23 July 2019

News Flash

५०. चांगल्यातून वाईट!

कर्मयोग महत्त्वाचाच, पण कर्मजाडय़ उपयोगाचं नाही.

कर्मयोग महत्त्वाचाच, पण कर्मजाडय़ उपयोगाचं नाही. कर्मठपणा हा भावनेच्या पोषणाच्या आड येऊ शकतो. भगवंतावर निखळ  प्रेम करणाऱ्या गोकुळवासींनी कर्माचे कुठले नियम पाळले होते? पण त्यांच्या प्रेमाचा भगवंतानं स्वीकार केला आणि त्यांच्या मोडक्यातोडक्या कर्माचंच निमित्त करून त्यांना मुक्तीही दिली. म्हणूनच नाथ सांगतात की,  ‘‘कर्मठां होआवया बोधु। कर्मजाडय़ाचे तोडिले भेदु। भोगामाजीं मोक्षपदु। दाविलें विशदु प्रकट करूनि।।’’ इतकंच नव्हे, तर भक्ती, भुक्ती म्हणजे भोग आणि मुक्ती यांना एका पंक्तीत बसवलं!   (भक्ति भुक्ति मुक्ति। तिन्ही केलीं एके पंक्ती।) म्हणजे सम-विषम भेदच त्याच्यापाशी उरला नाही. भक्त आणि शत्रू या दोघांनाही त्यानं आपलंसंच केलं. ‘श्रीकृष्णचरितायन’मध्ये म्हटलं आहे, ‘‘प्रभु तव महिमा जाइ न जानी।। कबहुँ आग तुम कबहुँ पानी।। सम अरु विषम एक हीं संगा।। सहज एक रस कबहुँ न भंगा।।’’ नारदजी म्हणतात, हे प्रभो! तुमचा महिमा जाणता येणं कठीण आहे. कधी तुम्ही आगीसारखे दाहक होता, तर कधी पाण्यासारखे शीतल होता. सम स्थितीचा संग असो की विषम स्थितीचा असो, तुमचा एकरसमयतेचा संग कधीही भंगत नाही!  तेव्हा भक्तीनं जशी माझी प्राप्ती होते तशीच माझ्या प्रेमभोगानंही होते, हे कृष्णानं दाखवलं. सुदाम्यानं कुठे जपजाप्य केलं होतं? पण त्यानं आणलेल्या पुरचुंडीभर पोह्य़ांचा भोग स्वीकारून त्यानं त्याला इहपर मुक्त केलं. त्यानं माती मुखी घालून यशोदेला विश्वरूप दाखवलं, पण त्या दिव्य दर्शनानंतरही तिच्या जाणिवेवर पुन्हा पडदा टाकला आणि हा आपला अजाण पुत्रच आहे, ही तिची धारणा कायम ठेवली! (काय वानूं याची ख्याति। खाऊनि माति विश्वरूप दावी।।) कृष्णचरित्राचं खरं घोषवाक्य म्हणजे ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे!’ तेव्हा खऱ्या धर्मभावाची स्थापना करायची तर आपल्यातलं जे साधुत्व आहे, चांगुलपण आहे त्याचं रक्षण करावं लागतं आणि आपल्यातलं जे वाईट आहे, जे सत्पासून दूर करणारं आहे, दुष्कृत आहे त्याचा नाश घडवावा लागतो आणि हेच सद्गुरूंच्या चरित्राचं रहस्य आहे. हे त्यांचं मुख्य कार्य आहे. आणि खरी गोम अशी की जे आज चांगलं आहे, तेच उद्या वाईट होऊ शकतं! वाईटाचा नाश करण्यासाठी जे चांगुलपण पुढे येतं तेच नंतर अहंकारानं माखून नव्या वाईटाचं रूप घेऊ शकतं! मग ते आधीच्या वाईटापेक्षाही वाईट होऊ शकतं!! श्रीकृष्णानं आधी दुष्टप्रवृत्तीच्या अनेक धुरंधरांना यमसदनी धाडलं. त्यासाठी कमीत कमी शक्ती वापरून अधिकाधिक परिणाम त्यानं साधला तो कलहाचं निमित्त करून! ‘कलहाचे सूत्र उपजवी कृष्ण!’ कृष्णानं जे एकमेकांचे मित्र होते, समर्थक होते अशा दुष्ट प्रवृत्तीच्या राजांमध्येच कलह निर्माण होईल, हे पाहिलं. मग ते एकमेकांविरोधातच उभे ठाकले आणि परस्परांशी लढताना मारले गेले. त्यासाठी कृष्णानं यादवांना मोठं बळ दिलं. भगवंत बळ देतो तेव्हा अशक्य ते शक्य होऊन जातं. पण ते आपणच केलं, असा अहंभाव निर्माण झाला की भगवंत हळूच ते बळ काढून घेतो आणि मग शक्य होतं तेदेखील अशक्य होऊन जातं. आपण दिलेल्या बळानं यादव वंशातील आपलेच बांधव आता उन्मत्त होऊ लागलेत, हे कृष्णानं जाणलं. काल जे चांगले होते ते आता वाईटाहून वाईट बनू लागले होते आणि म्हणूनच त्यांचाही नाश अटळ होता!

– चैतन्य प्रेम

First Published on March 11, 2019 12:12 am

Web Title: loksatta ekatmatayog 50