चैतन्य प्रेम

शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पाच विषय सामान्य माणसाला गुंतवतातच; पण साधनापथावर वाटचाल करीत असलेल्या माणसाला प्रारंभिक टप्प्यात त्या ओढी मोठय़ा तीव्र आणि आव्हानात्मक वाटतात. साधकाला या ओढी कशा अडकवतात, हे एकनाथ महाराजांनीच ‘चिरंजीव पदा’त मांडलं आहे आणि ते प्रत्येक साधकानं मुळात वाचलं पाहिजे. एवढंच नाही, तर त्यावर मनन, चिंतन करीत त्या बोधालाच मापदंड मानून आपल्या अंत:करणाचं सूक्ष्म निरीक्षणही करीत गेलं पाहिजे. ‘शब्द’ साधकाला कसं गुंतवतो? तर नाथ म्हणतात, ‘‘जेणें धरिला शुद्ध परमार्थ। त्यासि जनमान हा करी अनर्थ। तेणें वाढे विषयस्वार्थ।’’ ज्याला शुद्ध परमार्थ साधायचा आहे, त्याला लोकांकडून मिळणारा मान हा घातक आहे! ‘‘जनस्तुति लागे मधुर। म्हणती उद्धरावया हा हरीचा अवतार। आम्हांलागीं जाहला स्थिर। तेणें धरी फार शब्दगोडी॥’’ लोकांकडून होणारी स्तुती फार मधुर वाटते. ‘हा जणू साक्षात अवतारी सत्पुरुषच आहे, आमच्या भाग्यानं आम्हाला लाभला आहे,’ इथपर्यंतही या स्तुतीची मजल जाते आणि साधक अडकतो! मग नाना मृदू आसनं दिली जातात, नरनारी सेवा करतात, पाय चेपतात आणि त्यायोगे ‘स्पर्श’विषय अडकवतो; मग उत्तमोत्तम कपडे मिळतात, अलंकार मिळतात, त्यानं देहच सजवला जातो आणि ‘रूप’विषय अलगद गोवतो. मग साधकाच्या आवडीचे पदार्थ त्याला खाऊ घालून ‘रस’ विषयात आणि फुलं, चंदन, केशर, अत्तरांच्या दानानं ‘गंध’ विषयात अवतीभवतीचं जग साधकाला नकळत मोहवत असतं. या मोह-ओढींतून साधकानं कशी वाट काढली पाहिजे, हेदेखील नाथांनी या ‘चिरंजीव पदा’त सांगितलं आहे. पण साधकांनाच कशाला? लोकांकडून होणारी स्तुती, लाभणारा मान आणि भेटीदाखल मिळणाऱ्या वस्तू सामान्य माणसाला अडकवत नाहीत काय? तेव्हा हा जो मनुष्यजन्म मिळाला आहे, तो सार्थकी लागला पाहिजे. या मनुष्य जन्माचं तसंच सहज लाभलेल्या अनेक विलक्षण क्षमतांनी युक्त अशा या नर देहाचं खरं मोल ओळखता आलं पाहिजे. या जन्मात अज्ञान जसं अधिक पक्कं होऊ शकतं, तसाच ज्ञानाचा अहंकारही पक्का होऊ शकतो. या दोन्ही वाटा मनुष्य जन्माच्या खऱ्या लाभापासून वंचितच ठेवतात. ‘एकनाथी भागवता’च्या पाचव्या अध्यायात नाथ म्हणतात, ‘‘एक अज्ञानी सर्वथा। स्वप्नीं नेणती परमार्था। ते नेणपणेंचि तत्त्वतां। श्रीजगन्नाथा न भजती।।५५।। शेळी उंसाची चवी गाढी। नेणोनि पाचोळा करांडी। तेवीं नेणोनि हरिभक्तीची गोडी। अज्ञानें बापुडीं विषयलुब्ध।।५६।।’’ जे अज्ञानी असतात, त्यांना स्वप्नातही परमार्थाचा विचार शिवलेला नसतो. त्यामुळे भगवंताचं खरं भजनही त्यांना साधत नाही. शेळीला उसाची चव माहीत नसते. त्यामुळे ती उसाच्या कांडालगतचा पालापाचोळाच खाण्यात आनंद मानते. तसाच भगवंताला विन्मुख माणूस हा या देहाच्या मोहात अडकतो.. ज्या देहाला अखेरीस पालापाचोळ्याचीच दशा लाभते! ज्या देहाच्या क्षमतांनी ईश्वराचा लाभ करून घेता येतो, त्याच देहातील त्याच क्षमतांनी तो नश्वराच्या मोहात अडकतो. ज्या देहबळानं आत्महित साधता येतं, त्याच देहमोहानं तो आत्मघात करवून घेतो! नाथ बजावून सांगतात की, ‘‘मनुष्यदेहीं जे भजननष्ट। ते होती गा स्थानभ्रष्ट।’’ मनुष्यदेह लाभूनही जे भजनविन्मुख होतात, ते मनुष्यत्वापासूनच वंचित होतात!