२००८ मधील नवी दिल्लीतील वाहन प्रदर्शन हे टाटा मोटर्सच्या लाखाच्या (म्हणजे लाख रुपयांच्या) नॅनोने भारलेले होते; तर यंदाच्या प्रदर्शनावर विशेषत: कॉम्पॅक श्रेणीतील वाहनांचा पगडा जाणवत होता. वाहनप्रेमींच्या स्पोर्ट युटिलिटीचा (एसयूव्ही) फिल देणारी मात्र छोटी (हॅचबॅक/पॅसेंजर) कार अशी ‘कॉम्बो ऑफर’ या निमित्ताने दिसली; तर ‘क्रॉसओव्हर’चा नवा साजही यंदा पाहायला मिळाला. एकूणच यंदाचा ‘ऑटो एक्स्पो’ने नव्या ठिकाणाचा, नव्या वाहन प्रकाराचा नवा अवतारच धारण केला होता.
१ मारुती सुझुकी – सेलेरिओ (वाहन प्रकार – हॅचबॅक, किंमत – ३.९ ते ४.९६ लाख रुपये)
क्षणाक्षणाला येणाऱ्या ट्रॅफिकमध्ये गीअर बदलण्याचा त्रास नको म्हणून ‘ऑटो गीअर शिफ्ट’ची सुविधा देणारी मारुतीची सेलेरिओ माफक किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
रुदाई – सॅन्टे फे (वाहन प्रकार – एसयूव्ही, किंमत – २६.३ ते २९.२ लाख रुपये)
कोरियन कंपनी तशी या वाहन श्रेणी प्रकारात आहे. मात्र नव्या वाहनासह ती फॉच्र्युनर, एन्डेव्हर, एक्सयूव्ही५०० ना टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे.
ळ टाटा मोटर्स – नेक्सॉन (वाहन प्रकार – कॉम्पॅक्ट एसयूव्ही, किंमत – अद्याप जाहीर नाही)
वाढत्या स्पर्धेमुळे या नव्या वाहन प्रकारात अखेर टाटालाही उतरावे लागले. कंपनीने विकसित केलेले नवे इंजिन यात बसविण्यात आले आहे.
व टोयोटा – न्यू इटिऑस क्रोस (वाहन प्रकार – क्रोसओव्हर, किंमत – ४.२३ ते ७.१२ लाख अधिक)
जपानच्या टोयोटाने हा नवा वाहनप्रकार विकसित करून पुढील स्पर्धा या क्षेत्रात असेल, असे सिद्ध केले. प्रवासी कारमध्ये फारसा प्रतिसाद न मिळालेल्या या कंपनीने अन्य श्रेणीवर भर देण्याचे ठरविलेले दिसते.
मर्सिडिज बेन्झ – सीएलए४५एएमजी (वाहन प्रकार -स्पोर्ट सेदान, किंमत – अद्याप किंमत जाहीर केलेली नाही.) भारतात तीन जर्मन कंपन्यांची लक्झरी कार श्रेणीत क्रमांक एकचे पद राखण्याची स्पर्धा तीव्र आहे. त्यातील एक स्पर्धक मर्सिडिज बेन्झने यंदाच्या प्रदर्शनात पारंपरिक वाहन श्रेणी बाजूला ठेवत एसयूव्ही व कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारात आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
डीएसके ह्योसंग – अकिला २५०
प्रीमियम, सुपरबाइकची निर्मिती करण्यात आघाडीवर असणाऱ्या महाराष्ट्रातील या कंपनीने आता किमान इंजिन क्षमतेच्या वाहन प्रकारातही पाऊल ठेवले आहे. अकिला २५० ही त्यातील एकच तुकडी आहे. कंपनी यापेक्षाही कमी १२५ सीसी इंजिन क्षमतेच्या बाइकही तयार करणार आहे. त्या कदाचित ७० हजार रुपयांपर्यंत असतील. यासाठी कंपनी पश्चिम महाराष्ट्रात आणखी एक प्रकल्प साकारण्याच्याही अंतिम टप्प्यात आहे.
गेले आठवडाभर सुरू असलेला वाहनमेळा अखेर संपला. नव्या वाहनांपेक्षा मेळाव्याचे नवे ठिकाण हेच यंदाचे प्रमुख आकर्षण ठरले. एरवी नित्यनेमाने दोन वर्षांतून एकदा येणाऱ्या प्रत्येक प्रदर्शनाला नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावर हजेरी लावणाऱ्यांना तर हे ठिकाण नवखे नसले तरी त्याचे प्रदर्शन रूप डोळ्यात साठविण्यासाठीची उत्सुकता कायम होती. नवी दिल्लीबाहेर ग्रेटन नोएडामध्ये प्रथमच होणाऱ्या या वाहन प्रदर्शनाला यंदा जागाही मोकळी मिळाली.
