News Flash

अभ्यास आणि वैराग्य

जगण्याचा हेतू आनंदाची प्राप्ती हाच असेल, तर मग ज्या कृत्यांतून दु:खच निपजतं, ती कृत्यं माणूस करणारच नाही.

चैतन्य प्रेम

जगण्याचा हेतू आनंदाची प्राप्ती हाच असेल, तर मग ज्या कृत्यांतून दु:खच निपजतं, ती कृत्यं माणूस करणारच नाही. प्रत्यक्षात मात्र सुखासाठी अहोरात्र आसुसलेला माणूस सुखप्राप्तीच्याच हेतूनं अशी कृत्यं करतो, जी प्रत्यक्षात दु:खकारकच होतात. असं का घडतं? कारण नेमकी कोणती र्कम खऱ्या अर्थानं सुखदायक आहेत, हे माणसाला नेमकेपणानं उमगत नाही. जे घडलं तर सुख मिळेल, अशी त्याची कल्पना असते ते घडावं म्हणून तो तळमळत असतो. ईश्वराची करुणा भाकत असतो. तेव्हा कोणती गोष्ट सुखाची आणि कोणती दु:खाची, कोणती हिताची आणि कोणती अहिताची, कोणती योग्य आणि कोणती अयोग्य; हे माणसाला उमगत नाही. याचं कारण मन, चित्त, बुद्धी स्थिर नाही. ते स्थिर व्हावं असं वाटत असेल तर जो स्थिरमतीचा सत्पुरुष आहे त्याच्या बोधाच्याच ठायी आपलं मन, चित्त, बुद्धी एकवटून स्थिर व्हायला हवी. मगच जीवन खरं कसं जगावं, यासाठीचा त्यांचा बोध अंतकरणात ठसेल, तसं जगण्याचा प्रयत्नपूर्वक अभ्यास मग ते करवून घेतील. चंचल मनाला स्थिर करणं, एका ध्येयाकडे केंद्रित करणं कठीण आहे, असं आपल्याला वाटतं. त्यावर भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी मात्र अर्जुनाला सांगितलं आहे की, ‘‘अभ्यासानं अशक्य असं काहीच नाही!’’ मात्र, दोन महत्त्वाच्या गोष्टी श्रीकृष्णांनी सांगितल्या आहेत. ते म्हणतात, ‘‘असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम्। अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्य़ते।।’’ (अध्याय ६, श्लोक ३५). म्हणजे, ‘‘हे अर्जुना, चंचल मनाला स्थिर करणं नि:संशय कठीण आहे. पण योग्य अभ्यासानं आणि वैराग्यानं मनाला संयमित करता येणं शक्य आहे!’’ इथं दोन गोष्टी अनिवार्य असल्याचं सांगितलं आहे. त्या म्हणजे ‘अभ्यास’ आणि ‘वैराग्य’! वरवर पाहता या दोन्हीचे खरे अर्थ पटकन लक्षात येत नाहीत. या दोन्ही गोष्टींचा संबंध स्थूलाशी आणि सूक्ष्माशी आहे, हेसुद्धा उमगत नाही. पण सूक्ष्म धारणा आणि प्रत्यक्ष आचरण या दोन्ही पातळ्यांवर ‘अभ्यास’ आणि ‘वैराग्या’चा कस लागतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे काय? त्यासाठी आधी ‘अभ्यास’ म्हणजे नेमकं काय, ते जाणून घेतलं पाहिजे. सूक्ष्म पातळीवर अभ्यास म्हणजे जे आपलं ध्येय ठरलं आहे, त्याचं सतत अनुसंधान आणि त्या अनुसंधानाला पोषक अशी प्रत्येक कृती ही आहे अभ्यासाची स्थूल पातळी! आता आपलं- म्हणजे साधकाचं खरं ध्येय काय? तर सद्गुरू-बोधानुसार जगणं! मग त्या बोधाचं अनुसंधान, चिंतन, मनन ही झाली सूक्ष्म पातळी आणि ज्या कृतीनं ते अनुसंधान विकसित होत असेल ती प्रत्येक कृती; मग तो स्वाध्याय असेल, जप असेल, पूजा असेल, पठण असेल- असं सर्व काही म्हणजे अभ्यासाची स्थूल पातळी! वैराग्याच्याही याच पातळ्या आहेत. पण त्याआधी साधकासाठी ‘वैराग्या’चा अर्थ थोडा जाणून घेऊ. अभ्यासाच्या अनुषंगानं हा अर्थ आपण पाहत आहोत बरं. तर गुरूप्रदत्त जे ध्येय आहे, त्याचं सतत अनुसंधान आणि त्या अनुसंधानाला पोषक अशी प्रत्येक कृती म्हणजे अभ्यास, हे आपण पाहिलं. तर या ‘अभ्यासा’च्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा मनातून त्याग हेच ‘वैराग्य’ आहे! हा त्यागही स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही पातळ्यांवरचा आहे. चुकीच्या कल्पना, धारणा, कामनांचा त्याग ही वैराग्याची सूक्ष्म पातळी आहे. तर प्रत्यक्ष चुकीच्या आचरणाचा त्याग ही स्थूल पातळीवरील वैराग्याची प्रचीती आहे. जोवर अभ्यास आणि वैराग्य या दोन्ही गोष्टी साधत नाहीत, तोवर मनाची चंचलता सुटणार नाही!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 12:06 am

Web Title: article on study and asceticism abn 97
Next Stories
1 आहे अन् नाही
2 तत्त्वबोध : तहान-भूक
3 जीवन-ध्येय
Just Now!
X