आकाराने मोठी तरीही वापरण्यास सोपी अशी सेदान प्रकारातील कार स्कोडा रॅपिड खास ‘लोकसत्ता टेस्ट ड्राइव्ह’साठी देण्यात आली. बऱ्यापैकी वर्दळ असलेल्या जुन्या मुंबई-पुणे मार्गावर ही टेस्ट ड्राइव्ह घेण्यात आली. आरामदायी आणि सहजसुलभ तंत्र यामुळे रॅपिड ‘यूजर फ्रेण्डली’ वाटली..
शहरामधील वाहतुकीच्या वर्दळीमध्ये मोठय़ा मोटारी चालविणे त्रासदायक होत असते, यामुळेच हॅचबॅक वर्गातील छोटय़ा मोटारींसाठी मागणी वाढली गेली. त्यांच्या कमी किमतीमुळे ग्राहकांना आकर्षितही केले गेले. तरीही सेदान पद्धतीच्या मोटारींचे आकर्षण मुळातच जे उच्चभ्रू वर्गातील लोकांना होते, ते कमी झालेले नाही. त्याच्या दृष्टीने शोफर ठेवला की काम झाले, मागे आरामदायीपणा आवश्यक आहे, इतकेच त्यांचे मोटारी वापरण्याचे उद्दिष्ट होते. सेदान मोटारी एक्झिक्युटिव्ह वर्गासाठी असतात असे एक समीकरण पूर्वीपासून तयार झालेले आहे. अर्थात सेदानमधील आरामदायीपणा व दणकटपणा, सुरक्षितता ही वैशिष्टय़े आजही कायम असल्याचे दिसते. त्यामुळेच त्या वर्गातील लोकांची गरज लक्षात घेऊन स्कोडाने तयार केलेली रॅपिड ही एक उत्कृष्ट सेदान म्हणावी लागेल.
४३८६ मिमी लांबीची रॅपिड आकाराने मोठी असली तरी वर्दळीच्या ठिकाणी वापरताना फार त्रासदायक ठरणार नाही. वळविण्याचा परिघ अधिक घेतला गेला तरी छोटय़ा गल्लीमध्ये निष्णात चालक ती नक्की नेऊ शकेल, तशी आरशांची रचना असल्याने मोटार चालविणाऱ्याचे कौशल्य फार पणाला लावण्याची आवश्यकता नाही. अर्थात ही गाडी मुळातच वर्दळीपेक्षा लांबा पल्ल्यासाठी अतिशय सुरक्षित व चांगली म्हणता येईल, १५९८ सीसी इतकी ताकद असणाऱ्या रॅपिडचे इंजिन हे कणखर व दणकट वाटते. सध्याच्या झटपट वेग घेण्याच्या तुलनेत रॅपिडचा वेग घेताना थोडा अधिक वेळ जाईलही पण एक मात्र निश्चित की रस्त्यावरची पकड न सोडता वेगावर नियंत्रण ठेवण्यास सोपेपणा जाणवतो. मोटारीची ताकद ही तिच्या वजनाच्या तुलनेत संयमित ठेवण्यात आली आहे. ताकदीपेक्षा मोटारीचे वजन कमी वाटत नाही. त्या ताकदीला साजेल असे वजन असल्याने सुरक्षितपणा  चांगला पत्रा व चांगले आरेखन असल्याने रॅपिड ही लांबच्या प्रवासासाठी चालवायला व प्रवासाला आरामदायी व सुरक्षित वाटते.
