04 August 2020

News Flash

३४७. प्रारब्ध-समिधा

सामान्य माणसाप्रमाणेच मलाही द्वैतमय जगात द्वंदात्मक परिस्थिती भोगावी लागत असल्याचं पाहून ते मलाही सामान्य मनुष्य भावानंच जोखतात.

– चैतन्य प्रेम

भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ‘‘अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्।’’- म्हणजे मी मनुष्य देह धारण करून अवतार घेतल्यावर मूढ लोक माझं खरं स्वरूप जाणू शकत नाहीत. सामान्य माणसाप्रमाणेच मलाही द्वैतमय जगात द्वंदात्मक परिस्थिती भोगावी लागत असल्याचं पाहून ते मलाही सामान्य मनुष्य भावानंच जोखतात. मग माझा सहवास मिळूनही त्यांना त्याचा खरा लाभ घेता येत नाही. योगी जगापासून किती लपून असतो सांगावं! श्रीगुळवणी महाराज एका गावी चित्रकला शिक्षक म्हणून शाळेत नोकरी करीत होते. ते शाळेत जाताना रोज एका सहशिक्षकाच्याच घरावरून जात. त्यामुळे बहुधा रोजच शाळेत जाता-येताना तो शिक्षकही त्यांच्या बरोबरच असे. येता-जाता अनेक विषयांवर तो शिक्षक गप्पा मारीत असे. आपल्याबरोबर रोज येत-जात असलेले आपले सहशिक्षक हेच श्रीगुळवणी महाराज म्हणून विख्यात आहेत, हे त्या बिचाऱ्याच्या गावीही नव्हतं. एकदा काही कारणानं महाराजांचा जाहीर सत्कार होणार होता. त्यानिमित्त त्यांच्यावर स्थानिक वृत्तपत्रात एक लेख छापून आला, तेव्हा त्याला हे कळून धक्काच बसला. आता भगवंत ज्यांचा मूढ म्हणून उल्लेख करतात, तसा हा सहशिक्षक कळण्याचीच क्षमता नसलेला मूढ नव्हता; पण सांगण्याचं तात्पर्य असं की, आपण कोण आहोत हे लोकांना सांगण्याची ओढ काही जो खरा योगी आहे त्याला नसते. तो शक्यतो लपूनच राहतो. पण जो खरा शुद्ध मनाचा भाविक आहे, तो जर या योग्याच्या सहज संपर्कात आला तर त्याला या योग्याचं वेगळेपण लक्षात आल्याशिवाय राहत नाही. जसं खरा जो याज्ञिकी आहे त्याला होमकुंडातील राखेखाली दबलेला अग्नी जाणवतोच, तसं खऱ्या भाविकाला योग्याच्या हृदयात लपलेला विशुद्ध भगवत्प्रेमाचा झरा प्रवाहित होताना दिसतोच. म्हणून अवधूत स्पष्टच सांगतो की, ‘‘तैशीच योगियाची लीळा। भाविकां प्रकट दिसे डोळां।’’ भाविकाच्या उघडय़ा डोळ्यांना योग्याचं वेगळेपण दिसतं; मात्र, ‘‘एका गुप्तचि होऊनि ठेला। न दिसे पाहिला सर्वथा।।५००।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा). मात्र इतरांना पाहूनही त्याचं खरं मोल उमगत नाही. मग, ‘‘ऐशियाच्याही ठायीं। भावबळें भाविक पाहीं। अर्पिती जें जें कांहीं। तेणें मोक्ष पाहीं मुमुक्षां।।५०१।।’’ अशा योग्याला हा भाविक जे जे जितक्या प्रमाणात अर्पण करतो, तितका तो मोक्षाचा वाटेकरी होतो. आता हे जे ‘देणं’ आहे, ते काय आहे हो? तर अवधूत सांगतो की, ‘‘तें पडतांचि योगियांच्या मुखीं। संचित क्रियमाणें असकीं। जाळोनियां एकाएकी। करी सुखी निजपदीं।।५०२।।’’ इथं अग्निकुंडाच्या मुखाचा संकेत करताना अवधूत योग्याच्या मुखाचा उल्लेख करतो. यज्ञकुंडात जे जे स्वाहा होतं, ते ते सुफलप्राप्ती करून देत नष्ट होतं. तसंच भाविक योग्याला जे अर्पण करतो, ते त्याला खरं सुख देत जातं! मोठी गूढ गोष्ट आहे बरं! जीव सद्गरूला फक्त त्याचं प्रारब्धकर्माचं दु:खरूपी फळच अर्पण करीत असतो! म्हणून इथं म्हटलं आहे की, या भाविकाचं संचित आणि क्रियमाण कर्माचं प्रारब्धरूपी दु:खभोगांचं फळच नष्ट होतं. आता आपण कळत-नकळत जी प्रत्येक कृती करतो, ती क्रियमाण कर्म होय. प्रत्येक कृतीचं सुखद वा दु:खद फळ वाटय़ाला येतं, ते भोगावंच लागतं. अशी सर्व साचत जाणारी कर्मफलं संचित ठरतात. त्यातील काही भोग जन्माबरोबर वाटय़ाला येतात, तेच प्रारब्ध असतं!

– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 12:06 am

Web Title: loksatta ekatmayog article 347 abn 97
Next Stories
1 ३४६. राखेखालचा अग्नी
2 ३४५. पालट
3 ३४४. खळांची व्यंकटी
Just Now!
X