चैतन्य प्रेम

नाथ म्हणतात, या भगवंतमय सत्पुरुषाचा जो खेळ असतो ना, तेच जणू महापूजन असतं! आता हा ‘खेळ’ म्हणजे काय? तर भौतिकातल्या लीलादेखील या ‘खेळा’त येतात. श्रीगोंदवलेकर महाराज एकदा गावातल्या मंडळींबरोबर बोलत बसले होते. गंमत अशी, की सत्पुरुषाची ओळख जगाला कळते, पण त्याच्या गावाला ती कळायला  अनेक वर्ष जावी लागतात! ज्यांनी त्यांना, त्यांच्या जन्मदात्या माता-पित्यांना बऱ्याच काळापासून गावात नांदताना पाहिलेलं असतं, त्यांना ते आपल्यातलेच वाटतात ना? म्हणून त्यांची खरी ओळख लवकर होत नाही. तर त्यामुळे गावातली माणसंही महाराजांशी त्याच दृष्टिकोनातून बोलत होती. त्या गप्पांत विषय निघाला काळजीचा. प्रत्येकानं आपापली काळजी सांगितली. महाराज म्हणाले, ‘‘एकूण काय, तर प्रत्येकालाच काही ना काही काळजी आहे, पण मला बुवा काळजीच नाही!’’ आता हे ऐकून गप्प बसले तर ते लोक कसले! एक जण म्हणालाच, ‘‘महाराज, तुमच्याकडे रोज किती तरी लोक येतात आणि त्यातल्या बहुतेकांना तुम्ही आग्रहानं जेवायलाही घालता. आजच मी आपल्या कोठीघरात पाहून आलो. उद्या स्वयंपाक करण्यासाठी पुरेसं धान्यही नाही. तर तुम्ही काहीही खरेदी न करता, आजच दवंडी पिटा की उद्या तुम्ही गावजेवण घालणार आहात!’’ झालं. महाराजांनी दवंडी पिटवली की उद्या रामाच्या मंदिरात गावजेवण आहे. गावकऱ्यांनीही अगदी बारीक लक्ष ठेवलं की महाराज कुठून काही मागवत तर नाहीत ना.. आणि मग दुसरा दिवस उजाडला. सगळे सकाळी दहापासूनच जमू लागले. महाराज स्वस्थ होते. बारा वाजले तशी बायकामंडळी म्हणू लागली की, ‘‘महाराज, आमचं ठीक आहे, आम्ही एक वेळ उपाशी राहू, पण लेकरांचं काय करावं? त्यांना तरी जेवायला द्यायची व्यवस्था करावीच लागेल.’’ महाराज म्हणाले, ‘‘पहा, रामाकडे आपण जेवणार आहोत ना? तर त्यालाच काळजी. आपण त्याचंच भजन करू.’’ मग भजन सुरू झालं. पण नुसत्या भजनानं का जेवण आपोआप मिळतं, हा विकल्प प्रत्येकाच्या मनात उसळून येत होताच. असाच काही वेळ गेला आणि एक बैलगाडी आली. त्यात सगळं धान्य, चिरलेल्या भाज्या, अशी सगळी तयारी होती. ते घेऊन आलेल्यानं सांगितलं की, त्यानं कुठलासा नवस केला होता की अमुक झालं तर महाराजांच्या गावी जेवण घालीन. ते घडलं होतं आणि म्हणून तयारीनिशी तो आला होता! महाराज म्हणाले, ‘‘एकूण काय, की मला काही काळजीचा योग नाही!’’ सद्गुरू चरित्रातले असे अनेक प्रसंग म्हणजे हे ‘खेळ’च आहेत. अगदी ‘हसत खेळत शिक्षण’ म्हणतात ना, तसं त्यांच्या सहवासातले असे अनेक प्रसंग त्या त्या वेळी अगदी सहजतेनं, योगायोगानं घडल्यासारखे वाटतात. पण कालांतरानं विचार केला की त्यातलं मर्म लक्षात येऊ लागतं. ते प्रसंग भगवंतावर काळजी कशी सोडता येते, हेच शिकवतात. आता कुणी म्हणेल की, हे त्यांनाच जमू शकतं. घरात काही नसताना लोकांना जेवायला बोलावून आपण त्यांच्यासारखं भजन करीत भगवंतावर सोडून देऊ शकत नाही. आपल्यालाच हातपाय हलवावे लागतात. हे वाटणं काही चूक नाही. पण निदान हातपाय हलवतानासुद्धा जी काळजी आपल्या मनात सतत सुरू असते ती तरी सोडायला काय हरकत आहे, असा प्रश्न हे प्रसंग मांडतात. तेव्हा भगवंताची महत्ता बिंबवणारे हे लीलाप्रसंग जणू भगवंताचं महापूजन असतात.