रात्री व पहाटे गार तर दिवसभर तप्त वातावरण. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह इतर राज्यातही असे चित्र आहे. मध्यंतरी काही ठिकाणी गारा तर कुठे काहीसे शिंतोडेही पडून गेले.
वाहन क्षेत्राच्या बाबतही यात साम्य आहे. मात्र ते दर आणि सवलतींबाबत. मार्चअखेरच्या आर्थिक वर्षांत दशकातील नीचांकी वाहन विक्री नोंदविल्यानंतर नव्या वर्षांच्या सुरुवातीलाही सूट-सवलत, एक्स्चेन्जचा धमाका अनेक वाहन कंपन्यांनी कायम ठेवला आहे.
वाहन खरेदीसाठी एक मुहूर्त मानल्या जाणाऱ्या चालू महिन्यातील गुढीपाडव्याला फारसा प्रतिसाद न मिळणाऱ्या कंपन्यांनी आकर्षक (अर्थात स्वस्तासह महागही) किमतींचे दरपत्रक येत्या महिन्यात येऊ घातलेल्या अक्षय्यतृतीयेपर्यंत लांबविले आहे. २०१२-१३च्या अखेरच्या मार्च महिन्यासह या एकूणच आर्थिक वर्षांत वाहनांची विक्री फारशी वाढली नाही. जसजसे हे वर्ष सुरू झाले होते तसतसे या उद्योगाच्या दुहेरी वाढीचे आकडेही वाहन विक्री संख्येप्रमाणेच मार्चपर्यंत खाली खाली येऊ लागले. अगदी शून्य म्हणजेच वाहन उद्योगाची वाटचाल स्थिर असेल, अशी भीती उत्पादकांनी व्यक्त केली.
मार्चमध्येही ऑफरने वाहन उद्योगाला तारलेच नाही. तरीदेखील सूट-सवलतींचा धडाका यंदाही कायम ठेवण्यात आला आहे. हे सारे काही वाहन विक्रीची संख्या वाढीसाठीच आहे. मात्र त्याचबरोबर अनेक कंपन्यांनी वाहनांच्या किमतीही वाढवून टाकल्या आहेत. अर्थसंकल्पाचे कारण देत एप्रिलच्या सुरुवातीलाच अनेक कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढविण्यात येत असल्याचे जाहीर करून टाकले, तर पंधरवडय़ाच्या अंतराने वाढीव दरांची दुसरी फैरीही झाडण्यात आली. यावेळी सबब होती, ती आंतरराष्ट्रीय चलनातील फरकाची. आणि त्याला पुरवणी होती ती नेहमीप्रमाणे कच्च्या मालाच्या किमती वाढल्याची.
 स्वस्त अधिक महाग..
दुचाकी निर्मितीतील आघाडीच्या बजाज, होन्डाने प्रति वाहनामागे २०० ते ८०० रुपयांपर्यंत वाढ करून टाकली. दक्षिणेतील टीव्हीएसदेखील पाव ते अर्धा टक्का दरवाढ करत यात सहभागी झाली. डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे, मालभाडे वाढ याचा परिणाम वाहने उत्पादित करताना होतो, असे नमूद करून या कंपन्यांनी ही दरवाढ लागू केली आहे. पैकी काहींनी एप्रिलच्या सुरुवातीपासून तर काहींनी महिन्याच्या दुसऱ्याच आठवडय़ापासून नवे वाढीव दर अमलात आणले आहेत.
अन्य उद्योगांप्रमाणेच वाहन क्षेत्राचीही भिस्त आता थोडय़ा फार प्रमाणात रिझव्‍‌र्ह बँकेच्या संभाव्य व्याज दरकपातीवर आहेच. मध्यवर्ती बँकेने अर्धा अथवा त्यापेक्षा अधिक टक्क्यांची दर कपात केल्यास वाहनांच्या मागणीला बळ मिळेल, असा विश्वास वाहन उत्पादकांना आहे. दरम्यान चालकांना खरेदी अधिक सुलभ व्हावी यासाठी बँका, वित्तसंस्था यांनी कधी नव्हे, ते कर्जाचे व्याजदर थेट निम्म्यावर आणून ठेवले.
 ..महाग अधिक स्वस्त
आलिशान कार मात्र स्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. केवळ युरोपच नव्हे, तर जपान, दक्षिण कोरियात तयार केलेल्या व येथे उपलब्ध असलेल्या कार त्यामानाने कमी दरात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार अशा वाहनांवरील सीमाशुल्क कमी करण्याच्या तयारीत आहे. २२ लाख रुपयांवरील कारवर सध्या १०० टक्के सीमाशुल्क लागू आहे. यापेक्षा कमी किमतीतील वाहनांवर ६० टक्के आयात शुल्क आकारले जाते. (जर्मन बनावटीची बीएमडब्ल्यू मिनी ही छोटेखानी कार स्वस्त होण्याची शक्यता आहे. ही कार आता तर येथे, भारतातच तयार करण्याच्या हालचाली जोरात सुरू आहेत.) सरकारतर्फे याबाबत निर्णय झाल्यास सध्या उच्च मध्यमवर्गीयांच्या अग्रक्रमावर असलेल्या ऑडी, स्कोडा, बीएमडब्ल्यूच्या आलिशान कार स्वस्त होतील.
