळी हा पदार्थ कॅन्डीच्या तुलनेमध्ये स्वस्त होता. जास्त काळासाठी पॉपकॉर्न टिकून राहायचे. टाइमपास म्हणूनही हा पर्याय उत्तम असल्याने पॉपकॉर्नच्या उत्पादनामध्ये वाढ होत गेली.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why people eat popcorn while watching movies know real reason yps
First published on: 21-05-2023 at 18:49 IST