अति अत्याधुनिकता या मोटारीत टाळली गेल्याचे दिसते. विशेष करून सेन्सर्सचा अतिवापर नाही, मॅन्युअल गीअर्स देण्यात आलेले असल्याने मोटार चालविण्याचे सुख काही और असते. वेग घेताना झटक्यात नाही पण अगदी हळूवारपणे वेग पकडावाही लागत नाही. त्यामुळे अलीकडच्या झटक्यात वेग पकडणाऱ्या मोटारींप्रमाणे रॅपिड वेग घेत नाही, परंतु वेग पकडण्याचा सुरक्षितपणा मात्र नक्की मिळतो व तो समाधानकारक आहे. वेगात असताना वेग कमी करण्याची वेळ आल्यानंतर एक्सलरेशन कमी करा व पुन्हा वेग घेण्यासाठी लोअर गीअरला जावे लागते, हा काहीना त्रुटीचा भागही वाडू शकेल पण ही बाब सुरक्षिततेच्या दृष्टीने नक्कीच गरजेची आहे, ती रॅपिडमध्ये देण्यात आलेली आहे. वेगाचा अतिमोह टाळला आहे. १६०० सीसी ची ताकद असल्याने वेग घेताना पद्धतशीरपणे आरपीएम मीटर वाढतो, एक्सलरेशन द्या व वेग वाढवा असा (विनाकारण ) स्पोर्ट मोडसारखा तो वाढत नाही, कारण ही एसयूव्ही नाही.
हेडलॅम्पची रचना सौंदर्यपूर्ण आहे, नवेपणाची नाही. अर्थात सौंदर्यापेक्षा सुरक्षितता व दणकटपणाला प्राधान्य यात दिले आहे. मागील आसनांची व्यवस्था आरामदायी आहे. चालकाची आसनाची स्थिती वर खाली करता येते पण त्यासाठी इलेक्ट्रीक बटणांचा वापर केलेला नाही, आसन वर खाली  व पुढे मागे करण्यासाठी तुम्हाला हातानेच कळ दाबत कृती करावी लागते. त्यासाठी मोटर बसविलेली नाही. अधिकाधिक मॅन्युअल क्रिया असल्याने मोटारीला येणारा देखभालीचा त्रास तसा कमी केला आहे, असे म्हणावे लागेल.
स्कोडासारख्या कंपनीची मोटार म्हटल्यानंतर ती अत्याधुनिक सुविधांची असेल, असा समज करून त्याकडे पाहाता कामा नये. सर्वसाधारण आवश्यक व गरजेपुरत्या बाबी अचूकपणे दिल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक क्लिष्टपणा त्यात नाही. एबीएस, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, मागील आसनांसाठी वातानुकुलीत यंत्रणेची सुविधा, पॉवर विंडो, पॉवर स्टिअरिंग, अशा बाबी उच्चश्रेणीत दिल्या आहेत. बाहेरील आरसे जुळविण्यासाठी कनिष्ठ श्रेणीमध्ये मॅन्युअल व उच्च श्रेणीमध्ये इलेक्ट्रिक यंत्रणेद्वारे कळ दाबून जुळवण्याची सुविधा दिली आहे. अशा काही सुविधा उच्च व कनिष्ठ श्रेणीनुसार दिल्या असल्या तरी अति अत्याधुनिकता वा इलेक्ट्रॉनिकचा वापर यात टाळलेला दिसतो. किंबहुना विनासायास मोटार चालविण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांना कदाचित स्कोडा रॅपिड चालविणे आवडणार नाही. मात्र वाहन चालविण्याचा आनंद घेण्यासाठी, अधिक काळ वापरण्याच्या दृष्टीने मोटार घेणाऱ्यांना रॅपिड आवडू शकेल, असे वाटते.
(पेट्रोल व डिझेल या दोन इंधन प्रकारांमध्ये उपलब्ध असून पेट्रोलवरील स्कोडा रॅपिड टेस्ट ड्राइव्हसाठी वापरण्यात आली)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेंट्रल मिरर
मोटारीतील अंतर्गत मिररला रात्रीच्यावेळी मागील मोटारीचा प्रकाशझोत चालकाच्या डोळ्यावर त्रासदादायी ठरू नये यासाठी नाईट व्हिजनची सोय देण्यात आलेली आहे. मात्र हा आरसा मागील मोटारींचा विशेष करून शहरी वर्दळीमध्ये अंदाज देणारा वाटत नाही. मागील आसनांचे हेडरेस्ट या आरशाच्या मागील स्थितीदर्शनात त्रासदायी वाटते. चालकाच्या डोळ्यांच्या स्तरावर तो लावला असल्याने त्यातून मागील स्थितीचा अंदाज घेताना त्रास होत नाही, मात्र मागील स्थिती पाहाताना जमिनीपासून बराचसा भाग दिसून येत नाही. त्यामुळे रिव्हर्स घेताना बाहेरच्या बाजूच्या दोन्ही आरशांचा वापर करावा लागतो, तो अधिक उपयुक्त वाटतो.
