चैतन्य प्रेम

संत एकनाथ महाराज सांगतात, हा ‘एकनाथी भागवत’ ग्रंथ काही सामान्य नव्हे! नाथ म्हणतात, ‘‘तें भगवंताचें हृद्गत। त्यासीचि होय प्राप्त। ज्याचें निरंतर चित्त भगवंतीं।।’’ (अध्याय पहिला, ओवी १४४). हे भगवंताच्या हृदयातलं मनोगत आहे. भगवंताच्या हृदयातील भावाचं हे शब्दरूप आहे. ते सहजासहजी प्राप्त होईल का हो? एखादा माणूससुद्धा त्याच्या हृदयातील भाव परक्या माणसापाशी उघड करत नाही. जो अगदी जवळचा आहे, अंतरंगातला आहे, त्याच्यापाशीच तो आपल्या मनातला भाव प्रकट करतो. मग इथं तर साक्षात भगवंत आहे! तो तरी आपला अंत:करणातला भाव कुठेही कसा उघड करील? तेव्हा अत्यंत जवळच्या अशा उद्धवापाशी भगवंतानं हृदयातला भाव व्यक्त केला. हा भाव म्हणजेच भागवत आहे. हा भाव जर आपल्या हृदयापर्यंत पोहोचावा, असं वाटत असेल; तर चित्त निरंतर भगवंतातच रममाण असलं पाहिजे. अर्थात, ‘एकनाथी भागवत’ हा सद्गुरूशी ऐक्यता घडविण्याचा मार्ग दाखविणारा ग्रंथ आहे. ही ऐक्यता ज्याला हवी आहे, त्याचं चित्त सद्गुरूमध्ये रममाण नको का? जिथं आपलं चित्त रममाण असतं, त्याच गोष्टीचं चिंतन घडतं. जगात चित्त जखडलं आहे आणि त्याच वेळी सद्गुरूमयताही साधण्याची इच्छा आहे, तर ते शक्य नाही. सद्गुरूमयता शिकवणारा हा ग्रंथही सद्गुरू जनार्दन स्वामींनीच लिहवून घेतला आहे, अशी नाथांची भावना आहे. आपल्या सद्गुरूबद्दल नाथ सांगतात, ‘‘तेणें जीवेंवीण जीवविलें। मृत्यूवीण मरणाचि मारिलें। दृष्टि घेऊनि दाखविलें। देखणें केलें सर्वाग।।’’ (अध्याय १, ओवी ८२). या सद्गुरूंनी मला जीवभावाशिवाय जगायला शिकवलं व मृत्यूआधीच ‘मी’चं, अहंकाराचं मरण घडविलं. पुढे फार बहारीची उपमा आहे.. ‘दृष्टि घेऊनि दाखविलें। देखणें केलें सर्वाग।’! देहबुद्धीची दृष्टी काढली आणि आत्मबुद्धीचे डोळे दिले! त्यानं पाहण्यासाठी डोळ्यांवर विसंबण्याची गरजच संपली! अंत:चक्षूंनी सगळं दिसू लागलं! या अर्ध्या चरणावर किती बोलावं तेवढं थोडं आहे! नाथांचीच गवळण आहे ना? ‘‘वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले!’’ त्यातही हाच भाव आहे. ‘वारिया’ने म्हणजे भवदु:खाचं निवारण करणाऱ्या सद्गुरूंनी कानात बोध करताच अंत:करणाचं कुंडल म्हणजे तळं हललं! मग साधक डोळे मोडून चालायला लागला! ‘दृष्टि घेऊनि दाखविलें’!! डोळे मोडले तर चालता येईल का हो? भौतिकात ते शक्य नाही. पण अध्यात्माच्या पथावर डोळे मोडल्याशिवाय चालता येत नाही! जगाकडचे डोळे गोरक्षांनी सहज काढले, तेव्हा मच्छिंद्रनाथांनी त्यांना दिव्य दृष्टी दिली. त्याच माझ्याही सद्गुरूंच्या नुसत्या कृपाकटाक्षानं मला अलक्ष्यालाही पाहता येऊ लागलंय, असं नाथ सांगतात. भगवंताच्या हृदयातला भाव त्याच्याशी एकरूप सद्गुरूच जाणू शकतो आणि त्या सद्गुरूशी ज्याची ऐक्यता झाली तो शिष्य जाणू शकतो! सर्व काही परमात्माच आहे- हे ज्ञान शुद्ध आहे हो; पण त्यात गोडी नाही! नाथ म्हणतात, ‘‘सागर सरिता जीवन एक। परी मिळणीं भजन दिसे अधिक। तैसें एकपणेंचि देख। भजनसुख उल्हासें।।’’ (अध्याय १, ओवी ९५). समुद्र काय आणि नद्या काय, शेवटी सगळं पाणीच आहे. शेवटी सगळं पाणी समुद्रालाच मिळणार. पण तरीही नदी समुद्राला जिथं मिळते, त्या संगमाच्या ठिकाणी काही विलक्षण अनुभूती आहे! तिथं ऐक्याच्या ओढीला पूर्णत्व आहे, अतृप्त प्रवाहाची तृप्ती आहे! त्या ऐक्यतेच्या, भक्तिप्रेमाच्या संगमाची सर समुद्रालाही नाही!