नवीन गाडी घेतोय ना, म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही. अशा भ्रमात राहून तुम्ही थेड गाडी विकत घ्यायला जात असाल, तर जरा थांबा! जुन्या गाडय़ांच्या तुलनेत नवीन गाडी घेताना फार गोष्टींचा विचार करावा लागत नाही. पण तरीही नवीन गाडी विकत घेण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे कधीही चांगलेच..

जुन्या किंवा सेकंड हँड गाडी घेताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, गाडीची निवड कशी करावी, याबाबत आपण गेल्या वेळच्या अंकात माहिती घेतली. जुनी गाडी घेताना कटाक्षाने काही गोष्टी पाहून मगच निर्णय घ्यावा लागतो. नवीन गाडीच्या बाबतीत अशी खातरजमा करण्याची गरज खूपच कमी असते. तरी नवीन गाडी घेतानाही अनेक गोष्टी पारखून घ्याव्या लागतातच. या गोष्टी कोणत्या, त्या पारखून घेण्याची गरज काय, ती गरज खरेच आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कदाचित या लेखाच्या शेवटापर्यंत सर्वानाच मिळतील. नवीन गाडी घेण्याआधी सर्वसामान्यपणे सर्वानाच पडणारा एक प्रश्न म्हणजे, गाडी कुठली घेऊ? साधारणपणे बजेट ठरलेलं असतं. त्या बजेटमध्ये बसणाऱ्या अनेक गाडय़ा डोळ्यांसमोर असतात. मग त्यातून एक गाडी निवडताना भल्याभल्यांची कसोटी लागते. अशा वेळी काही प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे तयारच असायला हवीत.

गाडी घेण्याआधी..
गाडी घेण्याआधी स्वत:लाच काही प्रश्न विचारणे गरजेचे आहे. यात प्रामुख्याने पहिला प्रश्न येतो तो तुमच्या बजेटचा! गाडी घेण्यासाठी तुम्ही किती पैसे खर्च करू शकता, या महत्त्वाच्या प्रश्नावर तुमच्या इतर प्रश्नांची उत्तरे अवलंबून आहेत. बजेट ठरल्यावर गाडीची निवड करण्याची प्रक्रिया सुरू होते. याच प्रश्नाला जोडून येणारा प्रश्न म्हणजे कर्ज काढून गाडी घेणार असू, तर मासिक हप्ता किती रुपयांचा असणार आहे? या मासिक हप्त्याच्या गणितावर पुढील काही वर्षांचे तुमचे बजेट अवलंबून असते. त्यानंतर तुम्हाला हॅचबॅक गाडी घ्यायची आहे, सेडान गाडी की, एसयूव्ही प्रकारातील गाडी घ्यायची आहे, हा प्रश्न उत्तरित काढायला हवा. या प्रश्नाचं उत्तर मिळवायला तुम्हाला आणखी एका प्रश्नाचं उत्तर शोधायला हवं. तो प्रश्न म्हणजे माझ्या जीवनशैलीसाठी कोणती गाडी आवश्यक आहे? केवळ हाती पैसे आहेत, म्हणून एखादी महागडी गाडी घेणे, हा उपाय असू शकत नाही. त्या गाडीची आपल्या दैनंदिन जीवनातील गरज किती आहे, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. तसेच तुम्ही उच्चभ्रू वस्तीत राहत असाल, तर मग तुमच्या जीवनशैलीला साजेशी अशी मोठी गाडी तुमच्या दारात असणेही आवश्यक असते. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार होणे महत्त्वाचे आहे. तसेच गाडीत कोणकोणत्या सुविधा असणे आवश्यकच आहे, यावरही गाडीची किंमत वरखाली होऊ शकते. कारण गाडीतील प्रत्येक सुविधेसाठी तुम्हाला काही हजार रुपये जास्त मोजावे लागू शकतात.

