चैतन्य प्रेम

सर्व भयांमध्ये भवभय हे अत्यंत कठीण आहे. ते मनातून जाणं मोठं कठीण आहे. पण ते भवभयदेखील भक्तीनं ओसरतं, असं कवि सांगतो. (सकल भयांमाजीं थोर। भवभय अतिदुर्धर। तेंही हरिभक्तीसमोर। बापुडें किंकर केवीं राहे।।३०५।।). पण हे साध्य होण्यासाठी परम तत्त्वाचं अखंड भजन मात्र साध्य झालं पाहिजे. जसजसा अंत:करणातला सद्भाव वाढत जाईल तसतसं प्रेम वाढत जाईल आणि जो अखंड प्रेमानं भगवंताचं अखंड भजन करील, त्याला भवबंधन म्हणून काही उरणार नाही. कविच्या शब्दांत सांगायचं तर, ‘‘वाढतेनि सद्भावें जाण। चढतेनि प्रेमें पूर्ण। अखंड ज्यासी श्रीकृष्णभजन। त्यासी भवबंधन असेना ।।३०४।।’’ मग जसजशी हरिचरणांमध्ये म्हणजेच हरीची पावलं ज्या वाटेनं  जातात त्या वाटेवर, त्या वाटचालीवर अर्थात त्यानुसार जगण्याच्या पद्धतीवर ज्याचं प्रेम जडेल तेथे भवभयाची निवृत्ती होईल. ‘‘जेथें हरिचरणभजनप्रीती। तेथें भवभयाची निवृत्ती। परम निर्भय भगवद्भक्ती। आमुच्या मतीं निजनिश्चयो।।३०७।।’’ जिथं हरिचरणांवर वरती सांगितल्याप्रमाणे प्रेमभक्ती जडली आहे तिथं भवभय बरोबर राहूच शकत नाही. मग निर्भयतेनं भगवंताची भक्ती घडू लागते. अशी निर्भय भक्ती ही आमच्या मतीनुसार निजनिश्चयातूनच दृढ होते, असंही कवि सांगतो. स्वत: भगवंतानंही, मी भक्तीच्या आधीन आहे, असं सांगितलं आहे. (स्वमुखें बोलिला श्रीकृष्ण। मी सर्वथा भक्तिआधीन।). मग लौकिकदृष्टय़ा भक्त अडाणी का असेना, वेदशास्त्राचं त्याला ज्ञानही का नसेना, एका प्रेमाच्या बळावर त्याला निजात्मस्थितीची प्राप्ती होते आणि ब्रह्मभावात तो लीनही होतो. म्हणूनच भगवंतानं भक्तीचा हा मार्ग प्रकाशित केला आहे. (न करितां वेदशास्त्रव्युत्पत्ती। ऐशिया अज्ञानां निजात्मप्राप्ती। सुगम जोडे ब्रह्मस्थिती। यालागीं हरिभक्ती प्रकाशिली देवें।। ३११।।). पण या प्रेमाचा खरा अर्थही जाणला पाहिजे. शाश्वत परम तत्त्वावर प्रेम असेल, तर अशाश्वत संकुचित गोष्टींतलं अडकणं थांबलं पाहिजे. त्यावरचं प्रेम सुटलं पाहिजे. एकाच वेळी अशाश्वतावरही जीव जडला आहे आणि त्याच वेळी शाश्वतावरही प्रेम करीत आहे, असं होऊ शकत नाही. ते प्रेम नसताना म्हणजेच जगावरचं अपेक्षायुक्त प्रेम कायम असताना मी कितीही साधना केली, उपासना केली, तरी तिचा उपयोग नाही. अंत:करणात खोलवर त्या भक्तीचा संस्कार होणार नाही आणि प्रत्यक्ष जगण्यात त्याचं प्रतिबिंबही उमटणार नाही. कवि सांगतो, ‘‘प्रेमेंवीण श्रुतिस्मृतिज्ञान। प्रेमेंवीण ध्यानपूजन। प्रेमेंवीण श्रवण कीर्तन। वृथा जाण नृपनाथा।।३३३।।’’ इथं कवि नारायण एक भावस्पर्शी रूपक योजतात. ते सांगतात, मूल आईला पाहताच प्रेमभरानं तिच्याकडे डोळे मिटून म्हणजेच पूर्ण विश्वासानं धाव घेतं तेव्हा ती आईही त्याच्याकडे अत्यंत सद्भावानं झेपावते, त्याप्रमाणे जो भक्त अत्यंत प्रेमपूर्वक भजनात रममाण असतो, त्याच्या त्या भजनातील अपार प्रेमभावाला भुलून तो स्वानंदयुक्त भगवंतही त्याला पदोपदी सांभाळत त्याच्यासमवेत चालू लागतो! (माता देखोनि प्रेमभावें। बालक डोळे झांकूनि धांवे। ते धांवेसवें झेंपावे। अति सद्भावें निजमाता।। ३३४।। तैसा सप्रेम जो भजे भक्त। त्या भजनासवें भगवंतु। भुलला चाले स्वानंदयुक्तु। स्वयें सांभाळितु पदोपदीं ।।३३५।।).