– चैतन्य प्रेम

भ्रामक, मोहग्रस्त, आसक्तीजन्य इच्छांची पूर्ती व्हावी, या लालसेतून ‘मी’ जगामागे वाहावत जात असतो. लाचारी पत्करून आत्मप्रतिष्ठाही गमावत असतो. सत्पुरुष ही अधोगती थोपवतात, पण त्यासाठी खरं सर्वस्व म्हणजे माझा अहंभाव त्यांच्या चरणीं स्वाहा करावा लागतो, असं गेल्या वेळी सांगितलं. पण हे सर्वस्वाचं समर्पण नेमकं काय आणि ते कसं साधावं, हेच उमगत नाही. माणूस एक वेळ सर्व देईल, पण ‘स्व’ काही देणार नाही, या आशयाचं श्रीगोंदवलेकर महाराज यांचंही वचन आहे. म्हणजे काय? तर सर्व देईल, पण अहंभाव गमावणार नाही. उलट ‘मी’ सर्व दिलं, असा डिंडोरा तो पिटेल! तेव्हा खरं तर सर्व द्यायची काही गरज नाही. फक्त ‘स्व’ म्हणजे सगळ्याचा अहंकार देऊन टाकायचा आहे. त्यासाठी जे काही माझ्याकडे आहे त्याचा अहंकार सुटला पाहिजे. तो सुटायचा तर जे काही आहे ते ‘मी मिळवल्याचा’- कर्तेपणाचा भाव सुटला पाहिजे. एखादा उद्योजक कोटय़धीश होतो, पण त्यात काय केवळ त्याचं कर्तृत्व असतं का हो? जन्मत:च त्याला ज्या दाईनं सांभाळलं ती दाई, तो ज्या शाळेत शिकला तिथले शिक्षक, त्याच्यावर संस्कार करणारे घरातले मोठे लोक, ज्या शहरात तो लहानाचा मोठा झाला ते शहर स्वच्छ ठेवणारे सफाईदूत, ज्या अन्नावर त्याचं पोषण झालं ते कष्टानं पिकवणारा शेतकरी.. या सगळ्यांचाही त्याच्या यशात हातभार आहेच ना? मग त्या यशाचा गर्व कसला? तेव्हा सर्वस्वाचं दान म्हणजे सगळ्या मालमत्तेचं, पैशाचं, वस्तूचं दान नव्हे! त्या सगळ्या वस्तू तुमच्याचकडे असू द्यात. फक्त त्या माझ्या कर्तृत्वानं मी मिळवल्याची भावना तेवढी काढून टाकायची आहे! एका अभंगात एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘आधी ममत्व सांडावें। पाठीं अभिमाना खंडावें।।’’ म्हणजे ‘मी’ आणि ‘माझे’ यात जे ममत्व आहे, माझं-माझं करून चिकटणं आहे ते थांबवावं. जे आहे ते एका भगवंताचं जग आहे. प्रारब्धानुसार या जगाशी माझा संबंध आला आहे. प्रारब्धानुसार परिस्थिती, माणसं वाटय़ाला आली आहेत. त्यात गुंतून न पडता, त्यांच्याप्रति माझं जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याबाबत फक्त मी सजग असावं. पण ‘मी आहे म्हणून..’ हा भाव त्यात नसावा. ममत्वभाव कमी होत गेला, की मग अहंकार टिकणारा नाही. एकदा सर्वभावे ‘मी’ मावळू लागला, की सर्वत्र ‘तू’चं दर्शन कठीण नाही! पण आता त्या पायरीवर आपण पोहोचलो नसल्यानं ते शब्दार्थानं समजलं तरी अनुभवानं कळत नाही! आता ज्या भगवंतानं आपल्याला सर्व दिलं आहे, त्यालाच सर्वस्वाचं मानसिक दान द्यायचं आहे. पण तो भगवंत आहे कसा? अवधूत सांगतो, ‘‘अग्नि सहजें निराकार। त्यासी काष्ठानुरूपे आकार। दीर्घ चक्र वर्तुल थोर। नानाकार भासतू ।।५०४।। तैसीचि भगवंताची भक्ती। स्वमायाकल्पित कल्पनाकृती। तेथ प्रवेशला सहजस्थितीं। बहुदा व्यक्ती तो भासे।।५०५।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा). आगीला काही आकार नसतो, पण ज्या आकाराचं लाकूड पेट घेतं त्या लाकडाच्या आकाराप्रमाणे अग्नीही दीर्घ, चक्राकार, मोठा भासतो. तसा भगवंतालाही आकार नाही. पण भक्ती करताना भक्त भगवंताची जी कल्पना करतो, त्या कल्पनेच्या चौकटीला तडा जाऊ न देता भगवंतही दर्शन देतो. म्हणजेच खरा सद्गुरू त्या भगवद्कल्पनेच्या चौकटीत जीवाला आपलंसं करतो आणि मग ती चौकट मोडत व्यापक करतो. काष्ठाच्या आकारानुसार अग्नीचा आकार भासतो, पण अखेरीस तो आकार भस्मसात होत अग्नीचंच रूप व्यापक होतं!