आर्थिक नियोजन
तुम्ही एखाद्या गाडीसाठी किती पैसे खर्च करणार आहात, याचा अंदाज घेऊन त्यानुसार नियोजन असायला हवे. तुम्ही गाडी निवडलीत की तिची किंमत आणि ती गाडी विक्रेत्यांचा शोधही महत्त्वाचा असतो. गाडी विक्रेता शक्यतो तुमच्याच शहरात असावा. तसंच गाडी घेण्याची वेळ एखाद्या सणावाराच्या आसपास असली, तर त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. गाडी घेताना काही सूट किंवा सवलत मिळू शकते का, हे तपासणेही महत्त्वाचे असते. एखाद्या बँकेकडून कर्ज काढून गाडी घेत असाल, तर कमीतकमी व्याजदर हा मुद्दा विचारात घ्यायला हवा. तसेच गाडीबरोबर वॉरंटी किंवा काही सेवा करारही केला जाणार आहे का, याबाबतही चौकशी करा.

गाडीची निवड
एकदा या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली की, गाडीची निवड आणखीनच सोपी होते. नेमकी कोणती गाडी घ्यायची, हे ठरवण्यासाठी विविध गाडय़ांचे रिव्ह्य़ू वाचणे कधीही चांगले! तज्ज्ञांनी हे रिव्ह्य़ू लिहिले असल्याने गाडीच्या तांत्रिक अंगांची सखोल माहिती त्यातून मिळू शकते. तसेच गाडीची अंतर्गत रचना, सोयीसुविधा यांचीही सखोल माहिती तुम्हाला या रिव्ह्य़ूजमधून मिळते. हे रिव्ह्य़ू विविध संकेतस्थळांवर उपलब्ध असल्याने त्यासाठी काही विशेष खर्चही येत नाही. तसेच घरबसल्याही तुम्ही रिव्ह्य़ू बघू शकता. या संकेतस्थळांवर दोन गाडय़ांची तुलना करण्याचाही पर्याय उपलब्ध असल्याने तुम्हाला आवडलेल्या दोन किंवा तीन गाडय़ांची एकाच वेळी तुलना करणेही शक्य आहे. या तुलनेमुळे कोणत्या गाडीत नेमक्या कोणत्या गोष्टी जास्त आहेत किंवा दोन गाडय़ांच्या किमतीमधील फरक का आणि किती आहे, हे तुम्हाला सहज समजू शकेल.

गाडीचा विमा
नवीन गाडी घेताना गाडीची विमा सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र त्यासाठी विमा कंपनीची निवड काळजीपूर्वक करायला हवी. कोणती विमा कंपनी किती पैशांत काय काय विमा सुरक्षा देते, हे तपासून बघण्यासाठी आता पॉलिसी बझारसारखी काही संकेतस्थळे आहेत. मात्र अशा संकेतस्थळांचा वापर करायचा नसला, तरी तीन ते चार विमा कंपन्यांमध्ये तुलना करून मगच निर्णय घ्यायला हवा. अपघात, आग, इतर दुर्घटनांमुळे गाडीचे नुकसान या सर्वासाठी परतावा आहे का, याचा विचारही विमा काढताना झाला पाहिजे. या सर्व गोष्टी जाणून घेऊन मगच गाडीचा विमा काढण्यासाठी योग्य कंपनीची निवड करणे शक्य होईल.

निर्णय झाल्यावर..
कोणती गाडी घ्यायची, किती डाउन पेमेंट आणि किती हप्ते या सर्वाचा विचार झाल्यावर निवडलेल्या गाडीची टेस्ट ड्राइव्ह घेणे केव्हाही चांगले. आपण निवडलेली गाडी वापरणे आपल्यासाठी सोपे आहे का, आपण ठरवलेल्या सर्व गोष्टी या गाडीत किंवा संबंधित मॉडेलमध्ये आहेत का, गाडीची इंजिन क्षमता कशी आहे, या सर्व गोष्टींची तपासणी या टेस्ट ड्राइव्हदरम्यान करायला हवी. संकेतस्थळावर दाखवल्याप्रमाणे गाडी खरोखरच आरामदायक आहे ना, गाडीतील इतर सर्व सुविधा योग्य आहेत ना, याची खातरजमा करणेही आवश्यक आहे. तसेच गाडीच्या खरेदीसंदर्भातील सर्व बाबी पूर्ण झाल्यावर गाडी घरी आणण्याआधीही या सर्व गोष्टींची एकदा खातरजमा करून घेणे केव्हाही चांगले.