सध्याच्या चर्चेच्या कॉम्पॅक्ट कार श्रेणीत आता टाटानेही उडी घेतली आहे. कंपनी फेब्रुवारीत होणाऱ्या वाहन प्रदर्शनात या प्रकारचे वाहन प्रथमच सादर करणार आहे. तिचे नावही ‘जम्प’ असे ठेवण्यात आल्याचे समजते. एक्स१ व्यासपीठावरील ही कॉम्पॅक्ट कार टाटाकडून सादर करण्यात येईल.स्पोर्ट यूटिलिटी वाहन प्रकारात मातब्बर असलेल्या महिंद्र अॅण्ड महिंद्रला सुमो (खरे तर एमपीव्ही-अर्थात मल्टी परपज व्हेकल), सफारीद्वारे (नवी स्टॉर्म) टाटाने थेट सामना करण्याचा प्रयत्न केला. मात्र एसयूव्ही प्रकारात स्कॉर्पिओ, झायलो, एक्सयूव्ही५०० यांचा वरचष्मा राहिलाच. त्यातच महागडय़ा एसयूव्हीच्या श्रेणीत टाटाने लॅण्ड रोव्हर उतरवली असतानाच महिंद्रानेही आपली कोरियन ह्य़ोसंगची झेनॉन आणलीच. तसे म्हटले तर टाटा एसयूव्हीमध्ये बस्तान बसवू शकली नाही. मात्र, आता वेगाने वाढू पाहणाऱ्या कॉम्पॅक्टमध्ये आपण मागे पडू नये यासाठी ती ‘जम्प’ घेत आहे. वर्षभरानंतर ती रस्त्यावर फिरण्याची शक्यता असली तरी तिचे रूपडे, तिचा प्राईस टॅग हे मात्र यंदाच्या वाहन प्रदर्शनात स्पष्ट होईल.टाटा मोटर्सने गेल्या आठवडय़ात नवे स्वयंपूर्ण बनावटीचे पहिले रेव्हट्रॉन इंजिन सादर करताना ते कॉम्पॅक्ट कारसाठी योग्य असल्याचे नमूद करून या श्रेणीचे सूतोवाच केले होते. तसे झाल्यास १०० बीएचपी, १.२टी टबरे पेट्रोल इंजिन असलेली कॉम्पॅक्ट लवकरच सादर होईल.
भारदस्त एसयूव्ही कोणत्या वाहनप्रेमीला आवडणार नाही? वेगापेक्षाही थरारकतेचा अनुभव देणारी एसयूव्ही मनामनात रुंजी घालणारी ठरते. त्यात जर ती एक्सयूव्ही५००, सफारी स्टोर्म असेल तर! पण मनगट-गळ्यात पिवळेकंच दागिने घालणाऱ्यांना आणि भारदस्त शरीरयष्टी असणाऱ्यांनी तिच्यासह फोटो फेसबुकवर टाकले तरी ते चांगले झळकतात. पण कमी बजेटवाल्यांनाही एसयूव्हीबरोबर छायाचित्रण करायचे असल्यास काय?
ही भूक भागविली कॉम्पॅक्ट या वाहन प्रकाराने. कॉम्पॅक्ट कार म्हणजे छोटी एसयूव्हीच म्हणा ना. फोर्डची इकोस्पोर्ट, रेनॉची डस्टर अशी नावे घेतली तर या वाहनाची कल्पना येईल. इकोस्पोर्ट आणि डस्टर या क्षेत्रातील कट्टर वैरिणी बनल्यानंतर आता अन्य खेळाडूही या स्पर्धेत उतरत आहेत.
फोर्डही नवी कॉम्पॅक्ट कार येत्या वाहन प्रदर्शनात सादर करणार आहे. यानंतर ती लवकरच जागतिक स्तरावरही विकली जाईल. ही कॉन्सेप्ट कॉम्पॅक्ट कार सध्याच्या याच श्रेणीला टक्कर देणारी असेल, असे कंपनीने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
इकोस्पोर्टच्या रूपात कॉम्पॅक्ट कार बाजारपेठेत धुरळा उडवून देणाऱ्या फोर्डने याच श्रेणीच्या जोरावर २०१८ पर्यंत २० लाख वाहन विक्रीचे लक्ष्य राखले आहे. कंपनीने गेल्या वर्षी सादर केलेल्या इकोस्पोर्टने सध्या रेनॉच्या डस्टरला टक्कर दिली आहे. या दोन्हींचा सामना करण्यासाठी फोक्सव्ॉगनची पोलोही येऊ घातली आहे. टॅगन नावाची ही कार जिनेव्हाच्या ऑटो शोमध्ये म्हणे प्रथम झळकली होती. तसेही पोलोने शेव्हर्लेच्या बिट, निस्सानच्या मायक्रा, फोर्डच्या फिगोची धडकी वाढविली आहेच. आता कॉम्पॅक्टच्या अवतारातील पोलोही धडकेल.
ना धड कॉम्पॅक्ट ना एमपीव्ही अशा श्रेणीतील क्वान्टोही या अवतारात येण्यासाठी महिंद्रच्या गळी पडली आहे. क्वान्टोमध्येही सात आसने देऊनही ती फारशी काही एमपीव्ही म्हणून खरेदीदारांना पसंत पडली नाही. एमपीव्हीत प्रथमच उतरणाऱ्या मारुती सुझुकीच्या एर्टिगाने यात काहीशी जागा मिळविली. हीच मारुती आता वाहन प्रदर्शनाच्या निमित्ताने कॉम्पॅक्ट श्रेणीत उतरू पाहत आहे. सेलिरिओ नावाने ती प्रसिद्ध के सिरीजच्या पेट्रोल इंजिनमध्ये असेल. सात आकर्षक रंग, सहा विविध प्रकारातील ती २३.१ किलोमीटर प्रतिलिटरची इंधन क्षमता देईल, असाही दावा केला जातो. जोडीला अत्याधुनिक तंत्रज्ञानही असेलच.