कॉमेडी एक्स्प्रेस मालिकेत स्टॅण्डअप कॉमेडी करण्यापूर्वी टीव्हीवर मी अनेक गंभीर प्रकृतीच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. मी विनोदी भूमिकाही साकारू शकतो हे दिग्दर्शकांना जाणवल्यानंतर स्टॅण्डअप कॉमेडी किंवा अन्य विनोदी व्यक्तिरेखांसाठी माझा विचार व्हायला लागला. स्टॅण्डअप कॉमेडीव्यतिरिक्त अन्य प्रकारच्या भूमिकाही मी आगामी वर्षांत खूप करणार आहे हे नक्की. प्रेक्षकांशी ‘कनेक्ट’ राहण्याचा स्टॅण्डअप कॉमेडी हा उत्तम प्रकार आहे असे मला वाटते. अभिनयाची आवड जोपासतानाच कारची आणि त्यातही मोठय़ा आकाराच्या एसयूव्ही कारची आवडही मी जपतो. सध्या माझ्याकडे झायलो ही आठ आसनी गाडी आहे. परंतु, एवढय़ा मोठय़ा गाडीतून स्वत:च ड्राइव्ह करीत दररोज प्रवास करायला कसे तरीच वाटायला लागले. म्हणून दिवाळीतच मी होंडाची अमेझ ही छोटी सेडान कार घेतली आहे. पांढऱ्या रंगाची ही गाडी चालवणे सोपेही आहे आणि पार्किंगचा प्रश्न आणि ट्रॅफिक जॅममधून वाट काढणे, असे दोन्ही प्रश्न सुटतात, हा या गाडीचा फायदा आहे. हल्ली गाडय़ांचे वेगवेगळे प्रकार आणि वैविध्य मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध झाल्यामुळे दर तीन वर्षांनी मी गाडी बदलतो. कारण नवनवीन गाडय़ा वापरून पाहणे मला खूप आवडते. माझी ‘अल्टिमेट ड्रीम कार’ ही ऑडी क्यू थ्री आहे. परंतु, त्यापूर्वी मी पुढील वर्षी महिंद्राची एक्सयूव्ही ५०० किंवा टोयोटाची फॉच्र्युनर ही गाडी घेणार आहे. माझ्या व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा गाडय़ा एसयूव्हीमधल्याच आहेत, म्हणूनही मला एसयूव्हीची आवड आहे असे म्हणता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्टॅण्डअप कॉमेडी करीत लोकप्रियता मिळाली असली तरी अभिजीत चव्हाण हे गंभीर भूमिकाही सफाईदारपणे साकारतात. आगामी ‘राजवाडा’, ‘बंध नायलॉनचे’ अशा मराठी चित्रपटांमध्ये ते झळकणार असले तरी जॉन अब्राहम आणि निशिकांत कामतसोबत त्यांनी ‘रॉकी हॅण्डसम’ हा हिंदी सिनेमा अलीकडेच पूर्ण केला असून मोठी भूमिका त्यांना मिळाली आहे.

मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Audi q3
First published on: 01-01-2015 at 01:01 IST