नवी दिल्ली परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एनसीआरच्या टप्प्यातील रहिवाशांना तसा दिल्ली एक्स्प्रेसचा प्रवाश नवा नाही. मात्र खास वाहनमेळ्यासाठी येणाऱ्यांना या सहा पदरी मार्गावरील थरार प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. वाहन क्षेत्राशी संबंधितांना हा परिसर तसा मारुती सुझुकी आदी निवडक कंपन्यांमुळे तसा नवा नाही. यंदा १२ व्या प्रदर्शनाच्या निमित्ताने ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स’च्या (सिआम) या प्रदर्शनाला मागील वर्षांपेक्षा कमी भेटकर्ते लाभले.
मंगळवारी वाहन मेळावा संपुष्टात येत असतानाच या उद्योगाचे जानेवारीतील एकूण विक्री आकडे स्पष्ट झाले. (त्याच्या आदल्या दिवशीच जग्वार लॅण्ड रोव्हरमुळे टाटा मोटर्सला बक्कळ नफा होत असल्याचे वित्तीय निष्कर्षही आले.) २०१२ मधील नवी दिल्ली प्रदर्शनाच्या वेळच्या ७ लाख जणांच्या तुलनेत यंदाच्या नोएडातील ५.६१ लाख अशा कमी उत्सुकांची जोड २०१४ च्या पहिल्याच महिन्यातील ७.५९ टक्के विक्री घसरणीला मिळाली. (२०१३ मध्ये या क्षेत्राने दशकातील पहिली घसरण नोंदविली आहेच; तेव्हा आता या उद्योगाला यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातून आर्थिक उभारीचा हात अपेक्षित आहे.) सलग चौथ्या महिन्यातील वाहन विक्रीतील घसरणीने प्रदर्शनाने मात्र आशेचे चित्र रंगविले. दिल्लीतील व्यवस्था पुढच्या वेळी (२०१६मध्ये) प्रदर्शनयोग्य झाल्यानंतर तेथे वाहनमेळ्याचे आयोजन करण्याचा विचार ‘सिआम’चे विद्यमान अध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांनी यापूर्वीच बोलून दाखविला आहे. यंदाच्या प्रदर्शनात सहभागी झालेल्या प्रत्येक वाहन कंपनीच्या प्रमुखानेही हा उद्योग विक्रीच्या घसरगुंडीतून लवकरच बाहेर येईल, हा दिलासाही दिला आहेच. अशा यंदाच्या प्रदर्शन व्यासपीठावर सादर झालेल्या नव्या वाहनांच्या जोरावर ते होतेय का हे फेब्रुवारीपासूनच्या काही महिन्यातील वाहन विक्रीच्या आकडेवारीवरून दिसेलच..
‘मॉडेल’ आणि मॉडेल
४३ वाहने धावण्यासाठी सज्ज
५ ते ११ असे आठवडाभर चाललेल्या या वाहन प्रदर्शनदरम्यान ५.६१ लाख उत्सुकांनी भेट दिली. ७० नवी वाहने यावेळी सादर झाली. पैकी २६ वाहने ही जागतिक स्तरावरील होती, तर प्रदर्शनात सादर करण्यात आलेली ४३ वाहने येत्या काही महिन्यांमध्ये भारतीय रस्त्यांवरून धावायला लागतील. त्यात अर्थातच सर्वाधिक, २५ या कार तसेच छोटी प्रवासी वाहने असतील.
प्रियांका चोप्रा – लॅण्ड रोव्हर
करिना कपूर – डीसी डिझाइन
समीरा रेड्डी – वर्देची मोटरसायकल
सचिन तेंडुलकर – बीएमडब्ल्यू
जॉन अब्राहम – यामाहा
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2014 रोजी प्रकाशित
ऑटो एक्स्पोचा नवा अवतार!
२००८ मधील नवी दिल्लीतील वाहन प्रदर्शन हे टाटा मोटर्सच्या लाखाच्या (म्हणजे लाख रुपयांच्या) नॅनोने भारलेले होते; तर यंदाच्या प्रदर्शनावर विशेषत: कॉम्पॅक श्रेणीतील वाहनांचा पगडा जाणवत होता.
First published on: 13-02-2014 at 12:56 IST
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New avatar of auto expo