चैतन्य प्रेम

काल जो तुकाराम महाराजांचा अभंग आपण पाहिला, त्यात मूळ अभंगात पहिल्या चरणात प्रश्नचिन्ह नाही. ते घातल्याने ‘साप आणि बोक्याच्या पिल्लांना सुख मिळत नाही’ हे वाक्य ‘साप आणि बोक्याच्या पिल्लांना सुख मिळत नाही?’ असे प्रश्नार्थक झाले. ही प्रश्नचिन्हाची चूक माझीच आहे. पण या चरणात अदृश्य प्रश्नचिन्ह घालून आणि न घालता दोन अर्थ कसे निघतात, ते प्रथम पाहू. या जीवसृष्टीत अनंत प्रकारचे पशुपक्षी आहेत. जलचर, भूचर आणि उभयचर प्राणी आहेत. यातील कित्येक हिंस्र आणि विषारी आहेत. मात्र इतर प्राण्यांसाठी धोकादायक असणारे हे जीव त्यांच्या पिल्लांसाठी धोकादायक नाहीत. त्यांची जपणूक आणि पोषण ते करतातच. हा एक अर्थ लक्षात ठेवा. आता प्रश्नचिन्हाशिवाय हा चरण असलेला अभंग पुन्हा पाहू. तो असा : ‘‘मायबापे जरी। सर्पीण की बोका। त्यांचे संगे सुखा। न पवे बाळ।।१।। चंदनाचा शूळ। सोनियाची बेडी। सुख नेदी फोडी। प्राणनाश।।२।। तुका म्हणे नरकी। घाली अभिमान। जरी होय ज्ञान। गर्व ताठा।।३।।’’ इथं माय-बाप म्हणताना दोन वेगवेगळ्या प्राण्यांचा उल्लेख केला आहे. म्हणजे माय जर सर्पीण असेल आणि बाप जर बोका असेल, तर पिल्लांना सुख नाही. म्हणजे माय जर मांजर असेल, असं नाही म्हटलेलं. याचं कारण जाणून घेऊ. काही साप थेट पिल्लाला जन्म देतात, काही अंडी घालतात. त्या अंडय़ांना ऊब देणं, त्यांचं संरक्षण करणं हे सगळं सर्पीण करते. पण अंडं फोडून एकदा का पिल्लं बाहेर आली की ती निघून जाते! म्हणजे सर्पिणीच्या पिल्लांना मातृसुख नाही. तीच गत मांजरीच्या पिल्लांची. आता बोका आपल्या पिल्लांना खातो, अशी लोकसमजूत काही समाजांत रूढ आहे. पण ती नजरेआड केली तरी मांजरीच पिल्लांची ती मोठी होईपर्यंत काळजी घेते, त्यांचं रक्षण करते आणि त्यांना खाद्यही पुरवते, यात शंका नाही. म्हणजेच मांजरीच्या पिल्लांना मातृसुख आहे, पण पितृसुख नाही! तेव्हा माय आणि बाप जर सर्पीण आणि बोका असतील तर पिल्लांना मातृ-पितृसुख नाही, असं तुकाराम महाराज सांगतात. तसंच चंदन शीतल असलं तरी त्याचा सूळ आणि सोनं मौल्यवान असलं तरी त्याची बेडी काही सुखकारक नसते. आता ही रूपकं लक्षात ठेवून शेवटचे चरण अर्थठसा उमटवतात. ते सांगतात की, ज्ञान हे शुद्ध असतं. ते अज्ञानाचा निरास करतं. सत्यजाणिवेत स्थित करतं. पण जर त्या ज्ञानाचा गर्व झाला तर तेच ज्ञान चंदनाच्या सुळाप्रमाणे घातक ठरतं आणि लोकेषणेच्या, लोकस्तुती मोहाच्या सोन्याच्या बेडीत जखडवून टाकतं. ज्ञानाचं जेव्हा गर्वात रूपांतर होतं तेव्हा इतरांच्या मताची पूर्ण उपेक्षा करण्याच्या आणि वेळप्रसंगी मत्सरविषानं दंश करण्याच्या वृत्तीरूपी सर्पिणीप्रमाणे आणि स्वार्थरूपी बोक्याप्रमाणे माणूस आपल्यातील शुद्ध ज्ञानाचा अंकुर स्वत:च दडपून टाकतो. अंत:करणातले ज्ञानाचे झरे मग आटतात. एकदा हे झरे आटले, की अंतरीच्या डोहात साचलेलं आणि अहंभावानं गढूळलेलं ज्ञान हे डबक्याप्रमाणे उरतं! मग आता पहिल्या चरणात प्रश्नचिन्ह घातलं तर काय अर्थ प्रकट होतो? तर, गर्वाच्या ताठय़ात माणूस जगू लागला तर सर्पिणीच्या पिल्लाप्रमाणे मनात प्रसवलेली इतरांची मत्सरयुक्त उपेक्षा आणि बोक्याच्या पिल्लाप्रमाणे प्रसवलेली स्वार्थाध वृत्ती ही त्या माणसाचा अहंकार जोपासत असली तरी ती इतरांसाठीच नव्हे, तर त्याच्यासाठीही नरक-यातनाच ठरते.

Pile of Dead fish, Airoli creek
ऐरोली खाडीत मृत माशांचा खच….मच्छीमार हवालदिल; मासे का मरत आहेत ? 
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे | Loksatta chaturang Different types of fear infatuation the fear
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी