ऑक्टोबरच्या कडक उन्हानंतर चोरपावलाने गुलाबी थंडीचे आगमन होते. बहुतेकांच्या आवडीचा मोसम असलेल्या या थंडीत त्वचेची काळजी कशी घ्यावी वगरेच्या जाहिराती एव्हाना दिसूही लागल्या आहेत. थंडीच्या दिवसांत गाडीचीही काळजी घेणे गरजेचे आहे. कारण याच दिवसांत गाडीचे इंजिन अतिथंड होण्यामुळे ती लवकर सुरू न होणे, वायपरला तडे जाणे असे प्रकार घडत असतात. या पाश्र्वभूमीवर गाडीच्या काळजीविषयी काही टिप्स देतायत.. केतन लिमये..
इंजिन
गाडीचे सर्व कार्य तिच्या इंजिनावर अवलंबून असते. इंजिन जेवढे चांगले काम करेल तेवढय़ा वेगाने गाडी पळेल. गाडीचा हा आत्माच जणू. मात्र, थंडीच्या दिवसात इंजिन पटकन थंड पडते. त्यामुळे गाडी लवकर सुरू होत नाही. ऐन घाईच्या वेळी असे झाले तर फारच त्रासदायक. तेव्हा हे टाळण्यासाठी गाडी सुरू करताना ती अगदी हळू सुरू करावी. सुरू झाल्यानंतर लगेचच क्लच आणि गीअर टाकून ती चालवणे केव्हाही अयोग्यच. त्यामुळे गाडी तशीच सुरू ठेवून इंजिन थोडे गरम होण्यापर्यंत वाट पाहावी. ठराविक तापमानाला इंजिन गरम झाले की मग हळुवारपणे गाडी गीअरमध्ये आणणे योग्य. त्यामुळे इंजिनावरही ताण येत नाही आणि इंधनाचीही बचत होते.
जळमटं काढा
अनेकदा गाडी चालवताना हवेतील किडे-किटाणू, माश्या वगरे आपल्या गाडीच्या काचेवर किंवा इतर ठिकाणी आदळत असतात. त्यातील काही गाडीला चिकटून वायपर, रेडिएटरचे जाळे, एसीजवळील जागा या ठिकाणी जाऊन बसतात आणि यथावकाश त्या ठिकाणी घर उभारतात. या कीटकांमुळे त्या त्या ठिकाणी गाडीला गंज चढू लागतो. हिवाळ्याच्या दिवसात असा धोका अधिकच. कारण तुलनेने गरम जागेतच हे किटाणू आसरा शोधत असतात. त्यामुळे वायपर, एसीच्या जाळ्या, डक्ट, रेडिएटर यांची साफसफाई करून घेणे केव्हाही चांगले.
वायपरची काळजी
वायपरचा तसा उपयोग पावसाळ्यातच जास्त. त्यामुळे इतर वेळी गाडी धुताना किंवा फारफार तर धूळ जमली तरच वायपरचा उपयोग होतो. मात्र, थंडीच्या दिवसांत होते काय की, बाहेरील थंड हवामान आणि गाडीतील उबदार वातावरण यामुळे वायपरला दोन्ही प्रकारचे तापमान सहन करावे लागतात. याला थर्मल शॉक असे म्हटले जाते. त्यामुळे वायपरला तडे जाण्याची शक्यता असते. थंडीमध्ये हे तडे आणखी वाढून वायपर तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे वायपरचे तडे योग्य वेळी रिपेअर करून घेणे हिताचे ठरते. हेड आणि टेल लॅम्पच्या बाबतीतही हेच लागू होते. वायपरच्या ब्लेडबाबतही हाच नियम लागू होतो. कडक उन्हात किंवा अतिथंडीत वायपरचे ब्लेड कडक होतात. त्यामळे ते योग्य काम करू शकत नाहीत. त्यामुळे काचेवरून ते फिरल्यास काचेला तडा जाण्याची शक्यता असते. म्हणून वायपरच्या ब्लेडचीही काळजी घ्यावी.
याशिवाय ब्रेक, टायर या दोन महत्त्वाच्या गोष्टींची ठराविक काळात तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. झिजलेले टायर, ब्रेकपॅड त्वरित बदलून घ्यावेत. तसेच व्हील अलाइन्मेंटचीही योग्य तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतली जाणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onकारCar
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winter and car
First published on: 10-10-2013 at 09:52 IST