तांत्रिक वैशिष्टय़े
लांबी/रूंदी/उंची/व्हीलबेस/ग्राऊंड क्लीअरन्स/(एमएममध्ये ) – ४३८६/१६९९/१४६६/२५५२/१६८
टर्निग सर्कल डायमीटर  – १०.६ मीटर
इंजिन – ४ सिलेंडर, पेट्रोल इंजिन, इन लाइन लिक्विड कूलींग सिस्टिम, १६ व्हो. डीओएचसी, १५९८ सीसी,
कमाल ताकद – ७७ किलो वॉट, (१०५ पीएस) ५२५० आरपीएम
कमाल टॉर्क – १५३ एनएम ३८०० आरपीएम
अंदाजित किमान मायलेज – १५ किलोमीटर प्रतिलीटर
फ्रंट व्हील ड्राइव्ह
ट्रान्समीशन – मॅन्युअल ५ स्पीड पुढील – पूर्ण सिन्क्रोनाईज्ड
स्टिअरिंग – डायरेक्ट रॅक अ‍ॅण्ड पिनिअन इलेक्ट्रो मेकॅनिक पॉवर स्टिअरिंगसह.
व्हील्स – ५.० जे बाय १४
टायर – १७५/७० आर १४
कर्ब वेट – ११४५ किलोग्रम
इंधन टाकी क्षमता – ५५ लीटर
रंगसंगती – कापुसिनो बैज, कॅन्डी व्हाइट, फ्लॅश रेड, ब्रिलिअन्ट सिल्व्हर, डीप ब्लॅक पर्ल
मूल्य – ७ लाख ३४ हजार २८४ रुपयांपासून ९ लाख ६७ हजार ९३६ रुपये
(एक्स शोरूम मुंबई, विमा, नोंदणी, जकात, अतिरिक्त वॉरंटी वेगळे)
वैशिष्टय़े
*    सुलभ मॅन्युअल गीअर शिफ्टिंग
*    अंतर्गत आरसा नाइट व्हिजनसाठीही उपयुक्त
*    चालकाशेजारील आसन मागील प्रवाशालाही पुढे मागे करता येण्याची सुविधा
*    मागील प्रवाशांना वातानुकूलीत यंत्रणेचा लाभ
*    डिक्कीमध्ये भरपूर जागा
*    समाधानकारक लेग व हेड स्पेस
*    चालकासाठी माहितीदर्शक डिजिटल स्क्रीन
*    स्अिरिंग व्हील मागेपुढे व खालीवर करण्याची सुविधा
*    एअरबॅग (उच्च श्रेणीत)
*    एबीएस सुविधा
मल्टिमीडियाचा अभाव
रॅपिडमध्ये देण्यात आलेली इनबिल्ड म्युझिक सिस्टिम आवाजाचा आनंद देणारी असली तरी ब्ल्यू टुथ व युएसबी सुविधा नसल्याने काहीशी अपूर्ण वाटते. त्या ठिकाणी मिडिया असे लिहिले असले तरी ती सुविधा नाही. केवळ एसडी कार्डासाठी खाच देण्यात आलेली आहे व ऑक्झिलरीची सुविधा देण्यात आली आहे. अर्थात नव्या तंत्रामुळे ब्ल्यू टुथ सुविधा तरी द्यायला काहीच हरकत नव्हती.

More Stories onकारCar
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Simple rapid
First published on: 11-07-2013 at 10:01 IST