चैतन्य प्रेम

संत साहित्यात कामिनी आणि कांचन या दोन गोष्टींच्या मोहापासून दूर राहायला साधकाला सांगण्यात आलं आहे. कामिनीचा शब्दश: अर्थ ‘स्त्री’ तर कांचनचा अर्थ ‘सोने’. त्यामुळे ही टीका ‘स्त्री’वर आहे, असा समज होऊ शकतो. काही अभंगांत प्रपंचात रुतलेला माणूस पत्नीच्या मोहात फसून जन्मदात्यांनाही कसा विसरतो, आपली घसरण करून घेतो, याचीही वर्णनं येतात. त्यामुळे ही टीका ‘स्त्री’वर आहे, असंच वाटतं. पण प्रत्यक्षात ‘कामिनी’ आणि ‘कांचना’वरील ही टीका कामवासनेच्या ओढीवर आणि नश्वर भौतिक संपदेच्या ओढीवर आहे. ही कामवासनात्मक ओढ सर्वच साधकांना समान घातक आहे, मग तो साधक पुरुष असो वा स्त्री! ‘नारद भक्तिसूत्रां’च्या विवरणात श्री. धुंडामहाराज देगलूरकर म्हणतात की, ‘‘साधकास स्त्रीसंग कसा बाधक होतो, मोठमोठे तपस्वीही या संगात अडकून पडले व त्यांचा तपोभंग कसा झाला याचे वर्णन एकादश स्कंधाच्या सव्विसाव्या अध्यायात आहे. कोणास वाटेल की, स्त्री ही एवढी घातक आहे काय? याचे उत्तर हेच की केवळ स्त्री घातक नाही, येथे स्त्रीचा निषेध नाही. स्त्रीसंगाच्या आसक्तीचा निषेध आहे. विशेषत: मनुष्य त्यात आसक्त होतो आणि सामान्यांना स्त्री ही केवळ भोग्य वस्तूच वाटते. भोग्य या रूपाने स्त्री व पुरुष यांची बाधकता समानच असते. एखादी मोहग्रस्त स्त्री एखाद्या परपुरुषास भोग्य या रूपाने पाहील तर तो पुरुषसंगही बाधकच झाल्याविना राहणार नाही. तो दु:संग होईल.’’ (पृ. २५४). स्त्रीसंगापेक्षाही स्त्रणांचा म्हणजे स्त्रीला भोग्य वस्तूच मानणाऱ्या वासनांध माणसाचा संग अधिक घातक असतो, असं साक्षात कृष्णानंच उद्धवाला सांगितलं आहे. भगवान म्हणतात की, ‘‘स्त्रियेच्याही परीस वोखटी। संगति स्त्रणांची अतिखोटी। त्यांसी न व्हावी भेटीगोठी। न पहावे दिठीं दुरोनी।।३६१।।’’ (एकनाथी भागवत, अध्याय १४). स्त्रीच्या संगापेक्षाही स्त्रीला केवळ भोग्यवस्तू मानत असलेल्या कामरोगट माणसाची संगती अत्यंत घातक असते. त्यांना भेटूही नये की पाहूदेखील नये, असं भगवंत बजावतात. आता हा स्त्रण किंवा कामरोगट केवळ व्यक्तिरूपातच असतो असं नव्हे. आपला एखादा मनोभावही कामरोगट असू शकतो. त्याच रोगट भावाच्या छायेत मनात येणाऱ्या कल्पना, विचार हे सारं तितकंच कामरोगट असेल. त्यामुळे मनात त्याच विचारांचा पाया पक्का होत असेल. तेव्हा अशा विचारांची सूक्ष्म संगतही धुडकावता आली पाहिजे. किंबहुना भगवंताचं सांगणं आहे की, ‘‘मजवेगळें जें जें ध्यान। तेंचि जीवासी दृढबंधन। यालागीं सांडूनि विषयांचें ध्यान। माझें चिंतन करावें।।३५४।।’’ माझ्याव्यतिरिक्त जे जे ध्यान आहे, जी जी ओढ आहे ती दृढ बंधनात पाडणारीच आहे. त्यामुळे विषयाच्या डबक्यात रुतवणारं सगळ्या प्रकारचं चिंतन सोडून केवळ माझंच ध्यान करा, चिंतन करा. जर खरंच असं घडलं तर साधनेत लाभ होईल तो होईलच, पण या भूमीवरही किती उपकार होतील हो! विषय वाईट नसतात, पण त्यातलं अडकणं, गुंतणं वाईट असतं. पाणी प्रवाहित असतं तेव्हाच निर्मळ असतं. त्याचं वाहणं थांबलं की त्याचं डबकं तयार होतं. आहे ते पाणीही अशुद्ध होत गेलं आणि आटलं की त्या डबक्यात चिखलगाळ फक्त उरतो. अंत:करणाचं असं कामचिखलानं भरलेलं डबकं तयार झालं की मन विषण्ण करणारे लांच्छनास्पद असे लैंगिक अत्याचार घडतात. त्रिशूलधारी दुर्गेच्या पायाखाली निपचित पडलेल्या राक्षसालाच जीवदान देतात!