चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

श्रीकृष्णाच्या लीलाकार्याचं वर्णन करताना नाथ सांगतातकी, त्यानं अधर्माला प्रथम वाव देऊन मग धर्मच वाढवला, अकर्मातून कर्म तारले, कोणताही नेम न करवता खरा नेम घडवला! याचा मधुर अर्थ गोकुळवासियांशी संबंधितही आहे. दरवर्षी इंद्रपूजा करण्याची गोकुळातली रीत होती. कृष्णानं ती तोडली! तो म्हणाला, ‘‘इंद्राऐवजी जो गोवर्धन पर्वत आपल्या गायीगुरांना चारा देतो, आपल्यासाठी मेघ अडवून वृष्टी करतो, आपल्याला अनेक झऱ्यांद्वारे पाणी पुरवतो त्याचीच पूजा का करू नये? एकप्रकारे हेदेखील त्यावेळेनुसार धर्मबाह्य़ कृत्यच होते. त्या कृत्यानं संतप्त झालेल्या इंद्रानं जेव्हा वरूणाला फर्मान देत अतिवृष्टी सुरू केली तेव्हा तोच गोवर्धन करंगळीवर तोलून धरत कृष्णानं तुमच्या प्रपंचाचा गोवर्धनही मी असाच तोलू शकतो आणि बाह्य़ जगातील संकटांपासून वाचवू शकतो, हेच सूचित केलं. गोकुळातल्या गोपगोपींनी असं कोणतं कर्म केलं होतं की कृष्णानं त्यांचं प्रारब्ध नष्ट करावं? हे प्रारब्ध कसं आहे? तर नाथ सांगतात, ‘‘अति नि:सीम निर्दृष्ट!’’ म्हणजे अतिशय अमर्याद आणि दृष्टीस न पडणारं म्हणजेच उघडपणे न दिसणारं  अर्थात वर्तमानात अज्ञात असं. आपणही अनुभवतो, की पुढे काय होईल, हे आपल्याला उमगत नाही आणि त्या अज्ञात प्रारब्धाचीच चिंता वाटत असते. तर ते कृष्णानं नष्ट केलं इतकंच नाही, तर या गोपगोपींनी असा कोणता नेम केला होता की कृष्णाचं पूर्णप्रेम त्यांना लाभावं? तर त्यांनी केवळ कृष्णावर प्रेम केलं होतं. त्या प्रेमालाच कृष्णानं नेमाचं दिव्य रूप दिलं आणि  ‘‘अनेमें नेमिला नेम,’’ याद्वारे त्यातूनही त्यांचं प्रारब्ध नष्ट केलं! श्रीगोंदवलेकर महाराज यांचंही एक बोधवचन आहे की, ‘‘प्रेमाला नेमाची गरज नाही. वियोग सहन होत नाही ते प्रेम!’’ तेव्हा नेमापेक्षा प्रेम दिव्य आहे. कारण त्या प्रेमातच नेम सहज अंतर्भूत आहे. जिथं प्रेम असतं तिथं स्मरण सहज असतं, त्या स्मरणासाठी नेम करावा लागत नाही. या कृष्णाच्या संगानं जगाचा संग सुटला. (तेणें संगेंचि सोडिला संगु।) जसं आद्य शंकराचार्य म्हणतात, सत्संगानं नि:संगता येते. कृष्णाच्या संगाची गोडी अशी होती की शत्रूपक्षातला विदुरही कृष्णमयच होता. केवळ प्रारब्ध असेपर्यंत तो शत्रूपक्षात होता, पण मनानं सदैव कृष्णभावानं व्याप्त होता. या विदुराच्या घरी कृष्ण भोजनासाठी गेले तेव्हा विदुरानं देहभान हरपून केळ्याची सालं त्यांना खाऊ घातली आणि केळी टाकून दिली! भगवंतानं मोठय़ा प्रेमानं चढवलेला हा केळीच्या सालांचा भोग प्रसन्न मनानं ग्रहण केला आणि आपल्या प्रेमयोगात विदुराला न्हाऊ घातलं. जणू ‘‘भोगें वाढविला योगु!’’ महाभारत युद्धाआधी दुर्योधन आणि अर्जुन एकदम कृष्णभेटीसाठी आले. कृष्ण म्हणाले, ‘‘तुम्ही दोघं एकाच वेळी आलात त्यामुळे आता तुम्हीच मी की माझं सैन्य, यातल्या एकाची निवड करा. दुर्योधनाला वाटलं, एका कृष्णापेक्षा त्याचं हजारोंचं सैन्य उपयोगाचं आहे. त्यानं सैन्य निवडलं. अर्जुनाची निवड तर सदैव कृष्णच होती. त्यामुळे कृष्णानं त्याग न करता दुर्योधनाचा त्याग साधला! ‘‘त्यागेंवीण केला त्यागु!’’ आणि तोही कसा? तर त्यात कोणी दोष काढू शकत नाही, खोट काढू शकत नाही.. ‘‘अति अव्यंगु निर्दोष!’’ तेव्हा कृष्णचरित्र असं आहे. ते चकवा देतानाच भ्रमातून सोडवतं!