आपल्या यज्ञस्थानी नवनारायण आल्यानं आनंदलेल्या राजा जनकानं त्यांची जी स्तुती गायली तिच्या निमित्तानं नाथांनी मनुष्यजन्माचा खरा लाभ सांगितला. हा लाभ म्हणजे भगवंताशी एकरूप सद्गुरुंची भेट! या भेटीनं काय घडतं? नाथ सांगतात, ‘‘जैं हरिभक्तांची भेटी घडे। तैं न बाधी संसारसांकडें। जन्ममरण समूळीं उडे। त्यांची भेटी आतुडे अतिभाग्यें।। २४८।।’’ हरीभक्ताची भेट जेव्हा घडते तेव्हा संसाराचे संकट आड येत नाही, जन्ममरण समूळ नाहीसे होते. मात्र त्या भेटीला भाग्य मात्र पाहिजे! आता इथं या भेटीत संसाराचं संकट आड येत नाही आणि जन्ममरण समूळ नाहीसं होतं, म्हणजे काय? तर त्या भेटीची खरी इच्छा असेल, तर भौतिकातील ज्या ज्या अडचणी असतात त्या त्या दूर होतात. आता अडचणी दूर होतात म्हणजे काय? तर त्या अडचणींचा मनावर जो नकारात्मक भीतीयुक्त पगडा असतो, तो उरत नाही. तसंच जन्ममरण समूळ उडतं म्हणजे मृत्यूची तर भीती जातेच, पण जगण्याचीही भीती संपते! आपल्याला वाटेल की माणसाला मृत्यूची भीती असते, पण जगण्याची भीती कशाला असेल? तर खरं पाहता मृत्यूपेक्षाही आपल्याला जगण्याचीच भीती वाटत असते. जगण्यातले चढउतार, संघर्ष, अडथळे, प्रतिकूलता यांच्या भीतीचं सावट मनावर असतं. तेव्हा हे समस्त जन्ममरणभय या भेटीनं समूळ नष्ट होतं. तर नवनारायणांच्या या भेटीनं राजालाही अत्यंत समाधान वाटलं. तो त्यांचं माहात्म्य गाताना म्हणाला, ‘‘‘तुमची दर्शनसंग-चिद्गंगा। अत्यंत दाटुगी माजीं जगा। दर्शनमात्रें ने भव गंगा। जन्ममरण पैं गा मग कैंचें।। २५२।।’’ तुमचं दर्शन आणि तुमचा संग हीच आमच्यासाठी चिद्गंगा आहे, चित्स्वरूप गंगा आहे. तिनं चित्त शुद्ध होऊन भवगंगेचाच निरास होतो, मग जन्ममरण तरी कुठे उरणार? ‘‘निमिषार्ध होतां सत्संग। तेणें संगें होय भवभंग। यालागीं सत्संगाचें भाग्य। साधक सभाग्य जाणती।। २६०।।’’ खरा सत्संग अर्धनिमिष जरी झाला, तरी त्या संगानं भवओढीचा भंग होतो. त्यामुळे जे भाग्यवान साधक आहेत तेच या सत्संगाचं महत्त्व जाणतात. त्या भाग्याच्या जाणिवेनं राजा आनंदला होता. आता हे नवनारायण तरी कोण होते? तर साक्षात परमात्म्याचेच अंश आणि गुरू-शिष्य परंपरा दृढमूल करण्यासाठी तेच नवनाथ रूपानंही नंतर अवतरले. त्यांची मूळ नावं आणि नवनाथ अवतारांतील नावं अशी आहेत : कवि अर्थात आदिनारायण (मत्स्येंद्रनाथ), हरी (गोरक्षनाथ), अंतरिक्ष (जालंधरनाथ), प्रबुद्ध (कानिफनाथ), पिप्पलायन (चर्पटीनाथ), आविहरेत्र (नागनाथ), द्रुमिल (भर्तरीनाथ), चमस (रेवणनाथ) आणि करभाजन (गहिनीनाथ). तर या नवांच्या भेटीनं समाधान पावलेल्या राजानं त्यांना मूलभूत प्रश्न विचारला. राजा म्हणाला, ‘‘आजि मी भाग्यें सभाग्य पूर्ण। लाघलों तुमचें दर्शन। तरी ‘आत्यंतिक क्षेम’ कोण। तें कृपा करून मज सांगा।। २४९।।’’ माझ्या भाग्यानं आज मला तुमचं दर्शन घडलं आहे, आता हे तपस्वी सत्पुरुषांनो तुमच्या चरणीं प्रार्थना करून एक प्रश्न विचारत आहे. त्याबाबत मार्गदर्शन करून आपल्या कृपेचा वर्षांव करा. हा प्रश्न म्हणजे, आत्यंतिक क्षेम म्हणजे काय? जीव ते आत्यंतिक क्षेम म्हणजे शाश्वत कल्याण कसे प्राप्त करू शकतील, ते सांगा. जर भागवत धर्म हाच आत्यंतिक क्षेमाचा आधार म्हणत असाल, तर त्या धर्माचं आचरण कसं करावं, हे सारं मला सांगा!

– चैतन्य प्रेम