चैतन्य प्रेम

अनेकांतून एकाकडे आणि एकातून व्यापकत्वाकडे, असा हा साधकाचा आंतरिक प्रवास आहे. एका सद्गुरुधारेत साधक दृढ झाला, की सर्वत्र तोच तत्त्वरूपानं भरून आहे याची जाणीव त्याला होऊ लागते. पण अनेकांत विखुरलेल्या मनाला एका सद्गुरुभावांत दृढ करण्यासाठी त्या अनेकांतही जे शाश्वत तत्त्व आहे ते तोच आहे, हे आकलनही रुजावं लागतं. त्यासाठी या चराचरांतील अनेक गोष्टींतील गुरुतत्त्वाकडे अवधूतानं लक्ष वेधलं आहे. त्यानं चोवीस गुरूंची माहिती सांगितली. त्यातील ‘पृथ्वी’ आणि ‘वायू’ या दोन गुरूंची माहिती आपण ऐकली आणि ‘आकाश’ या तिसऱ्या गुरूचा मागोवा आपण सुरू केला आहे. ‘पृथ्वी’ या पहिल्या गुरूकडून आपण शांती, समत्व आणि दातृत्व हे तीन गुण कसे ग्रहण केले, हे अवधूतानं सांगितलं. तर ‘वायू’ या दुसऱ्या गुरूकडून अवधूतानं समदृष्टी आणि अलिप्तपणा कसा ग्रहण केला, हे आपण पाहिलं होतं. ‘आकाश’ या तिसऱ्या गुरूचे कोणते गुण अवधूताच्या अंत:करणाला भिडले, हे आपण पाहिलंच होतं. यदुला अवधूत सांगतो की, ‘‘आकाश अभेदत्वानं सर्व पदार्थमात्रांत समानतेनं भरून आहे, पण ते असंग आणि निर्मळ आहे! त्यामुळे आकाशाला मी गुरू मानलं आहे.’’ हे जे आकाश आहे, ते तर कुणात भेद करीत नाहीच, पण जे परस्परांशी भेदबुद्धीनं वा वैरबुद्धीनं वागतात त्यांच्यावरही आकाश अभेद समानतेनं पसरलेलं असतं. ते सर्वत्र आणि सगळ्यांत असूनही कुठेच अडकून नसतं. योग्याच्या मनाची स्थिती अशी निर्लिप्त असली पाहिजे, असं अवधूत सांगतो. मग तो आकाशाच्या या सर्वव्यापी निर्लेपत्वाचं दर्शन घडवीत सांगतो की, ‘‘नभ पृथ्वीरजे न गदळे। उदकेंकरीं न पघळे। अग्नीचेनि ज्वाळे न जळे। वायुबळें उडेना।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सात, ओवी ४४८). पृथ्वीवर किती का धुरळा उडेना, धुळीचे लोट आकाशाकडे का उडेनात, आकाश मलिन होत नाही! अथांग सागराच्या लाटा कितीही उसळी मारोत वा जलानं भरलेले मेघकुंभ आकाशात संचार करीत पर्जन्यसरींचा मारा करोत, त्या जलानं आकाश भिजतही नाही. पृथ्वीवरील वणव्यात वनेच्या वने बेचिराख होताना आगीच्या ज्वाळा आकाशाला स्पर्श करताना भासल्या, ठिणग्यांची अग्निफुलं आकाशात उडताना दिसली, तरी आकाश पेट घेताना वा जळतानाही दिसत नाही. कितीही झंझावाती वादळ निर्माण होवो, जोरदार वारे अनावरपणे वाहोत, पण त्यानं आकाश काही उडून जात नाही. भले मेघांनी नभावर आक्रमण करीत ते झाकोळल्यागत दिसलं, तरी ते जसंच्या तसंच असतं (कडकडीत आभाळें। येऊनि आकाश झांकाळे। त्या समस्ता नभ नातळे। अलिप्त बळें संस्थित।।४४९।।). त्याप्रमाणे योग्याची स्थिती असते, असं अवधूत सांगतो. म्हणजे काय? तर काळ्या ढगांनी आकाश झाकल्यासारखं वाटलं, तरी ते आकाश त्या ढगांपल्याड जसंच्या तसंच असतं. तसा योगी प्रपंचातील संकटांच्या काळ्याकुट्ट ढगांनी झाकोळल्यागत वाटला, तरी त्याच्या आंतरिक स्थितीला किंचितही ओरखडा गेलेला नसतो. तो समरस स्थितीतच वावरत असतो. अवधूत सांगतो, एखाद्याला स्वप्नात चिंतामणी मिळाला, पण स्वप्नातच तो खोल विहिरीत पडला, तर जाग आल्यावर त्याच्या मनात ना त्याच्या प्राप्तीचं सुख असतं, ना तो गमावल्याचं दु:ख असतं. तसा योगी या देहाच्या सुख-दु:खांना स्वप्नवत मानत असतो. जीवन तो जागेपणी जगत असतो.