‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’मधून विजेता म्हणून पदार्पण केल्यानंतर ‘फू बाई फू’ या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोचा सूत्रसंचालक आणि स्वत: उत्तम अभिनेता असलेला आणि मूळचा आयुर्वेदाचार्य असलेला नीलेश साबळे आता ‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठी वाहिनीवरील नवीन रिअ‍ॅलिटी शोद्वारे लेखक- संकल्पना- दिग्दर्शक आणि सूत्रधार अशा चौफेर भूमिकेद्वारे प्रेक्षकांसमोर आला आहे.

सासवडचा असल्याने सासवड ते स्वारगेट असा प्रवास करायचा. मग स्वारगेटला येऊन मग मुंबईला जाणारी बस पकडायची हा नित्यक्रम होता. सुरुवातीला बिनधास्त प्रवास करायचो. परंतु, जसजशी फू बाई फूची र्पव वाढत गेली आणि लोकप्रियता वाढत गेली तसतशी स्वारगेटच्या बस स्टॅण्डवर पोहोचलो की गर्दी गोळा व्हायची. मग प्रत्येकालाच माझ्यासोबत फोटो काढायचा असायचा. एकदा तर गर्दी एवढी वाढली की एक फोन आला असे निमित्त करून मी चक्क स्वारगेटहून सासवडला रिक्षाने गेलो. सासवडवरून एसटी पकडली की कंडक्टरलाच लोक तिकिटावर माझी सही आणायला सांगायचे. मग एवढा मोठा कार्यक्रम सादर करतो तर तुला पैसे मिळत नाहीत का, पैसे नाहीत म्हणून तुला एसटीने जावे लागते का, वगैरे प्रश्नांची सरबत्ती लोक करू लागले. त्या वेळी माझ्या मनात गाडी घेण्याचे नव्हते. पण बाबा म्हणाले आता गाडी घेणे तुझ्यासाठी अपरिहार्य झाले आहे. त्या काळात मुंबईत मालाडला राहायचो. दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांच्यासोबत काम करत होतो. त्यामुळे तेच नेहमी मला घरी सोडायचे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी शूटिंगला घेऊनही जायचे. त्यांची महिंद्रा लोगान होती. पूर्ण काळ्या रंगाची ती गाडी मला खूप ‘लकी’ आहे असे ते म्हणायचे. त्या गाडीचे अनेक फायदे, ऐसपैस जागा, गाडी चालविण्याचा आनंद याबद्दल ते नेहमी सांगायचे. म्हणून मी दोन वर्षांपूर्वी गणपतीतच महिंद्रा व्हेरीटो म्हणजेच पूर्वीची लोगान ही चंदेरी रंगाची गाडी घेतली. त्यांच्या सांगण्यावरून गाडी घेतली म्हणून आनंदजींना फोन करून सांगितले. तेव्हा ते म्हणाले तू गाडी घेतलीस खरी पण माझी लोगान आता मी घरी ठेवून छोटी गाडी घेतोय. त्यानुसार त्यांनी छोटी गाडी घेतलीसुद्धा. आणि त्याच गाडीचा नंतर दोन महिन्यांनी अपघात होऊन आनंदजी गेले.. जी गाडी ते नेहमी लकी आहे म्हणायचे.. पण नेमके त्यांचा अपघात झाला तेव्हा त्या लकी गाडीतून ते प्रवास करीत नव्हते. कदाचित ती लकी गाडी असती तर त्यांचा अपघात झालाही नसता असे मनात आले. ही लोगान गाडी- आनंद अभ्यंकर अशा दर्दभऱ्या आठवणींनी मनात काहूर केले.. त्या अर्थाने महिंद्रा व्हेरीटो ही माझ्यासाठी स्पेशल गाडी ठरली आहे. ड्रीम कारचे विचाराल तर शक्य होईल तेव्हा बीएमडब्ल्यू घ्यायला मला नक्की आवडेल. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Dream car of nilesh sable
First published on: 04-09-2014 at 08:10 IST