News Flash

१८३. आनंदरूप

पाण्यातली मासोळी बाहेर जमिनीवर पडली तर तडफडू लागते आणि पाण्यात टाकताच तडफड संपते.

(संग्रहित छायाचित्र)

चैतन्य प्रेम

परमात्माच जगरूपानं भरून आहे, हे शब्दार्थानं समजतं, पण अनुभवातून उमगत नाही, अशी आपली स्थिती असते. याचं कारण या जगात केवळ आनंद, सात्त्विकता, सौंदर्य भरून नाही, तर त्याचबरोबर दु:ख, तामसिकता, कुरूपताही भरून आहे. हे सौंदर्य आणि ही कुरूपता रंग-रूपाची नाही, बरं का. ती वृत्तीची आहे. तेव्हा या जगात भेद दिसत असताना एकाच अभेद परमात्म्याचंच ते रूप आहे, हे कसं पटावं? पण गेल्या भागांत पाहिलं त्याप्रमाणे, सरोवर म्हणजे पाणीच, पण वाऱ्यानं त्याच्यावर तरंग उमटतात. तसं एका परमात्मरूप जगात विकारांच्या वाऱ्यानं माणसाचं बाह्य़रूप, बाह्य़वर्तन वेगवेगळं होतं. ते आत्मज्ञानापासून, देवबुद्धीपासून ढळत जातं. पण मग ‘एक परमात्माच जगरूपानं भरून आहे’ म्हणजे काय? तर या जगातल्या यच्चयावत सर्व जीवमात्रांची धडपड कशासाठी आहे? तर ती पूर्णत्वासाठी आहे, अखंडत्वासाठी, शाश्वततेसाठी आहे! म्हणजे माणसाला पूर्ण, अखंड, शाश्वत आनंदाची आस आहे. जो आनंद गवसला आहे, तो कधीच खंडित होऊ नये, तो ओसरू नये ही त्याची आस आहे. पाण्यातली मासोळी बाहेर जमिनीवर पडली तर तडफडू लागते आणि पाण्यात टाकताच तडफड संपते. याचाच अर्थ पाण्यापासून ती वेगळी राहूच शकत नाही. तद्वत आनंदासाठी माणसाची तडफड सुरू आहे; म्हणजे तो मूळचा आनंदाचाच अंश आहे, तो आनंदापासून वेगळा राहूच शकत नाही. तेव्हा परमात्मा कसा आहे? तो पूर्ण आहे, अखंड आहे, शाश्वत आहे आणि माणसाची त्याच गोष्टींसाठी तडफड सुरू आहे; कारण तो मूळ तसाच आहे! आनंदरूप, पूर्ण आहे. जो भगवंतमय भक्त आहे, तो मात्र जगताचं हे रहस्य जाणत असतो. त्यामुळे सरोवरावरील लाटा, सोन्याचा अलंकार, मातीचं मडकं अशा ‘दिसणाऱ्या’ आकारामागील खऱ्या ‘लपलेल्या’ पाण्याला, सोन्याला, मातीला जाणकार जसं पाहतो, तसा तो या चित्रविचित्र जगाच्या पसाऱ्यातील भगवद्तत्त्वाला पाहत असतो. सर्वत्र तोच आहे, मग भीती कसली? त्यामुळे त्याची आंतरिक शांती, स्वानंद कधी लोपत नाही.. दोन लहान मुलं होती. त्यांच्या बापानं डोक्यावर पांघरूण घेऊन त्यांना घाबरवायचं ठरवलं. पण एका मुलानं बाबाच पांघरूण घेत आहेत, हे पाहिलं होतं. दुसऱ्यानं पाहिलं नव्हतं. त्यामुळे ज्यानं पाहिलं नव्हतं तो घाबरला आणि दुसरा थोडंसं घाबरला खरा, पण हसूही लागला. तसा या जगाच्या दृश्य पसाऱ्याआड लपलेला भगवंत ज्या साधकाला माहीत असतो, तो बाह्य़ परिस्थितीच्या चढउतारानं क्वचित चिंतित दिसतोही, पण मग लगेच तो हसूही लागतो! त्याची साधना पक्व होत जाते, तशा समस्त चिंताही मावळू लागतात. एक वेगळीच निर्भय स्थिती येते. पण ती बेफिकीर स्थिती नसते, बरं का. कर्तव्यविन्मुख स्थितीही नसते. उलट ते नि:शंक आनंदात जगात विचरण करू लागतात. नाथ म्हणतात, ‘‘ऐशिया निजसमशांतीं। भगवद्भक्त क्रीडा करिती। यालागीं उत्तमत्वाची प्राप्ती। सुनिश्चितीं पावले।।७४२।।’’ आपल्या अंत:करणातील समत्व आणि शांतीनं ते जगात सकारात्मक वृत्तीनं वावरत असतात आणि त्यामुळे जे जे उत्तम त्याची प्राप्ती त्यांना निश्चितपणानं होत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 4:04 am

Web Title: loksatta ekatmyog ekatmyog article number 183 zws 70
Next Stories
1 १८२. एकात्मता
2 १८१. ‘मी’ आणि ‘तू’
3 १८०. अद्वैत
Just Now!
X