07 December 2019

News Flash

२१२. ज्ञानाचा अहंकार-सापळा

राजा जनक हा अपरंपार वैभवाचा धनी होताच, पण महापराक्रमी आणि तितकाच वैराग्यशीलही होता.

चैतन्य प्रेम

राजा जनक हा अपरंपार वैभवाचा धनी होताच, पण महापराक्रमी आणि तितकाच वैराग्यशीलही होता. नव्हे त्याच्या वैराग्याचे संस्कार होऊन अनेकांचे सिद्धजीवनही फुलले होते. ‘शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे..’ हा श्लोक सर्वपरिचित आहेच. यात वैराग्याचा पूर्ण प्रत्यय जर कुणात झाला असेल, तर तो शुक महाराजांमध्ये आहे, असंच ध्वनित होतं. या शुकदेवांवर वैराग्याचे संस्कार घडले ते राजा जनकामुळे! म्हणूनच तर हरी नारायण राजा जनकाला भक्तीचं माहात्म्य सांगताना म्हणतो आहे की, ‘‘हे राजा परम भक्तीची स्थिती मी एकांशता तुला सांगितली. तिचं पूर्ण स्वरूप तर तू स्वभावत: जाणतोसच!’’ याचाच अर्थ असा की, राजा जनकाला भक्तीची थोरवी कुणाकडून जाणून घेण्याची गरज नव्हती. ती त्याच्या ठायी पूर्णत्वानं नांदत होतीच. पण साधकहितासाठी, जे उपासनेच्या मार्गावर आहेत त्यांना मार्गदर्शन व्हावं, यासाठीच राजा जनकानं या नवनारायणांशी सखोल अशी आध्यात्मिक चर्चा सुरू केली आहे. कारण काय आहे, की भक्ती म्हणजे काय, ती कशी करतात, कशी करावी, हे शब्दांनी जाणून घेता येतं. ते ज्ञान देणारे शेकडो ग्रंथ उपलब्ध आहेतच. पण खऱ्या सद्गुरुमयतेशिवाय या भक्तीलाही अर्थ नाही. त्या खऱ्या सद्गुरुशी ऐक्य पावणं, हाच ‘एकात्मयोग’ आहे आणि तोच ‘एकनाथी भागवता’त वर्णिलेला आहे. बाहेरून कमावलेलं जे ज्ञान असतं ना, ते निव्वळ शब्दज्ञान असतं. सद्गुरुज्ञानाशिवाय, सद्गुरुबोधाशिवाय आणि मुख्य म्हणजे त्या सद्गुरुबोधानुसारच्या आचरणाशिवाय त्या भक्तीला पूर्णत्व नाही. राजा जनक आणि शुक भेटीच्या प्रसंगातून याचाच प्रत्यय येतो. संत एकनाथ महाराजांनीच ‘भावार्थ रामायणा’त ती कथा सांगितली आहे. शुकदेव हे व्यासांचे पुत्र. त्यांचं मन वैराग्यानं भरून गेलं होतं. त्यामुळे ऐन तारुण्यात घरदार सोडून ते जंगलात निघाले होते आणि त्यांची समजूत काढायला व्यास मुनीही मागोमाग धावत होते. तोच शुकदेव एका जलाशयापाशी आले आणि तिथे काही अप्सरा जलक्रीडा करीत होत्या. मात्र शुकदेवांना पाहूनही त्या संकोचल्या नाहीत. तोच पाठोपाठ व्यासमुनी आले आणि त्यांना पाहताच त्या पुरत्या संकोचून गेल्या. व्यासांना आश्चर्य वाटलं की माझ्यासारख्या वृद्ध तपस्व्याला पाहून या अप्सरा लाजल्या, पण तरुण शुकाला पाहून त्यांना काहीच संकोच कसा वाटला नाही? व्यासांनी शुकांसमोरच हा प्रश्न अप्सरांना विचारला. त्या उत्तरल्या की, ‘‘हे मुनीवरा, जशी ज्याची आंतरिक स्थिती असते तसं आम्ही वर्तन करतो. शुकदेवांची अभेद स्थिती आहे. आम्हाला पाहूनही त्यांच्या मनात कोणताही विचार उमटला नाही. मात्र आम्हाला लाजलेलं पाहून तुमच्या मनात शंका आली. याचाच अर्थ तुमची स्थिती अभेद नाही!’’ हे ऐकताच शुकांच्या निर्विचारी मनात विचार उमटला आणि अहंकार उत्पन्न झाला! नुसता अहंकार उत्पन्न झाला असता, तरी एकवेळ ठीक, पण मी ज्ञानी आहे आणि माझा पिता अज्ञानी आहे, हा भ्रमदेखील मनात पसरू लागला! (मी ज्ञाता तो अज्ञान। ऐसें जेथें स्फुरे स्फुरण। तेथोनि पळे ब्रह्मज्ञान। ज्ञानाभिमान उरे देहीं।। – भावार्थ रामायण). जेव्हा ज्ञानाचा अभिमान उत्पन्न होतो तेव्हा आत्मज्ञानाची शक्यताही लयाला जाते! त्यामुळेच व्यास हसले आणि शुकांना म्हणाले, ‘‘हे पुत्रा, अप्सरा काही जरी म्हणत असल्या, तरी तुझी खरी अभेद स्थिती आहे का, याची खातरजमा करण्यासाठी तू राजा जनकाकडे जा!’’

First Published on November 6, 2019 12:08 am

Web Title: loksatta ekatmyog 212 abn 97
Just Now!
X