मी कॉलेजमध्ये असतानाच गाडी चालवायला शिकले, पण नंतर बऱ्याच वर्षांनी प्रत्यक्ष गाडी रस्त्यावर आणली आणि त्यानंतर मी गाडी कधीच सोडली नाही. मला गाडी चालवताना आलेला एक अविस्मरणीय प्रसंग इथे तुमच्याबरोबर शेअर करत आहे. ही गोष्ट आहे २००७ सालची. आम्ही त्या वेळी अमेरिकेमध्ये रिचमंड (व्हर्जििनया) येथे राहात होतो. माझ्या मुलाला एका बुद्धिबळ स्पध्रेसाठी एका ठिकाणी जायचं होतं. ते ठिकाण आमच्यापासून २ तासांच्या अंतरावर होतं. यापूर्वी मी एकटी गाडी घेऊन कधीच इतक्या लांब गेले नव्हते, पण माझ्या मिस्टरांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी धाडस करायचं ठरवलं. त्याप्रमाणे मी आणि माझी एक मत्रीण आमची गाडी घेऊन जायचं ठरलं. अमेरिकेमध्ये आपल्याला जिथे जायचे आहे त्या ठिकाणापर्यंतचा नकाशा बरोबर घ्यावा लागतो.
आम्ही सकाळी ८ वाजता निघून १० वाजेपर्यंत स्पध्रेच्या ठिकाणी पोहोचलो. स्पर्धा २ दिवस असल्याने आम्हाला तिथे जवळच एका हॉटेलमध्ये राहायचे होते. संध्याकाळी स्पर्धा संपल्यावर आम्ही निघालो. हॉटेलवर जाण्यासाठी दोन रस्ते होते. आम्ही हायवेवरून जायचं ठरवलं. हायवेवरून ज्या एक्झिटला बाहेर पडायचे होते आमचा तो एक्झिट रस्ता चुकला आणि आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यावर लगेचच आपला एक्झिट रस्ता चुकल्याचे माझ्या लक्षात आले आणि मी लगेचच पुढच्या एक्झिटला वळाले. आत गेल्यानंतर तिथले मोठमोठे रस्ते बघून मला थोडं टेन्शन आलं. मी तशीच पुढे जात राहिले आणि तो रस्ता आम्हाला एअरपोर्टवर घेऊन गेला. कसे तरी करून आम्ही तेथून बाहेर पडलो.  तोपर्यंत बाहेर अंधार पडला होता. आम्ही तसेच पुढे जात रहिलो आणि एके ठिकाणी जाऊन थांबलो. पुढे रस्ताच नव्हता. आजूबाजूला एकही गाडी दिसेना. आता मात्र आम्ही घाबरून गेलो. बहुतेक ते एका म्युझियमचं मागचं गेट असावं. तेवढय़ात तिकडून एका गाडी बाहेर आली. क्षणाचाही विलंब न करता मी त्या गाडीच्या मागे आमची गाडी घेतली आणि तेथून बाहेर पडलो. मत्रिणीला समोरच्या दुकानात पाठवलं आणि आपण जिथे आहोत तिथला पत्ता लिहून आणायला सांगितलं. तोपर्यंत मी माझे पती, दीपक, यांना फोन लावला आणि परिस्थिती सांगितली. एवढय़ात मत्रिणीने पत्ता आणला होता. मी तो दीपकना सांगितला. मी तुम्हाला व्यवस्थित हॉटेलवर पोहोचण्याचा रस्ता सांगतो, असं ते म्हणाले. मग त्यांनी इंटरनेटवरती पत्ता शोधला. मग तिथून पुढचा रस्ता आम्हाला फोनवरून सांगितला. शेवटी एकदा हॉटेलवर पोहोचलो आणि सगळ्यांचा जीव भांडय़ात पडला. मुलं तर पार कंटाळून गेली होती. या प्रसंगातून मी बरंच काही शिकले आणि पुन्हा कधी एकटी जाण्याची वेळ आली तर मी परत धाडस करेन, असं मनाशी ठरवलं.   
