तुम्ही फक्त एवढंच करायचं..
तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून दर गुरुवारी ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..! शब्दमर्यादा : २०० शब्द. ई-पत्ता :  vinay.upasani @expressindia.com
बाइकवरून युरोप टूर
मला लहानपणापासूनच सायकिलग, ट्रेकिंगची आवड होती. शाळेत असताना घरी कोणालाही न सांगता मी सायकलवरून दूरदूरच्या ठिकाणी फिरून यायचो. सांगली आणि कोल्हापूर तर माझ्यासाठी घर-अंगणासारखे झाले होते. सायकलवरून या मार्गावर कितीतरी चकरा मारल्या असतील. गड-किल्ल्यांचीही भ्रमंती करून आलो. महाविद्यालयीन आयुष्यात मला ५० आणि ८० सीसीच्या मोपेड चालवायची संधी मिळाली. त्यानंतर जावा आणि बुलेटही हाती आल्या. मग माझी भ्रमंतीची रेंजही हळूहळू वाढू लागली. पदवीनंतर मी नोकरीनिमित्त सांगलीहून मुंबईला स्थलांतरित झालो. नोकरी, नंतर लग्न, करिअर, संसार या धबडग्यात मग माझं बाइकचं पॅशन थोडं थांबलं. मात्र, वयाच्या ५५व्या वर्षी बाइकवेड पुन्हा उफाळलं. देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो. लेह-लडाख तर दोनदा फिरून आलो बाइकवरून. मग गेल्या १५ वर्षांपासून उरी बाळगलेलं युरोप टूरचं स्वप्न मला खुणावू लागलं. २००८-०९ पासून मग मी युरोप टूरची आखणी करायला सुरुवात केली. नेटवरून, माहितीपुस्तकांवरून, नकाशांवरून, युरोपातील सर्व देशांच्या माहितीपटांमधून, थोडक्यात मिळेल त्या माध्यमातून मी युरोपातील सर्व रस्त्यांची माहिती करून घेतली. व्हिसा, रोड परमिट, आंतरराष्ट्रीय ड्रायिव्हग लायसन्स वगरे सर्व सोपस्कार पूर्ण करायला एप्रिल, २०१२ उजाडले. आणि १७ एप्रिल २०१२ रोजी मी माझ्या १०० दिवसांच्या युरोप टूरला जाण्यासाठी अंकाराकडे (तुर्कस्तानची राजधानी) झेपावणाऱ्या विमानात बसलो. त्याआधीच माझी बाइक मी तिकडे पाठवली होती. अंकारातील प्रेक्षणीय स्थळांना भेट दिल्यानंतर मी इस्तंबूलकडे (युरोपचे प्रवेशद्वार) वळलो युरोपातील वाहतूकव्यवस्था आपल्याकडच्या व्यवस्थेपेक्षा अगदी उलट आहे. म्हणजे आपण डावीकडून वाहने चालवतो तर तिकडे उजवीकडून वाहने चालवली जातात. १०० दिवसांच्या प्रवासात मी १६ युरोपीय देशांना भेट दिली. बल्गेरियातील लोकांना होय म्हणायचे असेल तर ते त्यांची मान हलवतात, सर्बयिा आणि फ्रान्समधील थंडीच्या तडाख्याने माझी हाडे गोठली. मात्र, तेथील अनेक सुहृदांनी माझ्या प्रवासाला मनापासून साथ दिली. बुडापेस्ट आणि पॅरिसमधील नाइटलाइफ तर प्रत्येकाने अनुभवायलाच हवी अशी होती. जर्मनीत मी बíलन आणि आसपासच्या गावांना भेटी दिल्या.
एका बाजूला खळाळती नदी, मध्ये रस्ता आणि बाजूला उंच उंच डोंगर असे ते भारावून टाकणारे वातावरण होते. डॅन्यूब नदीवरची ती रम्य संध्याकाळ, आल्प्स पर्वतराजींमधील ती नयनरम्य दृष्ये सर्व सर्व मी डोळ्यांत आणि कॅमेरात साठवत होतो. आल्प्स पर्वतांतील १७ किमीचा बोगदा तर अविस्मरणीयच. जीनिव्हा, झुरिच ही तलावांची शहरे तर अप्रतिमच. रोमन आणि ग्रीक शहरे तर त्यांच्या इतिहासाची साक्ष देतात. व्हॅटिकन सिटीतही एक दिवस मुक्काम केला. व्हेनिसमध्ये बोटीतून फिरलो. एकूणच १०० दिवसांचा प्रवास इतक्या लवकर संपला की कल्पनाही केली नव्हती.