मोटार चालविण्यात बराच वेळ गेल्यानंतर पाठीला रग लागणे, पाठीचे स्नायू दुखून येणे किंवा हात आखडल्यासारखे वाटणे, मणक्यावर ताण येणे असे काही ना काही त्रास सुरू होतात. त्यासाठी काही जण लांब पल्ल्याच्या प्रवासात मोटार बाजूला लावून काही वेळ पाय मोकळे करतात, थोडक्यात एखाद्या विशिष्ट पद्धतीत बराच वेळ बसून राहिल्याने होणारा त्रास अंगावर काढू नये. काही वेळ तरी त्या प्रकारच्या बसण्यामुळे स्नायू, हाडे यांच्यावर एक प्रकारचा ताण आलेला असतो, रक्तप्रवाहावरही परिणाम होत असतो. यामुळे एकाच कोनामध्ये बसण्याने, हात ठेवल्याने केवळ मणका, पाठ यावरच नव्हे तर मान, डोळे यावरही ताण येत असतो. अशा प्रकारच्या कामामुळे ताण कमी करून स्नायूला मसाज केल्यास अधिक बरे वाटते. शरीर ताणल्यास, स्ट्रेच केल्यासही आखडलेले स्नायू सुखावतात. मोटारीतच नव्हे तर घरात, कार्यालयातही बसून बसून होणारा त्रास कमी करण्यासाठी शरीराला आराम मिळावा म्हणून ओ-सिम इंडियाने यू-रिलॅक्स हे पाठीला मसाज करणारे कुशन बाजारात आणले आहे.
मोटारीतील डीसी विद्युतपुरवठा असो किंवा घरातील एसी विद्युतपुरवठा असो, दोन्ही ठिकाणी त्या कुशनद्वारे, खुर्चीतच, बसल्या बसल्या मसाज करून तुमच्या पाठीला आराम देणारी ही यंत्रणा आहे. मोटारीत चालकाला वा मागे बसणाऱ्या प्रवाशांनाही ती वापरता येईल, अशी मोटारीतील आसनाला संलग्न करता येणारी ही कुशन यंत्रणा पाठीला व मांडीच्या भागाला उपयुक्त आहे.
मोटारीतील आसनावर मागील बाजूने पाठीला मसाज खूप कडकपणे होतो. सातत्याने एकाच पद्धतीने बसल्याने व अनेक काळ बसल्याने येणाऱ्या ताणामुळे स्नायू दुखत असतात. त्यामुळे थकवा जाणवू लागतो, अंग दुखू लागते. यासाठी स्नायूंना मोकळे करणाऱ्या पद्धतीचा वापर या कुशनमधील मसाजमध्ये केलेला आहे. मणक्याच्या दोन्ही बाजूने अंगठा वरपासून खालपर्यंत फिरवून मिळणारा आराम व उपचार यामध्ये केला जातो. कुशनमधील चार गोळ्यांसारखी यंत्रणा मणक्याच्या दोन्ही बाजूने वरपासून खालपर्यंत सरकते. त्या वेळी तुम्ही त्यावर नेहमीच्या सर्वसाधारण शारीरिक वजनाचा भार टाकू शकता किंवा तुम्हाला आवश्यक तितका जोर कुशनवर टाकू शकता. त्यामुळे तुम्हाला आवश्यक तितका दाब त्या मणक्याच्या बाजूला असलेल्या स्नायूंवर येतो.  मांडय़ांना आसनावर असलेल्या व्हायब्रेटरमुळे आराम मिळतो, तसेच गरम शेकही यातून मिळण्याची सोय केलेली आहे. मोटारीप्रमाणे घरात वा कार्यालयातही या कुशनचा वापर करता येतो.
एसी विद्युतपुरवठय़ावर कुशन जोडताना त्याला देण्यात आलेली थ्री पीन ही भारतीय सर्वसाधारण विद्युत सॉकेटमध्ये बसणारी नाही. त्यामुळे वेगळा स्वतंत्र अ‍ॅडॉप्टर त्या पीनला जोडावा लागतो किंवा संगणकासाठी स्पाइक गार्डला असणारी सॉकेटमध्ये मात्र ही पीन बसू शकते.
मोटार चालविताना मात्र हे कुशन वापरणे काहीसे अडचणीचे वा अयोग्य ठरू शकते, कारण कुशनमधून होणाऱ्या मसाजवर मोटार चालविणाऱ्याचे लक्ष वेधले जाऊ शकते. यामुळे होणारा मसाज हा काहीसा कडक असल्याने त्यामुळे मोटार चालविताना मात्र तो वापरणे धोक्याचे ठरू शकते. मात्र मोटारचालकाव्यतिरिक्त व्यक्तीला मोटार चालू असताना तो वापरण्यास हरकत नाही. मोटारचालकाने वाहनचालन थांबवून मगच त्याचा वापर करावा. सुमारे १५ मिनिटांचे सेटिंग कंपनीने दिलेले आहे. तेवढा वेध जरी चालकाने लांब पल्ल्याच्या वेळी या मसाज कुशनचा वापर केला तरी त्याला ताजेतवाने वाटू शकेल. रक्तप्रवाहावरही याचा चांगला परिणाम होतो.