फोक्सवॅगन पोलो, फियाट पुंक्तो या गाडय़ांना भारतीय बाजारपेठेत खूपच प्रसिद्धी मिळाली. या प्रसिद्धीच्या जोरावरच या कंपन्यांनी आपल्या या हॅचबॅक गाडय़ांचा लुकबदलून त्यांना थोडासा एसयूव्हीसारखा रफ लुक देण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न यशस्वीही झाला. याचाच कित्ता आता टोयोटा गिरवणार आहे. मात्र त्यांनी आपल्या सध्याच्या हॅचबॅक गाडीला नवा लुकदेण्याऐवजी हॅचबॅक व एसयूव्ही या दोन सेगमेण्ट्मधील इटियॉस क्रॉस ही गाडी मार्केटमध्ये आणली आहे.
आजकाल हॅचबॅक आणि एसयूव्ही या दोन प्रकारांमधील एखादा प्रकार मिळतोय का, याकडे भारतीय ऑटोमोबाइल मार्केटमधील अनेकांचं लक्ष लागलं असतं. फोर्ड, फोक्सवॅगन, फियाट अशा कंपन्यांनी आपल्या हॅचबॅक गाडय़ांमध्ये सुधारणा करून त्यांना थोडासा एसयूव्हीसारखा लुक देऊन मार्केटमध्ये आणलं आणि भारतीय ऑटोमोबाइल प्रेमींची त्यांवर उडी पडली. आता टोयोटा कंपनीनेही या दोन सेगमेण्ट्समधील एक गाडी बाजारात आणली आहे. गाडीचं नावही ‘टोयोटा इटियॉस क्रॉस’ असंच ‘क्रॉस’ आहे..
इंजिन आणि ट्रान्समिशन
टोयोटा इटियॉस क्रॉस ही गाडी तीन इंजिन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहेत. १.४ लिटर डिझेल, १.२ लिटर पेट्रोल आणि १.५ लिटर पेट्रोल! १.४ लिटर डिझेल इंजिन ६७ बीएचपी एवढी शक्ती निर्माण करतं. तर १.२ लिटर व १.५ लिटर पेट्रोल इंजिन अनुक्रमे ७९ व ८९ बीएचपी एवढी शक्ती निर्माण करतं. हीच इंजिन्स टोयोटाच्या इतरही काही गाडय़ांमध्ये आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स उत्तम आहे. डिझेल इंजिनची गाडी सुरू होताना थोडासा त्रास होतो. मात्र एकदा गाडी सुरू झाली आणि रस्त्याला लागली की, मग या गाडीसारखी राइड नाही. शहरातील वाहतूक कोंडीत किंवा महामार्गावर ही गाडी चालवताना अत्यंत सुखद अनुभव आहे. डिझेल इंजिन शहरात १५ किलोमीटर प्रतिलिटर अॅव्हरेज देतं. तर हायवेवर गाडी एका लिटरमध्ये १८-२० किलोमीटपर्यंत चालते.
इंटीरियर्स
कोणताही कारवेडा गाडी घेताना गाडीच्या बाह्य़रूपाबरोबरच इंटीरियर्सवरही खूप लक्ष देतो. मात्र टोयोटा क्रॉसचे इंटीरिअर इटियॉस किंवा इटियॉस लिव्हा या दोन गाडय़ांच्या इंटीरिअर्सपेक्षा फार वेगळे नाही. मात्र वेगळी गोष्ट म्हणजे या गाडीचा डॅशबोर्ड पियानो ब्लॅक रंगात असल्यामुळे तो खूपच वेगळा आणि आकर्षक वाटतो. गाडीत सेंट्रल इन्स्ट्रमेण्ट क्लस्टर, इन बिल्ट म्युझिक सिस्टिम, राऊंड एसी व्हेण्ट्स आणि मल्टिफंक्शनल स्टिअिरग व्हिल्स सुविधा आहे. मात्र पूर्वीच्या दोन गाडय़ांच्या तुलनेत यात बराच फरक पडला आहे. या गाडीतील आसनव्यवस्था लिव्हासारखीच आहे. त्यामुळे मागे तीन जण आरामात बसू शकतात. तसेच गाडीची बूटस्पेसही उत्तम आहे.
लुक
या गाडीचा लुक टोयोटाने खूपच वेगळा ठेवला आहे. इटियॉस लिव्हा या गाडीच्या धर्तीवर टोयोटाने या गाडीची बांधणी केली आहे. मात्र या सेडान गाडीच्या टायर्सपेक्षा नव्या गाडीचे टायर्स १५ इंच मोठे आहेत. तसेच पुढील व्हील्सना डायमण्ड कट्स आहेत.
गाडीचा पुढला भाग हा अत्यंत दणकट वाटतो. त्यामुळे या गाडीला एक एसयूव्ही लुक येण्यास मदत झाली आहे. या गाडीचे बम्पर काळ्या रंगात असल्याने गाडीचं बॉनेट आणि बम्पर यांचा रंग वेगवेगळा दिसतो आणि तो आकर्षक वाटतो. तसेच गाडीच्या टपावर दोन काळ्या पट्टय़ा असल्यानेही गाडीच्या लुकमध्ये खूपच फरक पडतो. गाडीच्या पुढल्या भागात थोडेसे अॅल्यमुमिनियम फिनिशिंग दिल्यानेही गाडी अधिक मॅनली वाटते.