अश्विनी मादनाईक, कोल्हापूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रेय पत्नीचे
माझी ‘कारकीर्द’ सुरू झाली ती माझ्या विवाहानंतर. एका अर्थाने माझ्या ‘कारकीर्दी’चे पूर्ण श्रेय जाते ते माझ्या पत्नीला. सुनीता तिचे नाव. दुर्दैवाने ती आता हयात नाही. तरी आजही जेव्हा मी सराईतपणे, आत्मविश्वासने कोणत्याही रस्त्यावर कार किंवा स्कूटर चालवीत असतो तेव्हा माझ्या मनात तिच्या प्रति कृतज्ञता असते. १९८८ साली जेव्हा आमचा विवाह होऊन ती आमच्या घरात आली तेव्हा आमची अगदी पारंपरिक मध्यमवर्गीय मानसिकता होती. तेव्हा आमच्या घरी कोणतेही वाहन तर नव्हतेच, पण कोणतेही वाहन आपण खरेदी करावे किंवा ते चालवावे असा विचारही नव्हता.
     तरी तिच्या आग्रहाखातर म्हणा किंवा मलाही पटले म्हणून, मला माझ्या मेव्हण्याने त्याच्या लँब्रेटा स्कूटरवर शिकवायला सुरवात केली. मी रात्री १० नंतर गिरगावच्या गल्ल्यांमधून फिरत आधी स्कूटर शिकलो आणि नंतर लवकरच ड्रायिव्हग स्कूलमध्ये जाऊन कारही शिकलो. सासऱ्यांकडे एक जुनी दणकट ‘हिलमन’ गाडी होती. ती मी दुरुस्त करून घेतली व मुंबईच्या रस्त्यांवर चालवू लागलो. लोक कुतूहलाने त्या अँटिक गाडीकडे पाहायचे; परंतु ती वारंवार बंद पडू लागल्याने ती सासऱ्यांना परत दिली व मामाकडे एक २५ वर्षांची जुनी फियाट होती ती खरेदी केली. त्या गाडीने लांबचा प्रवास व घाटाचा अनुभव घ्यावा म्हणून शिकल्यानंतर ४-६ महिन्यांतच ती फियाट घेऊन मी, पत्नी व माझी ८-९ वर्षांची मुलगी असे तिघेच तळेगावला निघालो. तेव्हा हल्लीचा एक्सप्रेसवे तयार झालेला नव्हता. जुन्या खोपोलीमाग्रे खंडाळा घाटातून निघालो. तो जीवघेणा िशग्रोबा देवळाचा चढ आला. मनोमन धास्तावलो होतो आणि नेमका त्याच जागी कारखालून फट्फट असा आवाज येऊ लागला. काय झाले ते कळेना. तरी तशीच हळूहळू गाडी दामटवत पुढच्या हनुमान मंदिरापर्यंत नेली. तोपर्यंत स्कूटरवरून फिरणारे मोटर मेकॅनिक माझ्या भोवती घुटमळू लागले होतेच. त्यांनाही तो फट्फट आवाज ऐकू येत होताच.
शेवटी त्यातील एकालाच जवळ बोलावले. आता हा आपल्याला खरेखोटे सांगून लुबाडणार याची तयारी ठेवूनच त्याला काम करायला दिले.  त्याने मग खोपोलीत जाऊन कोणतासा पार्ट आणला. तो बसवला, त्यात आमचे तीन तास वाया गेले. घरी वांद्रय़ात सारे काळजीत पडले होते. आम्ही तळेगावात पोहोचल्यावर पीसीओवरून घरी फोन केला व उशीर का झाला ते कळवले. हा सर्व प्रकार हनुमान मंदिराजवळच घडला. नंतर आता प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा त्या मंदिराजवळून जातो तेव्हा ती आठवण जागी होते. मी स्वभावाने भाविक नाही, परंतु तरीही माझी नजर त्या मारुतीरायाकडे वळतेच. आता शेजारी पत्नी काही नसते, पण मुलगी असते. ती व मी मूकपणे एकमेकांकडे पाहतो, जणू काही आम्हा दोघांनाही काय म्हणायचे आहे ते कळलेले असते. म्हणेपर्यंत कार पुढे गेलेली असते.
– सुनील खानोलकर,
वांद्रे- पूर्व, मुंबई</p>

माझी कारकीर्द  : ड्रायिव्हिंग शिकणं हा एक भन्नाट अनुभव असतो. तुमचा ड्रायिव्हग शिकण्याचा अनुभव कसा होता, शिकल्यानंतर तुम्ही लाँग ड्राइव्हला कुठे गेलात, थोडक्यात तुमची ‘कार’कीर्द कशी घडली, याची माहिती तुम्ही ‘लोकसत्ता’कडे शेअर करायची.  मेल करा.
ls.driveit@gmail.com

मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car driving lesson experiences
First published on: 01-05-2015 at 02:32 IST