 नव्या वाहन प्रकाराला दराची जोड
पेट्रोलच्या तुलनेत डिझेलवर धावणारी वाहने स्वस्त असतात. गेल्या काही कालावधीत डिझेल वाहनांना असलेली चालकप्रेमींची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली. डिझेल वाहनांच्या वाढत्या पसंतीला अटकाव करण्यासाठी सरकारकडून कराच्या रूपात प्रयत्नही झाला. डिझेल वाहनांवर सरकारच्या अनुदानाचा हातही आहे म्हणा. तरीदेखील डिझेल वाहनांचा हिस्सा दोन वर्षांत ३२ वरून ५८ टक्क्यांवर गेला, हे दुर्लक्षून चालणार नाही. निर्मात्या कंपन्यांकडून आता सोलार, ईलेक्ट्रिक अशा इंधनावर चालणाऱ्या वाहनांवर भर दिला जात आहे. अर्थात सरकारचे त्यासाठीचे अनुदान अधिक आहेच.
 नेमके हेच ओळखून एकीकडे दरयुद्ध सुरू झाले असतानाच डिझेल बनावटीच्या कारचे अक्षरश: पीक येऊ घातले आहे. याची सुरुवात अर्थात जपानच्या होन्डाने केली. डिझेल बनावटीची कंपनीची पहिली कार-अमेझ सादर करण्यात आली. स्पर्धक मारुती सुझुकीच्या (यातही भागीदार जपानी कंपनीच) लोकप्रिय स्विफ्ट डिझायरच्या तुलनेत किमतीप्रमाणेच तिचे मार्केटिंगही कांकणभर जास्तच करण्यात आले. फार जुन्या नाही, पण नजीकच्या कालावधीपर्यंत देशातील दुसरी मोठी कंपनी असलेल्या मूळच्या कोरियन ह्युंदाईने तिच्या प्रवासी वाहनांच्या किमती ६०० ते ३,००० रुपयांपर्यंत वाढवितांनाच प्रीमियम सेदान श्रेणीतील इलांत्रादेखील डिझेल व्हर्जनमध्ये उपलब्ध करून या युद्धात सहभाग नोंदविला.
सेदान श्रेणीतील चार मीटर लांबीच्या कमी आकारातील आणि तेही डिझेलवर चालणारी कार सर्वप्रथम टाटा मोटर्सने भारतीय बाजारात आणली होती. या प्रकारच्या वाहनांची फारशी स्पर्धा नसताना तिला प्रतिसादही चांगला लाभला. मात्र काळाप्रमाणे वाहन प्रकारात बदल न केल्याने, नवनवीन वाहने सादर न केल्याने या वाहन प्रकारासह कंपनीच्या अन्य वाहनांच्या विक्रीलाही फटका बसत गेला. गेल्या अनेक महिन्यांमध्ये टाटा मोटर्सची विक्री खालावत चालली आहे. आतापर्यंत तिची मदार असलेल्या जग्वार लॅन्ड रोव्हरनेही आता नांगी टाकायला सुरुवात केली आहे. तिचीही जगभरातील विक्री मंदावत चालली आहे, तर स्पर्धक म्हणून रतन टाटा यांनी भीती व्यक्त केलेला महिंद्र समूहही आता कमी लांबीच्या डिझेल प्रवासी-सेदान वाहननिर्मितीत उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. यापूर्वी रेनोबरोबर भागीदारी करत सादर केलेल्या रेनॉल्टचे विभाजनानंतर रूपांतर केलेल्या व्हॅरिटोची डिझेल आवृत्ती सादर करण्याची मनीषा महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्रने व्यक्त केली आहे. तेव्हा आता या प्रकारातील वाहनांनादेखील दरयुद्धाची जोड मिळणार आहे.
जाता जाता..
वाहनचालकांची वाढती पसंती आणि संख्येच्या बाबत विक्री असलेल्या स्पोर्ट युटिलिटी व्हेकलची बाजारपेठ स्थिर होऊ पाहत आहे. या वाहन प्रकारात एकेकाळी मातबर असणाऱ्या महिंद्रलाही आता यात नव्याने दाखल झालेल्या फोर्ड (इकोस्पोर्ट), निस्सान (डस्टर)ची स्पर्धा जाणवू लागली आहे.
बँकिंग क्षेत्रात महिंद्राबरोबर भागीदारी असणाऱ्या खुद्द कोटक सिक्युरिटीजनेही महिंद्र समूह येत्या दोन वर्षांत एसयूव्ही बाजारपेठेतील हिस्सा किमान अध्र्या टक्क्याने तरी गमावेल, असे बिनधास्तपणे वर्तविले आहे. किमतीच्या बाबत ३ ते ४ टक्के स्वस्त असणारा हा वाहन प्रकार २०१५पर्यंत ४ ते ६ टक्क्यांची घट नोंदवेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.