29 May 2020

News Flash

मी कोण?

माणसाला जागं करणं म्हणजे त्याचं आत्मभान जागं करणं.

संग्रहित छायाचित्र

चैतन्य प्रेम

संतांनी माणसाला सतत जागं करण्याचा आणि जागृत राखण्याचा प्रयत्न केला. माणसाला जागं करणं म्हणजे त्याचं आत्मभान जागं करणं. आपण खरे कोण आहोत, का जगत आहोत आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे का आणि कसं जगलं पाहिजे, याची जाणीव म्हणजे आत्मभान! संत एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘आपुलिया हिता आपण जागिजे। वायां न नागविजे देही देहा॥’’ म्हणजे- हे माणसा, तुझं हित जाणून घेण्यासाठी तुलाच जागं झालं पाहिजे. या जगातला दुसरा कुणी तुला तुझ्या हिताचं भान आणून देणार नाही. का? कारण जसे आपण आपल्या खऱ्या हिताबाबत अनभिज्ञ आहोत, तसाच या जगातला आपल्या भवतालचा प्रत्येक जण त्याच्या खऱ्या हिताबाबत अनभिज्ञ आहे. हे ‘हित’ नेमकं काय आहे? माझं हित म्हणजे माझ्या देहाचं हित आहे का? तर नाही! हे हित आहे या देहात असलेल्या आत्मतत्त्वाचं हित! देह हा ते आत्महित साधण्यासाठीचं केवळ एक प्रमुख साधन मात्र आहे! देह त्या आत्महितसाधनेसाठी वापरायचा आहे. पण शेवटी या देहात आहे कोण? या प्रश्नावर तात्काळ उत्तर येईल ‘मी’! पण हा ‘मी’ कोण, हे नेमकेपणानं सांगता येत नाही. ‘मी’ म्हणजे या देहाच्या आधारावर जगत असलेला आणि ‘देहच मी’ या भावनेत जखडलेला देहधारी का? माझं घर, माझा धर्म, माझी जात, माझा समाज, माझं शिक्षण, माझी आर्थिक परिस्थिती या सगळ्यासह वावरत असलेलं ‘अहं’केंद्रित भावविश्व का? अनेक इच्छा जोपासणारा व त्यांच्या पूर्तीसाठी तळमळत, धडपडत असलेला वासनापुंज का? कोण आहे हा ‘मी’? त्या या ‘मी’ला अस्तित्वाची काळजी आहे का? मृत्यूची भीती आहे का? आनंदाची ओढ आहे का? हा ‘मी’ आहे कोण? योगी रमण महर्षी याचं विलक्षण उत्तर देताना म्हणतात, ‘‘मी कोण, या प्रश्नाचा हेतू उत्तर शोधणं हा नाही, तर प्रश्नकर्ता ‘मी’च अस्तंगत होणं हा आहे!’’ म्हणजे? जेव्हा संत तुम्हाला ‘मी कोण’ याचा शोध घ्यायला प्रवृत्त करतात, तेव्हा या प्रश्नाचं उत्तर मिळावं हा हेतू नसतो, तर हा प्रश्न विचारणारा जो ‘मी’ आहे ना, तोच मावळावा हा हेतू असतो! एकाच ‘मी’च्या एकाच वेळी किती तरी ओळखी असतात. या अनेक ओळखी असल्या तरी खरा ‘मी’ कोण, हे उमगत नाही. त्याचा शोध सुरू झाला की ही ओळखींची पुटं विरू लागतात. किंबहुना ती पुटं गळून पडल्याशिवाय खरा ‘मी’ जाणवतही नाही!

chaitanyprem@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2020 12:09 am

Web Title: loksatta tatvabodh article abn 97
Next Stories
1 अस्तित्वाचं मोल
2 एकांत-योग!
3 ३०८. जाळं!
Just Now!
X